Login

माझी अमेरिका डायरी - 9 - एका वादळाचा अनुभव!

teen tasancha tharar!

गेल्या तीन चार वर्षात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेन्ज चे परिणाम ठळक पणे दिसायला लागलेत. कॅलिफोर्नियात गेले दोन वर्ष भयंकर दुष्काळ झाला. वणव्यानी अतोनात हानी केली. ह्या वर्षी पाऊस छान धरला, स्नो पडला म्हणून कॅलिफोर्नियावासी सुखावत असतानाच, एकामागून एक वादळे, हिमवर्षाव होतच राहिलाय. जी शेती गेली दोन वर्ष पाणी नाही म्हणून ओसाड झालेली, आज ती जमीन एखादा तलाव असावा अशी शंका यावी एव्हढी पाण्याखाली आहे आणि  त्यामुळे पिकांचंही ओघाने नुकसान झालंय. 

आता इंटरनेटमुळे जगभर वाऱ्याच्या वेगाने बातम्या पसरतात  त्यामुळे वणवे लागले, कि लगेच फोने येतात आम्ही ठीक आहोत ना चेक करायला. पुराच्या बातम्यांनाही ह्यावेळी तेच झाले. बहुतांशी वेळा  ते लांब कुठे डोंगरात, समुद्र किनार्याशी झाले असते आणि आम्ही घरी सुरक्षित असतो.  

पण बुधवारी इकडे पहाटेपासून पाऊस लागलेला. जसा पाऊस उघडला वर सुरु झाला. सोसाट्याचा वारा, वादळी वारा. नेमकं मला काम असल्यामुळे बाहेर पडले तर ज्या  झाडांनी सावली दिली, आज त्यांची भीती वाटत होती.  निसर्गाच रौद्र तांडव सुरु झालेलं. निष्पर्ण झाड  गदागदा हालत होती त्यांच्या खालून जातानाही मनात धडकी भरली न जाणो एखादि फांदी आपल्या डोक्यात पडायची आणि कपाळमोक्ष व्हायचा. 

रस्त्याने उडालेले पत्रे, झाडांच्या फांद्या , काटक्या जागोजागी दिसत होत्या. मी वाऱ्याबरोबर ढकलली जात होते. हा माझा पहिलाच असा अनुभव होता.

घरी आले तर व्हायचचं तेच झाले. लाईट गेले होते . एव्हढ्या वाऱ्यामध्ये विजेचे खांब / वायरी नादुरुस्त होणे स्वाभाविक होते. गेल्या आठ वर्षांत माझ्या आठवणीत लाईट गेले असं आधी फक्त दोनदा झालंय. तेही फार जास्त नाही पण  २-३ तासांसाठी गेलेले. त्यातले एकदा सकाळी शाळेच्या  घाईत. आम्हाला कल्पना नव्हती, गॅरेज चा दरवाजा इलेक्ट्रिसिटी वर चालत असल्यामुळे गाडी आताच अडकून पडली. सकाळी मिनिटामिनटाची लढाई असते त्यामुळे ते चांगलंच लक्षात राहिलय.

दोन तासात मुलगा शाळेतून आला, “बाहेर बघितलेस?”

बघतो तर घराचं लाकडी कुंपण वाऱ्याने उडून पडलं होतं. दुसऱ्या बाजूच कुंपण गदागदा  हालत होत. हे सगळं आमच्या कल्पनेपलीकडचं होतं. आजूबाजूच्यां कडेही कुंपणं पडलेली. 

हळू हळू त्याच गांभीर्य लक्षात आलं जवळ जवळ सगळा  एरिया, हजारो घर, शाळा सगळीकडे वीज गेलेली. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे तो सोडवायला वेळही जास्त लागणार. 

इकडे बऱ्याचशा घरात कूकिंगच्या कॉइल्स विजेवर चालणाऱ्या असतात. त्यामुळे जर पॉवर नसेल तर स्वयंपाकही करत येत नाही. इंटरनेट तर आता चैन न राहता गरज झाली आहे. मुलांचा सगळा अभ्यास जरी शाळा पूर्वीसारख्या सुरु झाल्या तरी ऑनलाईन असतो. मोबाइल सर्विस  आणि डेटा ही बंद झाला. 

काही अंतरावर थोड्य थोड्या एरियात वीज होतती.तिकडे बरेच लोक दुकानांत बॅटरी वर चालणारे दिवे, प्रो वर चालणारे छोटे गॅस सिलेंडर शोधत होते. 

बरेचसे सिग्नल्स बंद होते. अशावेळी इकडे एक पध्द्त आहे  प्रत्येक वहान सिग्नलला थांबते, टर्न बाय  टर्न  हळू हळू पुढे जातात. त्यामुळे नेहेमीपेक्षा खूप जास्त वेळ लागतो पण तरी सगळं नियंत्रणात राहत. 

मुलाचा महत्वाचा क्लास होता, तो झूम वर असतो. मग आम्ही जवळची वाचनालये शोधायला लागलो लाईट्स आणि wifi / इंटरनेट काँनेक्शन साठी. अपेक्षेप्रमाणे जवळची तिन्ही वाचनालये वीज नसल्यामुळे बंद होती. हळू हळू पुढे पुढे सरकत एक वाचनालय (छोटे तात्पुरते ) मिळाले ज्यात वीज होती. बघितलं तर मुलं मिळेल त्या जागेत बसून , कोपऱ्यात उभी राहून त्यांचा अभ्यास करत होती. 

आम्ही जवळच्या स्टारबक्स मध्ये गेलो.  स्टारबक्स मध्ये फ्री डेटा असतो, कितीही वेळ बसता येत. तर आमच्यासारखे बरेच लोकं असेच स्टारबक्स मध्ये वाट बघत वेळ घालवत बसलेले. तेवढ्यात वीज कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन बघितल तर त्याच्या म्हणण्यानुसार आता वीज दुसऱ्या दिवशी रात्री दहापर्यंत येईल अस कळलं. 

रात्रीचं जेवण बाहेरच करून घरी गेलो. पूर्ण अंधाराच साम्राज्य पसरलेलं सगळीकडे. इकडे बऱ्याच जणांच्या घराबाहेर छोटे छोटे सोलरवर चालणारे दिवे होते. त्यांचा काय तो काजव्यासारखा मिणमिणता  प्रकाश. 

त्यातल्यात्यात एक कौतुक वाटलं म्हणजे माझ्या मुलाने शक्कल लढवली आणि आमच्या अंगणातले सोलार दिवे गोळा केले आणि स्वच्छ  पुसून घरात घेतले. बॅटरी, मेणबत्या कशाचीच गरज पडली नाही.

गेल्या दोन वर्षांपूर्वी आमच्याकडे दिवसा ढवळ्या चोरीचा प्रयत्न  झालेला, तेही सगळेजण घरात असताना. 

आता तर घराचं कुंपण पडलेलं , सगळीकडे अंधार, सगळीकडचे कॅमेरे बंद म्हणजे जणू चोरांना  आमंत्रणच. अशावेळी  म्हणतात  ना  वैरी न चित्तीं ते मन चिंती. हजारो विचारांच्या कल्लोळात शेवटी एकदाची झोप लागली आणि सुखरूपपणे सकाळ उजाडली. 

आता दुसऱ्या दिवशी चहा, नाश्ता काही नाही. पाणी गॅस वर गरम होत असल्यामुळे तो प्रश्न  नव्हता. आज बातम्या बघण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हीच आज त्या बातम्यांचा भाग होतो.  आता फक्त एक होते लवकरात लवकर लायब्ररी गाठणे. आदल्यादिवशी मुलांना लायब्ररीत कळले होते कि एक पलीकडच्या बाजूच्या मोठ्या लायब्ररीमध्ये लाईट  आहेत. मग पहिले ती लायब्ररी गाठली . पण आमच्या पेक्षा वक्तशीर आणि हुशार  मंडळी आमच्याही आधी पोहोचली होती. त्यामुळे दहा पंधरा मिनिटे चकरा मारल्यावर पार्किंग स्पॉट मिळाला. आत लायब्ररी मध्ये (प्रार्थमिक ते माध्यमिक शाळेतली) मुलं, त्यांचे आई वडील घरातले सगळे चार्जेर्स, devices घेऊन चार्जिंग पॉईंट जवळचे सगळे स्पॉट्स अडवून आधीच बसले होते. पण मग वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी एक्सटेंशन बोर्डस वगैरे आणून अजून पॉईंट्स उपलब्ध करून दिले. थोड्या वेळातच मुलांना त्यांच्या शाळेतली इतरही मुले अशीच अभ्यासाला (?) आलेली वाचनालयात भेटली. थोड्या वेळातच तिकडे गटगटात  फिरणारे/ अभ्यास करणारे / वाचणारे  मुलामुलींचे घोळके तयार झाले. एकंदर वाचनालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत लोकं जस जसे चार्जिंग मिळेल तसतसे भिंतीच्या कडेला खालीच मांडी घालून काम करत बसलेले दिसत होते. शेवटी  दोनच्या दरम्याने आम्ही लायब्ररीतून निघालो कारण आता  कावळे कोकलत होते. तर आता पुढच्या बॅचची मंडळी वाचनालयाच्या दिशेने चाललेली.

आम्ही एका जवळच्या हॉटेलात पटकन खाऊन घेतलं कारण परत दुपारच्या क्लाससाठी वाचनालय गाठायचं होतं. 

त्यांच्या कुठल्या कुठल्या टेस्ट्स होत्या त्या आजच्या उद्यावर ढकललेल्या. पण एकंदर उद्या रात्री लाईट येणार असं कळल्यामुळे मंडळी निवांत होती.  तेव्हढ्यात शाळेकडून मेसेजेस यायला लागले, “उद्या शाळा चालू आहेत” . मग लगेच पुढचा मेसेज, “शाळेत लाईट आले.”

घर शाळेच्या जवळच असल्याने आम्ही विचार केला कदाचित घरी पण लाईट आले असावेत म्हणून गाडी घराकडे वळवली. घराबाहेर गाडी थाम्बत्ये  न थांबत्ये  तोच मागून मुलगा जोरात चित्कारला, “Wi Fi “. कधी नव्हे त्या प्रचंड वेगाने दोघही घराकडे पळाली. एव्हाना आमच्या लँड लेडीने कुंपण फिक्स करून घेतले होते. २४ तासांनी घर परत  पूर्वपदावर आले होते. ते साजर करायला साहजिकच मी आलं  घालून चहाच आधण गॅसवर चढवले कारण चौवीस तसंच चहाचा उपास घडला होता  ना? कारण इकडे स्टारबक्सकडे चाय टी लाटे नावाचं जे प्रकरण मिळत त्यापेक्षा त्यांची फ्रेश बनवलेली कॉफी बरी वाटते. 

पण बऱ्याच घरांमध्ये तीन दिवस होऊन गेले तरीही वीज आली  नाही. 

दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन बघतलं तर एक झाड मुळापासून उपटलेलं. हे झाड म्हणजे तीस एक फूट उंच मोठं झाड होतं, ज्या व्यक्तीने परवाच्या वादळात ते झाड पडताना बघितलं तिच्या  शब्दात “वाऱ्याने गदागदा हलणार ते झाड, एकदम वस्तू उचलावी तस उचललं गेलं, आणि वाऱ्याबरोबर फिरल्या सारखं होऊन धाडकन जमिनीवर पडलं. खूप भीतीदायक होतं ते दृश्य“ 

कॅलिफोर्नियात अतिपावसामुळे झाडं मुळापासून उन्मळून पडत  असल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या होत्या. दुर्दैवाने त्यात एका महिलेचा चिरडून मृत्यू हि झाल्याची घटना नुकतीच होऊन गेलेली. पण इतकं  मोठं  झाड वाऱ्याने उन्मळून पडलेल आम्ही प्रथमच बघत होतो.

तीनेक तास चाललेल्या  वादळातून बाहेर पडून स्थिरस्थावर व्हायला तीन दिवसांहूनही खूप जास्त कालावधी लागतोय हे खरे! 

0

🎭 Series Post

View all