माझी चुक मला सांगा
"श्रुतीला जमले तसे पुरण कर म्हंटले होते मी पोळ्याला..."मालती ताई आपल्या घरी आलेल्या जावेला सांगत होत्या
कमल काकू लगेच म्हणाल्या ,"काही बोलू नका इथे तिच्या समोर ,बोलायचे असेल तर तिकडे तुमच्या खोलीत जाऊन बोलू.."
सासू लगेच हात झटकत नाक मुरडत म्हणाली ,"तिला घाबरते की काय मी..!
काकू लगेच, हात हळूच दाबत,"असे बोलणे तिला ऐकू येईल मग उगाच वाद होतील तुमचे.."
श्रुतीला काही ऐकू येत नव्हते असे सासूला वाटले ,कारण ती जेव्हा आत गेली तेव्हा तिने कानात हेड फोन लावलेले दिसले होते.. म्हणून त्यांना वाटले ते हेड फोन आणि तिचे गाणे ह्यात तिला काही एक ऐकू येणार नाही ,मग काय जाऊबाई ला तो किस्सा सांगू...सासूबाईने एक ठरवले होते...जावेच्या सुनेबद्दल जर काही वावगे ऐकायचे असेल तर आधी तिला आपल्या सुने बद्दल काही वावगे सांगितले पाहिजे तरच ती तोंड उघडले आणि आपल्याला सांगेल..मग आपण इतर सासूला हे किस्से रंगून सांगू मग आपली त्यांच्या सोबत मैत्री होईल... बस आता घरी बसलेल्या सासूला हेच एक काम होते..
त्यांनी लगेच ठरवले ,असे बरेच किस्से आठवून आठवून येणाऱ्या सासू झालेल्या बाईला ऐकवायचे , आणि त्यांचे किस्से ऐकायचे..
"हे बघ ती सून आहे ,लोकांची लेक आहे..तिला तर जागरूक करू नकोस..मी काय इथली नाही...म्हणून तू काही असेल तर आपण तिकडे बसून बोलू..तुझे ही मन हलके आणि तिला ही समजणार नाही.." काकू समजून सांगत म्हणाल्या ,त्या सासू होऊन दहा वर्षे झाली होती आणि त्यांना सुना हाताळायचा आणि संभाळायचा ही अनुभव होताच ,त्यात कटू अनुभव ही होते...म्हणून जे त्यांच्या सोबत घडले ते आपल्या जावे सोबत घडू नये म्हणून जरा खबरदारी घेत बोलत होत्या
"तू तर राहू देत ,तुझे घर तुझे स्वतःचे नाही मुलाने कमावलेले आहे म्हणून तुझी त्या घरात चलती नाही..पण हे घर माझ्या नवऱ्याचे आहे मग इथे माझी चलती असेल...तिला घाबरून मी का दुसरीकडे जाऊन बोलू...तसेच मी हुकूम करणार माझ्या घरात आहे मी.." सासू धीट होती चांगलीच
"मी निघते बाई ,मला भांडण तंटे वाद आता नको वाटते ,सगळे आले गेले सासुवर येते ,काही झाले ,केले गेले..नसले केले तरी कोण तर ती सासुच तशी आहे हा दोष येतो...माझ्या सुना बऱ्या आहेत...त्यांना मी समजले त्या मला समजल्या आहेत...आणि त्या आदर करतात मी ही आदर मिळतो म्हणून काही उचापती करण्याकडे लक्ष देत नाही...उमेश काल बोलला तू काकूंकडे जाशील तर इथले काय घडले ते बोलत बसायचे नाही...काकूंचे ही ऐकायचे नाही.. ऐकले तरी इथे घेऊन यायचे नाही..."
"धमकी दिली काय तुला पोराने तुझ्या ,ही कोणती रीत आहे...आता तू तुझ्या मनातले ही बोलायचे नाही काय माझ्या कडे ग बाईsss... बघ हे असे होते...जरा तुझ्या हातात घे सगळे तंत्र...."
"नको बाई ,तुम्ही घ्या हातात मी आपली मनात घर करून राहण्यात आता सुख समजते ,गावाकडे नको वाटते ,आता लेका सुनात रमते , सुख देतात ते घेते...कुठे मान देण्यात कमी करत नाही बरं त्या दोघी ही...पर्वा मला एकीने पगारातून अंगठी करून आणली.."
"तुझ्याच मुलाच्या पैशाने आणली असेल ,आणि म्हणत असेल की मी माझ्या पगारातून आणली आहे...तू किती साधी ग..ती समजून चुकली की सासूला काही म्हणा खरे समजेन..."
"तुम्ही जास्त खोलात घुसू नका बाई ,ना माझ्या सुनेच्या खोलात घुसू नका ,ना माझ्या खोलात घुसू नका...आणि तुम्हाला जसे सोपे वाटते आज तितके सोपे नाही सुना संभाळणे... चटके बसले की जश्या त्या सरळ होतात ,तसे आपल्याला ही आपलीच मुलं सरळ करतात..."
"मग आता तुम्ही पुरण ,पोळ्याच्या पुरणाचा किस्सा न ऐकताच जाणार आहात का मग..? म्हणजे जरा मी मन मोकळे केले असते वाईस... तिकडे तर तिकडे कोपऱ्यात बसून बोललो असतो आपण...तिला काही ऐकून न येईल असे बोलून मोकळे झालो असतो हो आपण..."
"नको हो बाई ,सगळे नुसते खार खातात जर कोनाला थोडं जरी कळलं की सुनेची चूक इतरांना सांगितली तर.."
"म्हणजे कसं काय ..?"
"म्हणजे सून त्या दिवशी सगळ्यांना समोर बसून ,खाऊ पियू घालून ,साडी देऊन म्हणाली आई तुम्हाला खूपच वाटले की माझी चूक मी सुधारायला हवी तर माझी चूक मला आधी येऊन सांगायला हवी की नाही तुम्ही..."
"बाप रे अशी म्हणाली का ती..?"
"मला तर नजर वर करून बघता आली नाही ,आणि ठरवले की तोंडाला खडा..." काकू
काकू चे तोंड शिवले होते ,तर ह्यांचे आता शब्दच नाहीसे झाले होते...त्यांचे मन मोकळे झाले नाही म्हणून पोटात दुखत होते... ना स्वतःच्या सुनेचे किस्से सांगता आले ना त्यांच्या सुनेचे ऐकता आले...
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा