सिएटल आणि “Pike Place Market” हे नाव जोडीनं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होत.
आमचं हॉटेल डाऊनटाऊन मध्ये, मार्केट पासून अक्षरश: सातेक मिनिटे चालत होत. त्यामुळे चेक इन केलं, बॅगा टाकल्या, आणि आम्ही बाहेर पडलो.
सिएटल सिटी म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोचा बाप आहे असच वाटलं. अरुंद आणि भयंकर चढ/उतार असलेले रस्ते. चौथ्या ऍव्हेन्यू वरून नजर टाकली की खाली उतरत जाणारा रस्ता, बऱ्यापैकी अरुंद, दुतर्फा उंचच्या उंच बिल्डींग्स, त्या उतरत्या रस्त्यांच्या टोकाला सुरू होणार समुद्र.
नियमित दिसणाऱ्या बसेस, बस स्टॉप वरची माणसं , रस्त्याने चाललेले माणसांचे घोळके, तशीच लगबग.
अहाहा मुंबई (आणि आता NYC किंवा SF) चीच आठवण झाली. कुठेही नवीन ठिकाणी गेल तरी नकळत मन मुंबईच्या एखाद्या भागाची छटा / छबी शोधत रहात आणि ओळखीच्या काही खुणा मिळाल्या की एकदम भारी वाटत.
तर असो, आम्ही फिरत फिरत ह्या Pike Place Market शी पोहोचलो आणि माणसांची गर्दी कितीतरी पटींनी वाढलेली जाणवली. मार्केट म्हणजे पसरलेल, बैठ, बंदिस्त संकुलच. त्या गर्दी बरोबर आम्हीही त्या मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसलो. कसलं, एका बोळकांडातून समोरून, मागून येणाऱ्यांना चुकवत (जे इकडे अगदीच दुर्मिळ ) आम्ही पण पुढे सरकायला लागलो. थोडं पूढे गेल्यावर अक्षरश: अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखं वाटलं. जिकडे बघावं तिकडे काही नवलाईच, सुबक, कलाकुसरीच. एका स्टॉल वर सुंदर विणलेल्या क्रोशाच्या वस्तू तर बाजूच्या स्टॉल वर अतिशय देखणे, आकर्षक, रंगेबिरंगी काचेचे दिवे, प्राणी, पक्षी, लोलक. तिथेच बाजूला लाकडी पझल्स, निरनिरळ्या आकाराचे रूबिस्क cubes, लाकडी ३D पझ्झल्स. काय आणि किती बघू, फोटो घेऊ अस होऊन गेलं. अगदी जत्रेत रमलेल्या मुलासारखी अवस्था झाली. मंडळी पझ्झल्समध्ये रमली. तिथपर्यंत मी भरभरून रंगीत काचेच्या वस्तूंचे फोटो काढत सुटले.
उजव्या अंगाला एक गल्ली दिसली तिथून आत गेलो तर जणू काही खाली उतरत चाललेलो. दोन्ही बाजूने, सुंदर, मौल्यवान, दुर्मिळ, लोभस, चित्र विचित्र अशा सगळ्या वस्तू, पुतळे, खेळणी, रंगेबिरंगी किमती स्टोन्स / खड्यांचे दागिने, जुनी कॉईन्स, जादूचे साहित्य यांनी सजलेली ती छोटेखानी स्टॉल वजा दुकानं. जे जे म्हणून मनाला भुलवणारं, रिझवणार अगदी छोट्या बाळगोपाळांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणार काही ना काही होतच तिकडे. मार्केट फिरता फिरता लक्षात आलं, अरे आपण एक एक मजला काही उतरत चाललोय. आणि त्याच्या नंतरच्या लगेचच्या भेटीत त्याची व्याप्ती जाणवली.
सेकंड ऍव्हेनु ला जी समोरून एक मजली बिल्डिंग दिसते ती, मुख्य पातळीच्या खाली जात जवळ जवळ १० मजले खोल अशी सरळ वॉटरफ्रंट पर्यंत (समुद्र किनाऱ्या लगतच्या रस्त्यापर्यंत) जाणारी मोठी बिल्डिंग आहे. एकंदर नऊ एकर एवढा मोठा परिसर आहे हा. Pike Place Market म्हणजे अमेरिकतेतील सर्वात जुनं आणि मोठं फार्मर्स मार्केट. १९०७ पासून चालू झालेल. म्हणजे जवळ जवळ ११६ वर्ष जुनं म्हणता येईल. इथे जवळपासचे शेतकरी, आर्टिस्ट, कोळी, माळी, आचारी मुख्यत्वे आपली भाजी, कलाकुसर केलेल्या वस्तू, ताजे मासे, फळफळावळ, अन्नपदार्थ विकतात. मला तर “भुलभुलैय्यामे खोया है जोकर” अस काहीस वाटायला लागलं.
इकडचा सर्वात लोकप्रिय असलेला भाग म्हणजे Pike Place Fish, अगदी मोठे मोठे ताजे मासे, खेकडे, कोळंबी वगैरे वगैरे सगळं बर्फात घालून विकायला मांडून ठेवलेलं असत. एखाद्याने एखादा मासा विकत घेतला की ठेल्याच्या बाहेर उभा राहिलेला, दोन्ही हातात पकडून (कारण तो तितकाच वजनदार असतो ) गल्ल्याशी उभ्या असलेल्या माणसाकडे तो मासा फेकतो आणि एकोणी गाणं म्हणत असतो, बाकीचे त्याचे सहकारीही त्याच्यामागून सुरात सूर मिसळतात. आणि हा सगळा नजारा टिपायला अनेक पर्यटक आपले कॅमेरे सरसावून तयारच असतात. आम्ही पण दोन मिनिटं ती गंमत बघितली.
ह्या फिश मार्केट वरून पुढे गेलं कि मग ताज्या भाज्या, ताजी फळं विकणाऱ्यांची रांगच रांग. तिकडून पुढे येऊन बघतोय तर हा फुलांचा अप्रतिम नजराणा. रंगेबिरंगी, अनेक वासाची, आकाराची. सूर्यफूल, झेंडू, लिली, नानाविविध प्रकार. तसेच सुकवलेल्या फुलांचे सुंदर आकर्षक गुच्छ. पापणी न लवता अगदी बघत रहावस वाटत होत. मी पुढे जात जात झर झर त्यांचे कित्येक फोटो काढले.
तिथून थोडं पुढे आलं की सुरु होते आर्टिस्ट लोकांची मक्तेदारी, हातांनी बनवलेले किमती खड्यांचे दागिने, सुगंधी साबण, सुंदर मेटलच्या शोभिवंत वस्तू, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, फ्रेम्स काय काय होत. आता मात्र वेळही कमी होता आणि त्या पेंटिंग्ज ची नक्कल करायची इच्छा झाली तर काय घ्या म्हणूनही त्यांचे मात्र फोटो काढले नाहीत.
सोबत कुठे छानस संगीत, फुलांचे, अगरबत्तीचे, सुग्रास भोजनाचे सुवास, आणि ह्या साऱ्यात खेकडे, ऑईस्टर, श्रिम्प यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलसमोर लागलेल्या मत्स्यप्रेमींच्या ह्या भल्यामोठ्या रांगा.
आम्ही काही निवडक पझल, कॉईन्स, मेटलच्या वस्तू खरेदी केल्या आणि विमान गाठायचं असल्यामुळे पाय निघत नसतानाही Pike Place Market चा निरोप घेतला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा