माझ्या आयुष्यातील ती भाग ९
मागील भागाचा सारांश: प्रज्ञा प्रेरणाला आपल्या सोबत लायब्ररीत घेऊन गेली होती. प्रेरणाने तिची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी प्रज्ञाकडे मदत मागितली. बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रेरणा व प्रज्ञा मूव्ही बघायला गेल्या होत्या. घरी येण्यापूर्वी प्रेरणाला ऊसाचा रस पिण्याची इच्छा झाली. ऊसाचा रस प्यायल्यामुळे घरी येताच प्रेरणाला शिंका यायला सुरुवात झाली होती. गीता ताई तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या.
आता बघूया पुढे….
मी प्रेरणा व गीता ताईंची आतुरतेने वाट बघत होते. प्रेरणाला नक्की काय होतं? हे मला जाणून घ्यायचं होतं. मी दोघींची वाट बघत हॉलमध्ये बसले होते. साधारण तीन ते चार तासाने प्रेरणा व गीता ताई घरी आल्या होत्या. प्रेरणाकडे तर बघवत नव्हते. प्रेरणाच्या हातावरुन तिला सलाईन लावल्याचे कळून येत होते. गीता ताईंनी तिला धरुन आणले होते. गीता ताई तिला तडक रुममध्ये घेऊन गेल्या.
मीही त्यांच्या पाठोपाठ रुममध्ये चालले होते, तोच मागून बाबांचा आवाज आला,
"प्रज्ञा बॅग भर. मी तुला लगेच गावाला सोडून येतो."
बाबांच्या आवाजात चांगलीच जरब होती. बाबा खूप चिडलेले दिसत होते.
"पण का? मला तर अजून इथे रहायचं आहे." मी सांगितले.
"तू इथे राहशील तर प्रेरणाची तब्येत अशीच बिघडत राहील. मला बाकी काही ऐकायचं नाहीये. आता गुपचूप बॅग भरायची आणि गावी जायचं." बाबांनी जोरात चिडून सांगितले.
बाबांचा आवाज एकदा चढल्यावर त्यांना समजावून सांगणे कठीण होते. मला प्रेरणा सोबत बोलायचं होतं, तिला काय झालं? हे जाणून घ्यायचं होतं, पण ती झोपलेली असल्याने आणि गीता ताई तिच्या शेजारी बसून होत्या, म्हणून मला काही बोलता आलं नाही. मी गुपचूप बॅगमध्ये कपडे भरले आणि बाबांसमोर जाऊन उभी राहिले.
का कोणास ठाऊक? पण त्या दिवशी प्रेरणाला असं सोडून जाताना मनात एक हुरहूर वाटत होती. मी कोणासोबतचं भावनिक रित्या जोडलेले नसल्याने मला याआधी असं कधीच वाटलं नव्हतं. मी बाबांबरोबर गुपचूप गाडीत बसले आणि गावाच्या दिशेने आमची गाडी मार्गस्थ झाली.
माझा दहावीचा निकाल लागल्यावर प्रेरणाला निकाल सांगावा म्हणून गीता ताईंच्या मोबाईलवर फोन केला, पण तेव्हाही प्रेरणा झोपलेली आहे, असा निरोप मला मिळाला. मला प्रेरणा सोबत बोलायचं होतं, पण ते कधीच शक्य झालं नव्हतं.
मी बाबांकडे एक दोन वेळेस प्रेरणाची चौकशी केली होती, पण त्यांच्याकडून खास असं उत्तर मिळालं नव्हतं. माझ्या अकरावीचे कॉलेज सुरु झाल्यावर मी त्यात रमून गेले होते. मला अधूनमधून प्रेरणाची आठवण मात्र येत होती.
माझे अकरावीचे कॉलेज संपून बारावीचे क्लासेस सुरु झाले होते. सकाळच्या वेळेत क्लास असायचे, मग दिवसभर मी घरीच राहत होते. एके दिवशी क्लासवरुन घरी परतल्यावर बाबांची गाडी मला बाहेर उभी दिसली. बाबा येण्यात मला काही विशेष वाटत नव्हतं. बाबा कोणातरी गावकऱ्यासोबत बोलत होते. मी त्यांच्याकडे बघितले सुद्धा नाही. मी पुस्तकांची बॅग ठेवण्यासाठी माझे रुममध्ये गेले. मी माझ्याच धुंदीत होते.
"मी काही दिवस तुझ्या रुममध्ये राहू शकते का?" हा आवाज ऐकल्यावर मी वर बघितले तर प्रेरणा माझ्या बेडवर बसलेली होती. मी हातातील बॅग बाजूला ठेवून तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. मला जो आनंद झाला होता, तो शब्दांत मी मांडू शकत नव्हते.
कोणालातरी बघितल्यावर मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला होता.
"कशी आहेस?" प्रेरणाने मला विचारले.
"मी मजेत. तू कशी आहेस? आणि तू इथे कशी?" मी तिच्यापुढे प्रश्न मांडायला सुरुवात केली.
"अग गीता ताई दोन महिन्यांसाठी त्यांच्या गावी गेल्या आहेत. मुंबईला मी एकटीच राहिले असते, म्हणून बाबा मला इकडे घेऊन आले आहेत. मी दोन महिने इथेच राहणार आहे." प्रेरणाने सांगितले.
मी आनंदीत होऊन म्हणाले,
"अरे भारीच ना. मी तुला माझं गाव दाखवेल. आपण मस्त मजा करुयात."
मी हे बोलत असतानाच बाबा तिथे येऊन म्हणाले,
"प्रेरणाला बाहेरचं काहीच पचत नाही. तिला आग्रह करायचा नाही. मी शांता मावशींना तिची पथ्यं सांगितली आहेत. प्रेरणाची काळजी घ्यायची. ती आपली पाहुणी आहे, हे लक्षात ठेव."
"बाबा घरी नसले की इतकी शांतता असते, पण ते आले की, असे आदेश सुरु होतात." मी हे बोलून फ्रेश व्हायला निघून गेले.
मी यावेळी मनापासून ठरवलं होतं की, काही झालं तरी प्रेरणाला तिला काय झालं होतं? हे विचारायचं म्हणजे विचारायचंच.
मी फ्रेश झाल्यावर आम्ही दोघी खाली जाऊन जेवण केले. शांता मावशींनी प्रेरणासाठी वेगळा स्वयंपाक केला होता, तिच्या ताटात कारल्याची भाजी बघून मलाचं कसंतरी झालं होतं.
संध्याकाळी मी प्रेरणाला घेऊन आमच्या शेतात घेऊन गेले. माझ्या आवडत्या जागी तिला घेऊन गेले. आमच्या शेतालगतचं एक ओढा होता, त्याच्या काठावर जाऊन आम्ही बसलो होतो.
"मला एकांताची गरज हवी असल्यावर मी नेहमी इथे येते. इथे येऊन सगळं काही विसरुन जाते." मी प्रेरणाला सांगितले.
"प्रज्ञा तुला एकटीला रहायला का आवडतं? मी मुंबईत असताना सुद्धा तुझं निरीक्षण केलं आहे, तू एकटीच रमलेली असते. तुला माणसांच्या गोंधळात रहायला आवडत नाही का? बाबांसोबत तुझं जमत नसेल, पण तुला मैत्रिणीही नाहीयेत का? मला वाटलं होतं की, तू मला एखाद्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाशील म्हणून. आपल्या घरी कोणी आल्यावर आपण त्यांना मैत्रिणींकडेचं घेऊन जातो ना." प्रेरणा एकामागून एक प्रश्न विचारत होती.
प्रेरणाच्या प्रश्नांची उत्तरं प्रज्ञा देईल का? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा