माझ्या आयुष्यातील ती भाग १२
मागील भागाचा सारांश: प्रेरणाला जास्त वेळ बाहेर घेऊन गेल्याने प्रज्ञाला तिचे बाबा रागवले होते. प्रज्ञा रागाच्या भरात थोडं बाबांना बोलून गेली. प्रेरणाने प्रज्ञाच्या बाबांना तुम्ही तिच्यासोबत चुकीचं वागत आहात, हे सांगितलं.
आता बघूया पुढे….
प्रेरणा रुममध्ये आली तेव्हा मी पुस्तक हातात घेऊन वाचत बसले होते.
"प्रज्ञा तू ठीक आहेस ना?" प्रेरणाने विचारले.
"मी ठीक आहे. आजच्या दिवस तू इथे झोपू शकतेस. उद्यापासून तू गेस्टरुम मध्ये शिफ्ट हो. मी उद्या शांता मावशींना सांगेल, त्या गेस्टरुम स्वच्छ करुन ठेवतील." मी प्रेरणाकडे न बघता सांगितले.
"तू माझ्यावर का रागावली आहेस? मी काही चुकीचं वागली आहे का?" प्रेरणाने विचारले.
"नाही. मला कोणाशीही जवळीक साधण्याचा हक्क नाहीये. तू अचानक एके दिवशी इथून निघून जाशील. बाबा तुझ्यावरुन मला बोलतात, त्याचं मला काही वाईट वाटत नाही, मला त्या सगळ्याची सवय होऊन गेली आहे. तू जाशील तेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील. मी माझी एकटी खुश आहे." मी तिला सरळ सरळ सांगून टाकले.
यावर प्रेरणा एक मोठा श्वास घेऊन म्हणाली,
"प्रज्ञा मी तर या जगातूनचं जाणार आहे. आता किती दिवसांनी, महिन्यांनी की वर्षांनी जाणार आहे, हे मला माहित नाही. फक्त मी या जगाचा लवकरच निरोप घेणार आहे, हे मला माहित आहे."
"म्हणजे?" मी प्रेरणाचं बोलणं थांबवत तिला प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.
"मला रक्ताचा कॅन्सर झालेला आहे, तो कधीचं बरा होणार नाहीये. मला हे सगळे त्रास त्याचमुळे होतात. मला पथ्यही त्यासाठीच आहेत. मला कारल्याची भाजी बिलकुल आवडत नाही, पण ते माझ्यासाठी फायदेशीर आहे म्हणून मी खाते.
प्रेरणा मी एक अनाथ मुलगी आहे. तुझ्या बाबांची व माझी भेट अनाथाश्रमात झाली होती. माझ्या आजाराबद्दल त्यांना सगळं ठाऊक होतं, पण ते मला त्यांच्या सोबत तेथून का घेऊन आले? हे त्यांनाचं ठाऊक. माझ्या ट्रीटमेंटची जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतली. आता हे सगळं ते का करत आहे? हे मला माहित नाही.
मला घर नव्हतं, ते मिळालं तेवढ्यातच मी धन्यता मानते. मला जास्त कसलीही अपेक्षा नव्हती. तुझ्या बाबांनी मला त्यांना बाबा म्हणायला लावलं. माझ्याकडे दिवस कमी आहेत, म्हणून त्या सगळ्याचा कधीच विचार केला नाही.
तुझी व माझी भेट मुंबईला झाली तेव्हा मलाही छान वाटलं होतं. मला तू माझ्या लहान बहीणी सारखीच वाटत होती. आपल्यात तसं नातं नाहीये, पण माहीत नाही पण त्यावेळी मला तसं वाटत होतं. अचानक तुला बाबा इकडे घेऊन आले आणि तेव्हा आपलं बोलणं अपूर्ण राहिलं.
तुझ्या मनात जे काही आहे, ते मी बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला, ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं, तर ते तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. मी उद्या पासून नाहीतर आजपासूनच गेस्ट रुममध्ये रहायला जाते."
एवढं बोलून प्रेरणा रुममधून बाहेर पडणार तोच मी तिचा हात पकडला आणि तिला मिठी मारली. प्रेरणाच्या आजाराबद्दल ऐकलं आणि मला कसंतरीच झालं होतं. मला त्यावेळी खूप रडायला येत होतं. बिचारी प्रेरणा अनाथासारखं कसं राहत असेल? शिवाय तिला तिच्या आजाराचा किती त्रास होत असेल? ही कल्पना करुन मला खूप वाईट वाटत होते.
"प्लिज प्रेरणा मला माफ कर. तू इथेच माझ्या रुममध्ये रहा." मी हात जोडून म्हणाले.
"मी कुठे जाणारच नव्हते. तू अडवते की नाही? हे चेक करत होते." प्रेरणा हसून म्हणाली.
"प्रेरणा तू काही दिवसांनी या जगातून जाणार आहेस. तुला इतका मोठा आजार आहे, त्यामुळे तुला त्रास होतो, पथ्य पाळावे लागतात. तरीही तुझ्या चेहऱ्यावर स्माईल का असते? तुला ह्या सगळ्याबद्दल वाईट वाटत नाही का?" मी तिला विचारले.
"वाईट वाटून काय करु? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याचा विचार करुन काही उपयोग नसतो. जे आपल्याकडे नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानण्यात मला आनंद मिळतो. मला समजायला लागलं तेव्हापासून मी अनाथ आश्रमात राहत होते. अचानक एके दिवशी मी आजारी पडले आणि मला रक्ताचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. काही दिवसांनी तुझे बाबा येऊन मला त्यांच्या सोबत तेथून घेऊन आले.
अनाथ आश्रमापेक्षा मला इकडे खूप काही मिळालं होतं. जेवण चवदार होतं. झोपण्यासाठी चांगला बेड मिळाला. चांगले कपडे घालायला मिळाले आणि बरंच काही मिळालं. मी त्यातचं समाधान मानलं. पाण्याचा अर्धा ग्लास भरलेला असेल, तर तो रिकामा का आहे? म्हणून टेन्शन घ्यायचे नसते. अर्धा ग्लास भरलेला आहे, यात समाधान मानायचे." प्रेरणा बोलत होती आणि मी मन लावून तिचं बोलणं ऐकत होते.
"मी काही इथे प्रवचन द्यायला बसले नाहीये. चल झोपूयात. उद्या सकाळी क्लास नाहीये का?" प्रेरणा म्हणाली.
"उद्या मला सुट्टी आहे. उद्या मला उशिरापर्यंत झोपायचं आहे. तुही उशिरा उठ. इकडे ऑर्डर सोडायला तुझ्या गीता ताई नाहीयेत." मी सांगितले.
पुढील बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली नव्हती. शांता मावशींनी दरवाजा वाजवला,तेव्हा मला जाग आली. मी दरवाजा उघडल्यावर शांता मावशी म्हणाल्या,
"प्रज्ञा तुमच्या दोघींचं आवरलं की बाबांनी त्यांच्या रुममध्ये तुम्हाला दोघींना बोलावलं आहे."
बाबांचा निरोप देऊन त्या निघून गेल्या. बाबांनी मला का बोलावलं असेल? हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा