Login

माझ्या आयुष्यातील ती भाग ११

Story Of Pradnya And Prerna

माझ्या आयुष्यातील ती भाग ११


मागील भागाचा सारांश: प्रज्ञा एकटी का राहते? ती तिच्या बाबांसोबत फारसं का बोलत नाही? तिला मैत्रिणी आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रज्ञाने प्रेरणाला दिली.


आता बघूया पुढे….


घरी आल्यावर मी व प्रेरणाने जेवण केलं. प्रज्ञाचा चेहरा उदासचं होता. जेवताना आमच्या सोबत बाबाही होते. जेवण झाल्यावर बाबा चिडून म्हणाले,


"प्रज्ञा इतक्या उशिरापर्यंत प्रेरणाला घराबाहेर घेऊन जाण्याची गरज काय होती? तुम्ही जवळपास दोन ते तीन तास बाहेर गेला होतात. प्रेरणाची तब्येत बरी नसते, याची कल्पना तुला आहेच ना. अचानक प्रेरणाला काही त्रास झाला तर इथे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरही नाहीयेत."


मी डोळे मिटले, मलाही खूप राग आला होता, माझ्या चेहऱ्यावरुन ते स्पष्टपणे जाणवत होते. मी जोरात म्हणाले,


"बाबा प्रेरणाला नेमका काय त्रास आहे? याची मला अजिबात कल्पना नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा काही दूध पीत बाळ नाहीये की तिला तिच्या तब्येतीची काळजी घेता येणार नाही. प्रेरणाला आपली शेती बघायची होती, म्हणून मी तिला घेऊन गेले होते. प्रेरणाला घरी लवकर यायचे होते, तर तसं तिने मला सांगायला हवं होतं. 


बाबा तुमच्यासाठी प्रेरणा माझ्यापेक्षा जास्त म्हटतवाची आहे ना. कधी माझ्याबद्दल इतकी कळकळ तुम्हाला कधीच वाटली नाही. मी आजारी असल्यावर कधीच माझ्या रुममध्ये येऊन डोकावला सुद्धा नाहीत. नेमकं तुमच्यात आणि प्रेरणामध्ये असं विशेष काय नातं आहे?" 


"प्रज्ञा तू या भाषेत माझ्यासोबत बोलू कशी शकते? माझ्या आणि प्रेरणाच्या नात्याबद्दल बोलण्याचा तुला अजिबात अधिकार नाहीये. माझ्या डोळ्यासमोरुन आत्ताच्या आत्ता चालती हो." बाबा असं म्हणाल्याबरोबर मी पाणावलेल्या डोळ्याने आपल्या रुममध्ये रागात निघून गेले. 


 बाबाही चिडून त्यांच्या रुममध्ये निघून गेले. प्रेरणा आमच्या दोघांचा विचार करत हॉलमध्ये बसून होती. 


"काय ग पोरी काय विचार करत बसली आहेस?" शांता मावशींनी प्रेरणाला विचारले.


"मावशी हे दोघेजण पहिल्यापासून असेच आहेत का?" प्रेरणाने शांता मावशींना प्रश्न विचारला.


"प्रज्ञा तशी स्वभावाने चांगली आहे, पण तिला कोणाचेच प्रेम मिळाले नाही. आई आजारी असल्याने आईची माया तिला मिळाली नाही. घरात दुसरं कोणीच नव्हतं. साहेब घरी जास्त करुन राहत नव्हते. कधीच त्यांनी पोरीला जवळ घेऊन तिच्याशी मायेने बोलले नाही. आम्हाला आता या सगळ्याची सवय झाली आहे. तू याचा लई विचार करु नकोस." हे बोलून शांता मावशी त्यांच्या कामाला निघून गेल्या.


प्रेरणा बराच वेळ विचार करत तिथे बसली होती. प्रेरणाने मनाशी काहीतरी ठरवले आणि ती बाबांच्या रुममध्ये गेली.


"मी आत येऊ का?" प्रेरणाने दरवाजावर नॉक करुन विचारले.


बाबा रुममध्ये पुस्तक वाचत बसले होते. पुस्तकातून डोकं वर काढत ते म्हणाले,


"हो ये ना. काही हवं होतं का?"


"मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." प्रेरणाने सांगितले.


यावर बाबा म्हणाले,

"हो बोल ना."


"माझ्या सारख्या एका आजारी अनाथ मुलीला तुम्ही तुमच्या घरी घेऊन आलात. मी कधीच पूर्णपणे बरी होणार नाही हे माहीत असताना सुद्धा माझ्यावर उपचार करत आहात. माझी काळजी घेण्यासाठी गीता ताईंची नेमणूक केली. माझ्या तब्येतीची आस्थेने चौकशी करतात. माझ्यासोबत प्रेमाने येऊन बोलतात, मग प्रज्ञा सोबत एवढ्या रागाने का बोलतात? मुंबईला असताना सुद्धा माझ्या इच्छेखातर प्रज्ञा मूव्ही बघायला आली होती. मला ऊसाचा रस पिण्याची इच्छा झाली म्हणून की प्यायले. आताही माझी इच्छा होती, म्हणून आम्ही दोघीजणी बाहेर गेलो होतो. माझ्यावरुन तुम्ही प्रज्ञाला का ओरडला?" प्रेरणा एका दमात बोलून गेली.


"प्रेरणा प्रज्ञाला कोणाचीच किंमत नाहीये. मी तिच्यासाठी इतकं काही करतो, पण तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. एक वडील म्हणून ती मला अजिबात आदर देत नाही. मला तिच्यासोबत बोलण्याची इच्छा होत नाही. एका मुलीने जसं रहायला पाहिजे तसं तिचं वर्तन अजिबात नाहीये." बाबांनी सांगितले.


प्रेरणा मिश्किल हसून म्हणाली,

"मला खरंच यावेळी तुमच्या विचारांची, बुद्धीची कीव येते. तुम्ही प्रज्ञाला कधी वडिलांचे प्रेम दिले का? तुम्ही तिला वेळ दिला का? तिचे कौतुक केले का? प्रज्ञाला आईचे प्रेम मिळाले नाहीच पण तुम्ही तिला वडिलांचे प्रेम तरी द्यायला हवे होते ना. ज्या वयात तिला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज होती, त्या वयात तुम्ही घरी सुद्धा राहत नव्हता. तुमचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे, तुम्ही बाहेरख्याली आहात, हे जेव्हा ती गावातील बायकांकडून ऐकते, तेव्हा तिला त्याचा त्रास होतो. कारण तुम्ही कसेही असला तरी तिचे वडील आहात, हे ती मानते.


फक्त पैसा आणि सुखसोयी पुरवून तुमचे कर्तव्य पूर्ण होत नाही. एकदा तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला का? एकदा स्वतःला हे प्रश्न विचारा. मघाशी तिने काय चुकीचं विचारलं होतं? मला काय झालंय हे तिला माहीतचं नाहीये, तर ती माझी काळजी कशी घेईल? मी कुठून आले? इथे का राहते? तुम्हाला बाबा का म्हणते? याची उत्तरे तिला कोणी दिलीच नाहीयेत. 


प्रज्ञा माझ्याशी अटॅचड होत होती आणि तेव्हाच तुम्ही तिला काही न सांगता गावाला परत घेऊन आलात. प्रज्ञाच्या मनावर या सगळ्याचा काहीतरी परिणाम नक्कीच होत असेल ना. ती मुलगी म्हणून व्यवस्थित वागायला, तुम्ही तिच्याशी कसं वागता? हेही तितकंच महत्त्वाचं आहे.


मी इथे का आहे? मला काय झालंय? या प्रश्नांची उत्तरे मी तिला आत्ता जाऊन सांगणार आहे. मला तुम्ही अडवू नका. मी थांबणार नाही. हात जोडून एकच विनंती करेल की, प्लिज तिच्याशी एकदा प्रेमाने बोलून बघा. तुमच्या दोघांच्या बापलेकीच्या नात्याला महत्त्व देऊन बघा."


बाबांच्या बोलण्याची वाट न बघता प्रेरणा तेथून निघून गेली. बाबा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने बघत राहिले होते. प्रेरणा ही एकमेव व्यक्ती होती, जिने त्यांना आरसा दाखवला होता.


प्रेरणा प्रज्ञाला नेमकं काय सांगेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya dighe








0

🎭 Series Post

View all