माझा सरदार ! क्रमांक 3

.
दुसऱ्या दिवशी गोदूचा विवाह होता. त्या दिवशी गावात चूल पेटली नव्हती. रायगडावरूनही भेटवस्तू आल्या. घोरपडे आणि जेधे प्रतिष्ठित घराणे असल्याने वाड्यावर स्वराज्यातील मातब्बर मंडळींची गर्दी झाली होती. संताजी घोरपडे हे गोदूचे चुलतभाऊ पडत. तेही आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

" आमच्या बहिणीला त्रास दिला तर गाठ आमच्याशी आहे बर. " संताजी मस्करीच्या स्वरात नागोजीला म्हणाले.

" त्रास देण्याचा प्रश्नच नाही. जेधेंच्या घरात बायकांचाच वचक असतो. " बाजी जेधे म्हणजे नागोजीचे वडील म्हणाले.

सर्वजण हसले.

अंतरपाट दूर झाला. गोदूने धीर एकवटून नजर वर केली आणि तिच्या मुखावर स्मितहास्य प्रकट झाले. दोन वर्षापूर्वी ज्या तरूणाने तिचे प्राण वाचवले त्याच तरुणासोबत गोदूचा विवाह झाला होता. गोदूने मनोमन देवाचे आभार मानले. जगदीश्वराने तिची प्रार्थना ऐकली होती. विवाह झाल्यानंतर पाठवणीची वेळ आली. रघुनंदनसोबत जानकीला अयोध्येला पाठवताना राजा जनकाची जशी अवस्था झाली होती तशीच अवस्था सरदार घोरपडेची झाली होती. खरतर त्यांना अजून काही वर्षे गोदूचा विवाह नको होता. पण जेधेसारख्या मातब्बर घराण्याचे स्थळ त्यांना नाकारता आले नाही. गोदू सरदार घोरपडेजवळ आली.

" आबासाहेब स्वतःची काळजी घ्या. "

" तूही स्वतःची काळजी घे बाळा. तुझ्यासोबत गुणवंता आणि काही चाकरवर्ग पाठवत आहे. "

मग गोदू तिच्या आईजवळ गेली. गंगाबाईने गोदूला मिठी मारली आणि दोघीही रडू लागल्या.

" आई , आता तुला कुणी त्रास देणार नाही. "

" गोदू , सासरी शहाण्यासारखे वाग. कुणालाच त्रास देऊ नको. सासूबाईंच्या शब्दाबाहेर जाऊ नकोस. तू चुकीचे वागलीस तर लोक तुझ्या माहेराला नाव ठेवतील हे लक्षात ठेव. पोटभर जेवण करत जा. मी नसेल लक्ष द्यायला. " गंगाबाईंचा कंठ दाटून आला.

" आई , माझ्या प्राजक्ताच्या झाडाची काळजी घे."

सरदार घोरपडे यांनी गोदूचा हात धरला. तेवढ्यात तुळजाबाई गंगाबाईजवळ आल्या.

" काही चुकले तर माफ करा. थोडी अल्लड आहे गोदू. " गंगाबाई म्हणाल्या.

" अहो तुम्ही काळजी करू नका. जेध्यांच्या घरी काय लेकी निपजत नाहीत ? आमच्या घरीही लेकी वाढल्या आहेत. मुलीच्या आईचे काळीज आम्ही जाणतो. आम्ही गोदूला सांभाळू. "

" सरदार घोरपडे , तुमची गोदूबाई आम्हाला लेकीसमानच आहे. आम्ही त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार. तुम्ही काळजी करू नका. " सर्जेराव बाजी जेधे म्हणाले.

गोदू पालखीत बसली. सरदार घोरपडे यांचा तिने धरलेला हात निसटला. सरदार घोरपडे यांना आठवण झाली जेव्हा गोदूचा जन्म झाला होता तेव्हा तिने आपल्या नाजूक हातांनी उमाजीचा हात घट्टपणे पकडला होता. पण आता तो हात सुटला होता. निसटला होता.

***

गोदा कारी गावात पोहोचली. तिचे भव्य स्वागत झाले. जेध्यांच्या सुनेला बघण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी गर्दी केली होती. गोदा दिसायला फार सुंदर होती. सर्वत्र तिचे कौतुक झाले.

" नक्षत्रासारखी सून मिळाली आहे. " बायका तुळजाबाईला म्हणाल्या.

कारी गावात जेध्यांचा भव्य वाडा होता. गोदाचा त्या वाड्यात गृहप्रवेश झाला. तुळजाबाईंनी नागोजी आणि गोदाचे औक्षण केले.

" नागोजीराव आणि गोदाबाई आता उखाणा घ्या. " तुळजाबाई म्हणाल्या.

" स्वराज्याचा मावळा मी , महाराजांना समर्पित
गोदाबाईंचे नाव घेतो , तलवारीशी जडली प्रीत "

" तलवार सवत लाडकी , सून मी जेध्यांची
नागोजीरावांचे नाव घेते , लेक मी जिजाऊंची "

" छान. लक्ष्मीनारायणसारखा शोभून दिसतोय जोडा." सर्जेराव बाजी जेधे म्हणाले.

" आता कुलदैवत नागेश्वराचे दर्शन घ्या. " तुळजाबाई म्हणाल्या.

गोदा आणि नागोजी देवघरात गेले. ते देवघर कान्होजी जेधे यांचे होते. तिथे नागेश्वर देवाचे पंचधातूने बनलेली , पंचमुखी असलेले भव्य शिवलिंग होते. गोदा आणि नागोजीने त्यांचे दर्शन घेतले.

***

रात्रीचा प्रहर होता. गोदा नागोजीरावांच्या कक्षात होती. बायकांनी तिला फार सजवले होते. कुणीतरी खोलीत प्रवेश केल्याचा तिला आवाज आला. हृदयाची धडधड वाढली. आपला अंगठा तिने हळूच दाबला. नागोजी आला आणि गोदाजवळ जाऊन बसला.

" घाबरलात ?" नागोजीने विचारले.

" स्वराज्यातल्या लेकीसुनांना कुणाचे भय वाटत नाही."

" असे ? गोदाबाई , आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आपणास. आता आपण जेध्यांची सून आहात. या घराण्याला खूप मोठा इतिहास आहे. "

" ठाऊक आहे मला. तुमचे आजोबा , कान्होजी राजे जेधे यांचा जन्म होताच त्यांच्या नातलगांनी वतनासाठी त्यांच्या आईवडिलांना ठार मारले. परंतु मोठे होऊन आजोबा कान्होजी जेधेनी पराक्रम गाजवून आपले वतन परत मिळवले. रोहिड खोऱ्याची देशमुखी मिळवली. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आबासाहेब शहाजी राजेंचे जिवलग मित्र होते. जेव्हा शहाजी महाराजांना कैद झाली तेव्हा कान्होजीआजोबा यांनाही कैद झाली. अफजलखान स्वारीच्या वेळी कान्होजी आजोबांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांना अनेक देशमुख-देशपांडेचा पाठिंबा मिळवून दिला. आपले पिताश्री बाजी जेधे यांनी फतेहखान स्वारीच्या वेळेस वादळाप्रमाणे फौजेत शिरून स्वराज्याचा ध्वज राखला होता. म्हणून त्यांना " सर्जेराव " ही पदवी मिळाली. महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये जेध्यांचे मोठे योगदान आहे. स्वराज्याच्या पहिल्या पातीचा मान पूर्वी जेध्यांकडे होता. पावनखिंडीत जेव्हा बांदलांनी रक्त सांडले तेव्हा महाराजांना वाटले की हा मान बांदलांना देण्यात यावा. तेव्हा आजोबा कान्होजीराजे जेधे महाराजांना म्हणाले की बांदल नसते तर आपले पाय दिसले नसते. असे म्हणत त्यांनी हसत हसत तो मान बांदलांना दिला. असा हा थोर इतिहास जेधे घराण्याला लाभला आहे. "

" शाब्बास ! आपल्याला इतिहास ठाऊक आहे हे जाणून आनंद झाला. गोदूबाई , आम्ही स्वतःला स्वराज्याला समर्पित केले आहे. तेव्हा तुम्हाला जास्त वेळ देऊ शकेल की नाही ठाऊक नाही. "

" आम्हाला तुमचा फार वेळ नको. आम्ही कधीच तुमच्या मार्गात अडथळा बनणार नाही. "

गोदूने पदरात बांधलेली अंगठी काढली.

" ही तुमचा अंगठी. "

नागोजीने ती अंगठी हातात घेतली.

" ही अंगठी तर राज्यभिषेक समयी हरवली होती. आबासाहेबांनी फार रागावले होते आम्हाला. ही अंगठी आमचा जन्म झाल्यावर आजोबांनी आमच्यासाठी बनवून घेतली होती. "

" तुम्ही त्या हत्तीपासून आमचे प्राण वाचवले तेव्हा गळून पडली होती. आम्ही जपून ठेवली. आपल्याला परत द्यायचे धाडस झाले नाही. क्षमा करा."

" असू द्या. या अंगठीच्या रूपाने अप्रत्यक्षपणे आजोबांचा आशीर्वाद त्यांच्या नातसुनेला लाभला. "

गोदू खुदकन हसली.

" आपल्याला भय नाही वाटले हत्तीशी झुंजताना ?"

" छत्रपतींच्या मावळ्यांना कसलेच भय वाटत नाही. गोदूबाई , आम्ही जेव्हा जेव्हा मोहिमेवर असू तेव्हा तुम्ही घरच्यांची , गावातील लोकांची काळजी घेत जा. "

" हो. तुम्ही मला तलवार चालवायला शिकवाल ?"

" हो शिकवू. "

थोड्या वेळाने नागोजी निघून गेला.

***

दुसऱ्या दिवशी नागोजी आणि गोदा रायरेश्वराच्या दर्शनाला गेले. रायरेश्वराचे मंदिर पाहून गोदूचे मन प्रसन्न झाले.

" महाराजांनी इथेच स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती ?" गोदूने विचारले.

" होय. आम्हीही इथेच स्वराज्यासाठी समर्पित होण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. "

गोदूला आपल्या पतीचा अभिमान वाटला. मंदिराच्या आवारात गोदूला काही झाडे दिसली. काही फुलांचा वास आला. गोदूला माहेरच्या प्राजक्ताच्या झाडाची आठवण आली. तिचा चेहरा पडला.

" काय झाले ?"

" काही नाही. " गोदू पदर सावरत म्हणाली.

" न घाबरता बोला. आम्ही पती आहोत आपले. आम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार ?"

" माझ्या माहेरात एक प्राजक्ताचे झाड होते. इथे प्राजक्ताचे झाड आहे का एखादे ? मला प्राजक्ताची फुले खूप आवडतात. "

" आम्ही विचारपूस करून सांगतो. "

***

दोघेही वाड्यावर परतले. तुळजाबाई गोदूचे फार लाड करायच्या. तिला आपल्या मुलीसारख्याच वागवायच्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नागोजीने गोदूच्या कक्षात प्रवेश केला. त्यांचे वस्त्र चिखलाने माखले होते.

" हे काय ?"

" तुमच्यासाठी प्राजक्ताची फुले आणली आहेत. "

गोदूने लगेच फुले हातात घेतली. त्या फुलांचा वास घेतला.

" आवडली ?"

" हो. कुठे सापडली ? मला सांगा. मी रोज तिथून फुले वेचून आणेल. "

" तुम्हाला जमणार नाही. रायरेश्वरचा पठार चढावा आणि उतरावा लागतो. "

" मला येतो डोंगर चढायला आणि उतरायला. आई तर घोरपडच म्हणायची मला. "

नागोजी आणि गोदू हसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नागोजी आणि गोदू त्या पठारावर गेले. डोंगर चढताना नागोजीचा झालेला स्पर्श गोदूला सुखावून गेला. प्राजक्ताच्या झाडाला पाहून गोदूच्या आनंदाला पारावार उरला नाही.

" हा डोंगर चढताना जशी साथ दिली तशीच साथ जीवनाचा डोंगर चढतानाही द्या. " गोदू मनातल्या मनात म्हणाली.