शनिवारी सकाळी अकराच्या दरम्याने मुलांना घेऊन लायब्ररीत गेले. तर ही जत्रा भरलेली. छोटी छोटी मुलं, त्यांचे आई -बाबा , प्रत्येकाकडे पुस्तकांनी, VCDs ने भरलेली मोठी पिशवी असं सर्वसाधारण चित्र. मुलं लायब्ररी बघून खूपच खुश झाली आणि त्या वातावरणात मिसळून गेली. मग आम्हीही खूप सारी चित्रमय पुस्तके, गोष्टीची पुस्तके, VCDs, ऑडिओ पुस्तके, झालंच तर आमची मोठ्यांची पुस्तके पिशवी भरून घेऊन आलो.
मग हे नित्याचच झालं. हळू हळू तिकडची अजून माहिती काळत गेली. दोन महिन्यातून एका शनिवारी बुक सेल असतो. लोकं आपल्याकडची जुनी पण चांगल्या स्थितीतील पुस्तके दान करतात. मग त्या पुस्तकांची विक्री करून त्यातून आलेले पैसे वाचनालयाला दिले जातात. अशा पुस्तकांची किंमत अगदी वाजवी १-२ डॉलर एवढीच असते. हे सगळं काम “लायब्ररी -फ्रेंड्स “ किंवा आपण “वाचनालय मित्र” म्हणू , करतात. ह्या पुस्तकांच्या सेलला सुद्धा बरीच गर्दी असते.
मी आधी सांगितलं त्याप्रमाणे मुलांसाठी गोष्टीचे कार्यक्रम असतात, कधी काही हस्तकला, चित्रकला शिकवायची शिबीर होतात. मधल्या वयाच्या मुलांसाठी कधी थोडे व्यवसायाभिमुख शिबीर घेतात जस फोटोग्राफी, सॉफ्टवेअर चे शिक्षण , लेखन इ. इ .
पह्लील्या वर्षी मुलांनी खूप एन्जॉय केली ती ख्रिसमस पार्टी. कूकी सजविणे, स्नो फ्लेक्स सजविणे , खूप छान सांता हॅट्स सजविणे असे बरेच खेळ होते, ऍक्टिव्हिटीज होत्या, आणि सोबत ख्रिसमसचे संगीत.
त्याव्यतिरिक्त हॉलोवीनला, समर मध्ये मुलांना मूवी बघायला असतात, वेगवेगळे ऍक्टिव्हिटी किट्स असतात. बऱ्याच वाचनालयात उन्हाळ्याच्या सुट्टीत समर रिडींग कार्यक्रम असतो. मुलांना १०० पुस्तके वाचा, किंवा तत्सम आव्हाने दिली जातात. ती पूर्ण केल्याबद्दल बक्षिसे म्हणून पुस्तके दिली जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप मोठी दरी पडून मुलांची आकलन शक्ती कमी होऊ नये हा यामागे मुख्य उद्देश.
इकडे शाळांमध्ये वाचनावर मुख्य भर असतो. सगळ्या मुलांच्या पुस्तकांना लेव्हल्स/ क्रमवारी दिलेल्या आहेत, त्यांना AR (Accelerated Reader) levels म्हणतात. समजा, पुस्तकाची AR level जर १.६ असेल तर ते पुस्तक पहिलीतल्या पाच एक महिने उलटून गेलेल्या मुलाला वाचता यायला हवे. https://www.arbookfind.com ह्या लिंकवर पुस्तकाचं नाव टाकलं की त्याची AR लेवल कळते (ही माहिती पहिल्यांदी मला मुलाच्या शिक्षिकेने दिली). तसच अजून एक Lexie लेवल पण असते. ती मजकूर आणि त्यातील काठिण्य ह्यावर जडलेली असते.
वर्षाच्या सुरुवातीला मुलाची online reading टेस्ट घेतली जाते. त्यात मुलांना त्यांचे AR Range आणि Lexie score सांगितले जातात. शाळेतल्या लायब्ररीमध्ये पुस्तकांना AR level चे लेबल लावलेले असते. मुले त्यांच्या लेव्हल आणि आवडीनुसार पुस्तके निवडतात. आणि वरील लिंकवर जाऊन लायब्ररीमधील एखादे पुस्तक मुलाच्या range मध्ये आहे कि नाही ते चेक करता येते. शाळेमध्ये त्यांना प्रत्येक आठवड्याला त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या range मधले एक पुस्तक fiction किंवा नॉन-fiction वाचावे लागते. त्याच्यावर लगेच online टेस्ट घ्यायची. ७०% पेक्षा जास्त गुण मिळाले तर तूम्ही ते पुस्तक वाचलंय अशी नोंद होते आणि तुम्हाला त्याचे गुण मिळतात. सगळ्या गुणांची बेरीज जर ठराविक संखयच्या पुढे गेली तर त्या मुलांना शाळेच्या जवळच्या चित्रपटगृहात मूव्ही बघायला घेऊन जातात उलटपक्षी न वाचणाऱ्या मुलांना त्यावेळी लायब्ररीत वाचत बसावे लागते.
त्याचा इंग्लिशचा वर्गही साधारण एकसारखी AR रेंज असणाऱ्या मुलांचा असतो.
AR लेवल ठरवणारी परीक्षा वर्षातून ३-४ वेळेला घेतली जाते. दर परीक्षेला मुलांचा score / range बदलत जाते. साहजिकच आपली लेव्हल दरवेळी वाढत जावी म्हणून मग मुलंही उत्साही असतात. वाचून वाचून त्यांच्यात होणारी प्रगती ठळकपणे जाणवत रहाते. हा कार्यक्रम आमच्या शाळेत एलिमेंटरी शाळेमध्ये म्हणजे पाचवी पर्यंत चालू होता.
पुढे मोठ्या इयत्ताना वेगवेगळी पुस्र्के वाचायला असतात. साधारण एक ते दीड महिना एकेक पुस्तक असते. मग त्या पुस्तकावर, त्यातल्या पात्रांवर, घटनांवर , घटनास्थळांवर वर्गात चर्चा करतात, त्यांना निबंध लिहायचे असतात, कधी वादविवाद घडवून आणले जातात. थोडक्यात मुलांकडून ते पुस्तक समजून घेतले कि नाही याची खात्री करून मग दुसऱ्या पुस्तकाकडे जातात.
ह्या दरम्याने मला बऱ्याच गोष्टी कळत गेल्या, खूप सोपं पुस्तक घेतलं तर मुलांना काहीच आव्हान राहत नाही, त्याची भाषा सुधारायला, शिकायला कमी मदत होते. त्याउलट खूप कठीण पुस्तक घेतलं तर ते वाचायला टाळतात, कंटाळतात . त्यामुळे योग्य पातळीचे पुस्तक वाचायला मिळणे खूप महत्वाचे असते. योग्य पुस्तक कसे ओळखाल? तर पुस्तकाचे कुठलेही पण उघडायचे आणि त्यावर मुलांना २ पेक्षा कमी शब्द अडले तर ते खूप सोपे आहे. ७-८ पेक्षा जास्त शब्द अडले तर ते पुस्तक अवघड आहे आणि ३-५ शब्द अडले तर ते त्याच्या वाचनासाठी योग्य आहे असे समजावे. वाचून वाचून मुलांची व्होकॅब्युलरी (शब्दसंग्रह) वाढतो. स्पेलिंग सुधारते. आणि वाचनाचे बाकी फायदे होतात ते वेगळेच.
बॉब सीरिज पासून सूरु झालेला प्रवास, मॅजिक स्कूल बस, Geronimo stilton, डायरी ऑफ विम्पी कीड, हॅरी पॉटर करत करत इंग्लीश क्लासिक कॉल ऑफ द वाईल्ड, ऍनिमल फार्म आणि फ्रँकेस्टाईन पर्यंत आलाय. सुरुवातीला वाचण्यासाठी मागे लागावं लागायचं आणि आता अभ्यास न करता पुस्तक वाचत बसतात म्हणून ती हातातून काढून घ्यावी लागतात.
तुम्हाला कितीतरी मुलं हातात पुस्तक घेऊन फिरताना दिसतील. ती बसमध्ये, बसस्टॉप वर , मधल्या सुट्टीत , अगदी कुठेही बाजूला बसून पुस्तक उघडून वाचायला लागतात, हे दृश्य सर्रास बघायला मिळत.
रविवारी दुपारी लायब्ररीत गेलात तर लायब्ररी, अगदी टीन्स सेक्शनही भरलेला असतो. मुलं प्रोजेक्टची काम करत , होमवर्क करत बसलेली दिसतात.
ही वाचनालये वाचनबरोबरच नागरिकांना इतरही बरीच मदत उपलब्ध करून देतात. जस कि परदेशीय लोकांसाठी इंग्लिश स्पिकिंग चे प्रशिक्षण देणे, मोठ्यांनाही फोटोग्राफी, कायदा , टॅक्स अशा विषयांवर माहिती पुरविणे, बुक क्लब, विणकाम क्लब ह्यांसाठी जागा उपलबद्ध करून देणे असे अनेक उपक्रम राबवत असतात.
ह्या सगळ्या सेवा पुरवायला मोठ्या संख्येने प्रौढ माणसे आणि हायस्कुल चे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्यने उपस्थित असतात.
अशा रीतीने शाळा, वाचनालये आणि वाचन संस्कृती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुंफलेली दिसून येते.
©Prerana kulkarni
क्रमश: