Login

माझी अमेरिका डायरी - पाऊले चालती....!

A divine experience!

आज शेवटचां दिवस, हो नाही करता करता रात्री अकराला ठरवले, कसही करुन उद्या जायचच.

सकाळी सातला रिव्हरव्ह्यू पार्कला पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिकडे मेळा जमला होता. लांबूनच दिसणारे उंचावलेले भगवे, साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, झांजांची किणकिण, आसमंतात पसरलेला उत्साह लगेच तुम्हाला आपल्यात सामावून घेत होता. त्यातच स्वागताला लावलेल्या चंदनाच्या टिक्याने पुढील ३-४ तासांची नांदीच मिळाली.

 

ही सगळी मंडळी निघाली तरी कुठे? अहो वारीला. तीनेक मैलाचा रस्ता. बालाजी मंदिरात सांगता.

ह्या वर्षी प्रथमच बे एरियामध्ये जुन महिन्यातल्या चारही शनिवारी आणि रविवारी सकाळी बरोबर सातला ह्या मार्गावर वारी आयोजित केली होती. FB/ Whatsapp वर इतके सारे फोटो बघून कधी एकदा आपणही हा अनुभव घेतोय असे झालेले कारण फोटो आणि व्हिडिओ बघून खरी अनुभूती काही मिळत नाही.

वयस्कर मंडळी, त्यांना सावकाश घेऊन जाणारी त्यांची मुल सुना, जावई, stroller मध्ये किंवा पाठुंगळी लेकरांना घेऊन पायी निघालेले लेकुरवाळे आईबाप, जोशात मार्गक्रमण करणारी तरुणाई, आणि सगळ्यांना जोडणारा एकच धागा त्या पांडुरंगाच्या भक्तीचा.

सुरवातीला कोणीच ओळखीचं नाही म्हणून वाटणार अवघडलेपण, विठू नामाचा गाजर करत सहकाऱ्यांबरोबर काही पाऊले चालताच कुठच्या कुठे पळून गेले. आणि सकाळच्या गारव्यात, झांजांच्या गजरात, विठूमाऊलीच्या, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात, बालाजी मंदिर हा हा म्हणता आले सुद्धा.

 

अंगणातल्या तुळशीवृंदावनासमोर रख्माई विठोबाच्या साजिऱ्या मूर्तींची पूजा करून त्याभोवती रिंगण केले. आज आमच्या वारीला पंढरपूरची वारी केलेले एक वारकरी आजोबा होते. त्यांनी रिंगणाच्या वेळी म्हणायची खास ढंगातली भजनं सांगून भक्ती रसात न्हाऊन टाकले. मग फुगड्या झाल्या. आणि अर्थातच नवीन युगाच्या रीतीप्रमाणे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग!

त्यानंतर गाभाऱ्यात अनेक सुंदर भजन म्हटली. विशेष उल्लेख करायचा तर, इथेच लहानच मोठ झालेल्या म्हणजे खरतर अजूनही elementary शाळेतच जाणाऱ्या दहा वर्षाच्या शार्दुलने इतकं गोड, सुस्पष्ट, आणि अस्खलित भजन म्हणून आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. त्यावर कडी म्हणून एका तीनेक वर्षाच्या बाळाने "जय हरी विठ्ठल" म्हणत इतका सुंदर ठेका धरला की त्याच्या रूपाने जणू बाल विठ्ठलाचेच दर्शन झाले. “आता विश्वात्मके च्या” सामूहिक पठणाने अवघा आसमंत पवित्र झाला. त्यानंतर मग यथासांग आरत्या झाल्या. अगदी “येई हो विठ्ठले” मधल्या निढळावरी कर चा “ररर” हवा तेवढा लांबवताना सगळा गाभारा अगदी दुमदुमत होता.

तिथंपर्यंत बहुदा अकरा वाजून गेलेले, अगदी पाय काढवत नसताना प्रसाद घेऊन निघाले, ते आषाढी एकादशीला परत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊनच.

बोला, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !”

तळटीप- भारतात इतके वर्ष राहून हा वारीचा माहोल कधीच अनुभवला नव्हता. पण लहानपणी tv वर पंढरपूरच्या वारीतील भक्तीचा महापूर बघून खूप कुतूहल होत. ह्या वर्षी बे एरियातील ह्या वारी निमित्ताने एक छोटीशी चुणूक अनुभवायला मिळाली. त्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र मंडळ बे एरियाचे मनापासून आभार!

#vithobawari #spiritualjourney #Maharashtraheritage #devotion #culturalexperience #bayareacommunity #americadiary

0

🎭 Series Post

View all