माझा सरदार ! क्रमांक 1

.
माझा सरदार ! पार्ट 1


सकाळचा प्रहर होता. विठ्ठल धावतच वाड्यात शिरला.

" ताईसाहेब.. ताईसाहेब.." विठ्ठल हाका मारू लागला.

त्याची हाक ऐकून गंगाबाई लगेच दालनाबाहेर आल्या.

" काय झाले रे विठ्ठल ? वाघ मागे लागल्यासारखा का धावून आलास ?" गंगाबाईंनी विचारले.

" ताईसाहेब , वाघ नाही तर हत्ती ! गावात एक बिथरलेला हत्ती फिरतोय. सर्वांना घरातच राहण्याचे आदेश मिळाले आहेत. आपल्या घरचे सर्व सदस्य वाड्यातच आहेत ना ?"

गंगाबाईंना गोदूची आठवण आली.

" अरे महादेवा ! गोदू बाहेरच आहे. विठ्ठल , लगेच चार माणसे घेऊन गोदूला शोधून आण. सोबत गुणवंताही आहे. "

" तुम्ही काळजी नका करू. आताच शोधून आणतो ताईंना. " विठ्ठल म्हणाला.

***

" गुणवंता , हे गाव किती सुंदर आहे ग !असे म्हणतात मासाहेब जिजाऊंना हे गाव खूप आवडते. प्राजक्ताची किती सुंदर फुले मिळाली. आपल्या वाड्यावरच्या प्राजक्ताच्या झाडाला सखू वेळेवर पाणी देत असेल की नाही कुणास ठाऊक. " गोदू म्हणाली.

गोदूला प्राजक्ताची फुले खूप आवडायची.

" गोदू , लवकर घरी जाऊ ना. ताईसाहेब ओरडतील उशीर झाल्यावर. " गुणवंता म्हणाली.

" अग गुणवंता , तू कशाला घाबरत आहेस ? आबासाहेब माझा किती लाड करतात तुला ठाऊक नाही का ? आणि आबासाहेब म्हणतात की स्वराज्यात राहणाऱ्या स्त्रियांच्या नेत्रांमध्ये भय नसते. त्या रात्रीअपरात्रीही निर्भयपणे फिरू शकतात. "

" गोदू , तो बघ हत्ती. आपल्याकडेच येतोय. "

" बिथरलेला हत्ती दिसतोय. "

गुणवंता थरथरू लागली. धीर एकवटून तिने एक हात पुढे केला.

" अस्तिक अस्तिक अस्तिक. "

" गुणवंते , हा मंत्र साप दिसल्यावर म्हणतात. "

" मग हत्ती दिसल्यावर काय म्हणतात ?"

" ते सोड. तो हत्ती आपल्याकडेच पाहतोय. पळ लवकर. "

गुणवंता आणि गोदू दोघेही पळू लागल्या. पण गुणवंता पडली.

" गोदू , तू पळ. मी तर दासी आहे. जगो अथवा मरो एकच. "

" नाही गुणवंता. तू माझी मैत्रीण आहेस. मी तुला एकटी सोडून जाऊ शकत नाही. "

तो हत्ती दोघींच्या जवळ आला. तेवढ्यात तिथे एक तरुण आला. जवळपास पंधरा-सोळा वर्षाचा असावा. दिसायला विलक्षण देखणा , रुबाबदार होता. त्याला पीळदार शरीरयष्टी लाभली होती. वस्त्रांवरून तो एखाद्या श्रीमंत सरदाराचा मुलगा वाटत होता. त्याने मोठा पराक्रम केला. त्या बिथरलेल्या हत्तीशी एकतर्फी झुंज दिली. तेवढ्यात महाराजांची काही माणसे तिथे पोहोचली. हत्तीला वश करून सर्वजण निघून गेली. गोदा तिथेच स्तब्ध उभी होती.

" गोदू , चल घरी. ताईसाहेब वाट पाहत असतील. "

" ते कोण होते ? किती पराक्रमी होते ! न घाबरता त्यांनी हत्तीशी झुंज दिली. आपल्याला त्यांचे साधे आभारही मानता आले नाही. " गोदाने खंत व्यक्त केली.

" तालेवार घराण्यातले वाटत होते. " गुणवंता म्हणाली.

गोदाला तिथे एक अंगठी पडलेली दिसली. गोदाने लगेच ती अंगठी उचलली.

" गुणवंता , त्यांची अंगठी इथेच पडली वाटतं. "

तेवढ्यात तिथे विठ्ठल आला. गोदाने लगेच अंगठी लपवली.

" गोदूताई , लवकर वाड्यावर चला. "

विठ्ठल दोघींनाही घेऊन वाड्यात आला. गंगाबाई फार रागात होत्या.

" कळत नाही तुला ? हत्तीने चिरडले असते म्हणजे ?" गंगाबाई ओरडल्या.

" असा कसा चिरडेल ? मी पळून गेले असते ना. " गोदू म्हणाली.

" तुला किती वेळा सांगितले आहे की न विचारता गावात फिरायला जाऊ नकोस ? खरे दोषी तुझे आबासाहेबच आहेत. त्यांनीच तुला लाडावून ठेवले आहे. "

" आबासाहेबांना काही बोलायचे नाही. "

" बरं. एकतर स्वतःची चूक आणि वर माझ्याशीच भांडतेस ? शंभूराजे तुझ्या वयाचे असताना मिर्झाराजे जयसिंग , औरंगजेब यांना भेटून आले होते आणि तू नुसते उपद्व्याप देत असते. "

" मासाहेब जिजाऊ पण तुझ्या वयाच्या असताना पुण्याचा कारभार पाहत होत्या. "

" काय म्हणालीस ? थांब. आज माझ्या हातचा मारच खाणार आहेस तू. "

गोदा पळाली आणि गंगाबाई तिच्या मागेमागे धावू लागल्या. ते दृश्य पाहून वाड्यावरचा सेवकवर्ग गालातल्या गालात हसू लागला. तेवढ्यात तिथे सरदार घोरपडे आले. गोदा लगेच त्यांना बिलगली.

" आबासाहेब , बघा ना. आई मला मारत आहे. "
गोदू तक्रारीच्या स्वरात म्हणाली.

" आता आम्ही आलोय ना. कुणी तुमच्या अंगाला स्पर्शही करू शकणार नाही. " सरदार उमाजी घोरपडे म्हणाले.

" तुम्ही बसा. मी पाणी आणते. " गंगाबाई पदर सावरत म्हणाल्या.

गंगाबाई पाणी घेऊन आल्या.

" भेट झाली महाराजांची ?" गंगाबाईंनी विचारले.

" हो. गडावर पाय ठेवायलाही जागा नाही. सर्व सरदार , व्यापारी , विद्वान ब्राह्मण , रयत , दूरवरच्या राजांचे प्रतिनिधी जमलेत. इंग्रजदेखील आलेत. " सरदार घोरपडे म्हणाले.

" आबासाहेब , आम्हाला कधी नेणार आहात गडावर ?" गोदूने कुतूहलाने विचारले.

" उद्या. " सरदार घोरपडे म्हणाले.

गोदू आनंदाने उड्या मारू लागली.

" महाराणी सोयराबाईंसाठी भेटवस्तू घ्याव्या लागतील ना ?" गंगाबाई म्हणाल्या.

" होय. आजच सर्व तयारी करून ठेवा. उद्या सकाळी गडावर जाऊ. " सरदार घोरपडे म्हणाले.

" गोदा , उद्या गडावर नीट शहाण्याप्रमाणे वाग. स्वराज्याच्या छत्रपतींचा राज्याभिषेक आहे. " गंगाबाई म्हणाल्या.

" आबासाहेब , स्वराज्य म्हणजे काय?" गोदूने विचारले.

" बाळा , स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपलं राज्य. यवनांचे अत्याचार आता संपले. खूप त्रास दिला त्यांनी इथल्या प्रजेला. मंदिरे फोडली , मूर्त्या भंग केल्या. कित्येक स्त्रिया भ्रष्ट झाल्या. कितीतरी मराठे सरदार दरबारात मारले गेले. अवघा मुलूख नासवला. पण महाराजांनी या मरणप्राय झालेल्या मातीत नव्याने प्राण फुंकले. इथला स्वाभिमान जागवला. माणसे जोडली. तेव्हा कुठे आज गडकिल्ल्यांवर भगवा फडकत आहे. समुद्रात आपली जहाजे तरंगत आहेत. महाराज आपल्यासाठी एखाद्या ईश्वरी अवतारापेक्षा कमी नाहीत. " सरदार घोरपडे म्हणाले.

ते शब्द ऐकून गोदूच्या मनात महाराजांविषयी आदर कैक पटीने वाढला.

***

रात्रीचा प्रहर होता. महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या कक्षात प्रवेश केला. त्यांचे चरणस्पर्श केले.

" आऊसाहेब , आम्हाला अजूनही वाटते की इतक्या भव्य सोहळ्याची आवश्यकता काय ?"

" आवश्यकता आहे शिवबा. आवश्यकता आहे. या मातीतल्या लोकांना गुलामीची सवय झाली आहे. हे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन नुसती निर्जीव वस्तू नाही तर या सह्याद्रीचा , या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. इथल्या लोकांना वाटते की राज्य करावे ते मोगलांनी , आदिलशाह आणि कुतुबशाहने. पृथ्वीवर क्षत्रिय उरले नाहीत असे समज त्यांच्यात आहेत. शिवबा , ते सर्व समज खोडून टाकायचे आहेत. रयतेच्या गुलामगिरीच्या वृत्तीवर प्रहार करायचा आहे आम्हाला. या राज्याभिषेकामुळे तुम्हाला इतर सत्ताधीश " स्वतंत्र सार्वभौम राजा " म्हणून मान्यता देतील. तुम्हाला कुणी " पहाडी चुहा " म्हणून संबोधित करणार नाही. आपले मर्द मावळे स्वराज्याचे सैनिक असतील. त्यांना कुणी दरोडेखोर , लुटारू म्हणणार नाही. "

" खरे आहे आऊसाहेब. शिवाय या राज्याभिषेकाने अवघ्या हिंदूस्थानातील राजांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळेल. असेही आबासाहेब म्हणायचेच की अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला. जर अवघी भरतभूमी एकजुटीने परकीयांविरुद्ध पेटून उठली तर हा देश स्वतंत्र व्हायला कितीसा वेळ लागणारे ?"

शहाजी महाराजांचा उल्लेख झाल्यावर जिजाऊंचे डोळे पाणावले.

" काय झाले आऊसाहेब ?"

" भूतकाळ आठवला शिवबा. मंगल प्रसंगी गतकाळातील कटू आठवणी पुन्हा नेत्रांसमोर येत आहेत. तुमच्या आजोबांची भर दरबारात हत्या झाली होती. आमचे माहेर संपवले गेले. त्या देवगिरीच्या किल्ल्यावर अजूनही आमच्या लहानग्या भावंडांच्या रक्ताचे थेंब पडलेले आहेत. भोसल्यांच्याच एका स्त्रीला उचलून नेले होते मोगलांनी. नंतर त्यांच्या पतीने हातात रुमाल बांधून मोगलांना लाच दिली तेव्हा त्या सुटल्या. आपल्या आबासाहेबांना कैद करून विजापूरात त्यांची धिंड काढण्यात आली होती. आपल्या मोठ्या भावास कपटाने मारण्यात आले. लोकांना मासाहेब जिजाऊचा थाट दिसतो पण आमच्या हृदयातील त्या जखमा फार खोल आहेत शिवबा. त्या कुणालाच दिसत नाहीत. "

" आऊसाहेब , तुमचा त्याग , बलिदान , सहन केलेले दुःख , अपमान आम्हाला ठाऊक नाही असे का वाटते आपणास ? पण आता ते दिवस संपले आऊसाहेब. आता सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचे वारे वाहत आहेत. "

" खरे आहे शिवबा. आपल्याला सिंहासनावर बसताना पाहिल्यानंतर जीवनात अजून काहीही नको."

" असे नका बोलू आऊसाहेब. आम्ही उद्या जगासाठी " छत्रपती " जरी होणार असलो तरी आमच्या आऊसाहेबांसाठी त्यांचे शिवबाच आहोत. तुम्ही बघाच आऊसाहेब. एकदिवस मराठ्यांचे घोडे सिंधू नदीचे पाणी पितील आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याचे दरवाजे ठोठावतील. "

आऊसाहेबांनी होकारार्थी मान हलवली. मग त्यांचा निरोप घेऊन महाराज आपल्या कक्षात निघून गेले.