Login

माझी जीवनसंगिनी!

माझी जीवनसंगिनी!
    
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
लघुकथा लेखन.
शीर्षक - माझी जीवनसंगिनी.


              आज त्यांच्या घरी घटस्थापना होती. घट बसवले होते, पण आरती अजून बाकी होती. त्यासाठी सगळे लगबगीने तयार होत होते. तिनेही सुंदरशी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाची फुलांची नक्षी होती. त्यानेही पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.

ते दोघेही म्हणजे, स्वामिनी निलेश पोतदार! अगदी साजेसा जोडा होता त्यांचा. नातेवाईक तर त्यांची नजर काढल्याशिवाय राहत नव्हते. त्याची आई मालाबाई तर त्यांच्या मुलापेक्षा सुनेवर जास्त जीव ओवाळून टाकत असत. एक खोली, एक हॉल एवढंसंच त्यांचं घर होतं. स्वयंपाकघर वेगळं नव्हतं. हॉलमध्येच गॅस मांडलेला होता. सध्या सगळे आवरण्यात व्यस्त होते. स्वामिनी आणि निलेश दोघेही सोबतच खोलीत तयार होत होते. त्याचं आवरून झाल्यावर त्याने तिच्याकडे पाहिलं.

"झालं का स्वामिनी?" त्याने खालून वरपर्यंत तिला न्याहाळत विचारलं.

त्याच्या आईनंतर ती त्याच्यासाठी जगातली सर्वात सुंदर स्त्री होती. त्याची नजर तिच्यावरच खिळलेली होती. तिनेही त्याच्याकडे पाहिलं. तोही राजबिंडा दिसत होता.

"असे काय पाहत आहात?" तिने लाजत विचारलं.

"माझी स्वामिनी किती सुंदर दिसत आहे ते पाहत आहे." तिच्यावरची नजर न हटवता त्याने सांगितलं. त्याच्या बोलण्याने तिच्या गालावरची लाली आणखीनच वाढली.

"काहीतरीच तुमचं! तीन मुलांचे बाबा झाला आहात, पण अजूनही हे लाडिक बोलणे थांबलं नाही तुमचं." ती उगाच त्या छोट्या आरशात स्वतःला पाहत लाज लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

१५ वर्षांचा संसार त्यांचा. त्या संसाराच्या वेलीवर तीन फूले उमललेली होती. मोठ्या मुलाच्या पाठीवर मुलगी होईल ही आशा होती, पण दुसराही मुलगा झाला. तिसऱ्या मुलाच्या वेळीही त्यांची तीच आशा होती, पण मुलगाच त्यांच्या हातात आला. निलेश मुलीसाठी खूप तरसत होता. काही नातेवाईक म्हणत होते की, 'अरे सोड हा हट्ट. लोकं मुलगा झाला म्हणून आनंद साजरा करतात. तू आहेस की मुलगी व्हावी म्हणून अडून बसला आहेस'. मात्र तो काही सोडत नव्हता. 'मुलगी हवीच' असा हट्ट धरून बसला होता.

आता जरा त्यांच्याकडे वळूयात!

"इकडे ये. मला तुला काहीतरी द्यायचं आहे." निलेश स्वामिनीच्या हाताला धरून तिला पलंगावर बसवत म्हणाला. ती न समजून त्याच्याकडे पाहत होती.

"आज मी माझ्या गृहस्वामिनीला मौल्यवान भेट देणार आहे. मी आजपर्यंत पै-पै जमा करून तुझ्यासाठी बनवून घेतलं आहे." तो हातात असलेलं कागद उघडत म्हणाला. त्यात एक सुंदर सोन्याचं कंगण होतं.

"अहो, कशाला हा एवढा खर्च केलात?" तिने मोठे डोळे करत विचारलं.

"माझी स्वामिनी १५ वर्षांपासून फक्त काचेच्या बांगड्या घालत आली. कधी एका शब्दानेही तक्रार केली नाही. कधीच कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट धरला नाही. तिच्या या समाधानी आयुष्यामध्ये या कंगणला तर काहीच मोल नाही." असं म्हणत त्याने हसतच ते कंगण तिच्या हातात घातलं.

"नवरात्री सुरू झाली आहे, तर आज मला तुझ्या प्रत्येक रूपाचं कौतुक करायचं आहे." तो तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला. ती त्याच्या प्रत्येक शब्दाने मोहित होत होती.

"माझी गृहलक्ष्मी, जिने माझ्या या छोट्याशा घरात येऊन माझ्या घराला घरपण दिलं."

"माझ्या आईची सून नसून मुलगी, जिने माझ्या आईला स्वतःच्या आईप्रमाणे जपलं."

"माझ्या घरातील अन्नपूर्णा, भलेही दोन घास कमी खाईल, पण आम्हा कोणाला उपाशी ठेवणार नाही."

"माझ्या मुलांची आई, जिने एक बाप होण्याचं भाग्य माझ्या झोळीत टाकलं."

"माझ्या बहिणींची मैत्रीण, जिने प्रत्येक पावलावर त्यांची साथ दिली."

"माझी जीवनसंगिनी, जिने प्रत्येक सुख-दुःखात माझी साथ दिली. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या कमतरता पूर्ण केल्या. माझ्या प्रत्येक कर्माची साक्षीदार, भागीदार बनली. मला वेळोवेळी पूजलं. वेळप्रसंगी कानपिळणीही केली. अशा माझ्या स्वामिनीची मी आज पूजा करतो." असा म्हणत तो खरंच तिच्या पायाकडे झुकला, तसं तिने लगेच त्याला अडवलं.

"अहो, हे काय करत आहात? कशाला उगाच माझ्यावर पाप चढवत आहात?" ती डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.

"तुझ्या रूपात माझ्या घरात लक्ष्मी आली आहे स्वामिनी. काहीच नाही माझ्याकडे, तरी समाधानाने माझ्याशी संसार करत आहेस. एवढं कोणी करत नाही गं." तो हळवा होत म्हणाला.

"तुम्ही माझ्या इतक्या रूपांचं कौतुक केलं, मग आता मीही तुमच्या प्रत्येक रूपांचे आभार व्यक्त करायला हवेत." ती त्याच्या गालाला हात लावत म्हणाली.

"मी आभार मानेन त्या देवाचे, ज्याने तुमच्यासारखं पुत्ररत्न सासूबाईंच्या पोटी दिलं."

"मी आभार मानेन आईंचे, ज्यांनी हे अनमोल रत्न मला आयुष्यभरासाठी सोपवलं."

"मी आभार मानेन माझ्या मुलांच्या पित्याचे, ज्यांनी मला आई होण्याचं सुख दिलं."

"मी आभार मानेन तुमचे, जे माझ्या आयुष्यात माझे पती म्हणून आलात. माझ्या कोरड्या आयुष्यात ओलावा आणलात. माझ्या प्रत्येक इच्छा जपल्या. माझ्या दुःखांची लकेर मिटवून टाकलीत. तुमच्या या प्रत्येक रूपांच्या मी रोज रोज प्रेमात पडत आहे." इकडे हे आभार प्रदर्शन सुरूच होतं, की मालाबाईंनी बाहेरून आवाज दिला.

"अरे पोरांनो चला लवकर. आरतीची वेळ झाली." त्यांनी बोलावल्यावर हे दोघेही किंचित हसत बाहेर आले.

धूप-दीप लावण्यात आले. तिघांनी मिळून आरती केली. देवीची मनोभावे प्रार्थना केली. मग स्वामिनी आणि मालाबाई फराळाचं करायला बसल्या. निलेश मात्र अजूनही देवीसमोर हात जोडून उभा होता.

'हे जगदंबे, तुझ्या कृपेने सगळं काही आहे आमच्या आयुष्यात. एक सोडून तीन मुलांचं भाग्य दिलंस, पण आता एका मुलीचं सौभाग्य लाभू दे आई.' तो मनातल्या मनात प्रार्थना करत होता, तेवढ्यात स्वामिनीने आवाज दिला.

"अहो, चला ना लवकर. मला भूक लागली आहे." तिने त्याला आवाज दिला, तसं त्याने तिच्याकडे हसून पाहिलं. आपली मान होकारार्थी हलवत येत असल्याचं कळवलं. तशीच त्याची नजर तिच्या ७ महिन्यांच्या गर्भावर पडली. एक सुंदर हसू त्याच्या ओठांवर आलं. त्याने पुन्हा एकदा देवीकडे पाहिलं.

'देवी आई, यावेळी निराश करू नकोस.' पुन्हा एकदा प्रार्थना करून तो नतमस्तक झाला, मग उठून फराळ करायला गेला.


जगात सगळेच लोक मुलगा व्हावा म्हणून देवाला साकडं घालत असतात, मात्र निलेश मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना करत होता. याचाच अर्थ, असेही काही लोक असतात जे मुलीसाठी तरसत असतात.

समाप्त!