माझ्या आयुष्यातील ती भाग १५(अंतिम)
मागील भागाचा सारांश: प्रेरणा व प्रज्ञा ह्या दोघी सावत्र बहिणी असल्याचे त्यांना कळले होते. प्रज्ञाच्या बाबांच्या स्वभावात बऱ्यापैकी बदल होत होता. प्रेरणा व प्रज्ञा कायम एकमेकींच्या संपर्कात राहत होत्या. प्रज्ञाला सुट्टी असताना प्रेरणा, प्रज्ञा व बाबा फिरायला गेले असताना अचानक प्रेरणाची तब्येत बिघडली.
आता बघूया पुढे….
पुढील आठ ते दहा तासानंतर प्रेरणाला शुद्ध आली होती. प्रेरणाला बोलता येत नव्हते, तिला कमालीचा अशक्तपणा आलेला होता. प्रेरणाला पुढील आठ ते दहा दिवस ऑब्जर्वेशन खाली ठेवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रेरणाकडे बघवत नव्हते. तिला होत असणारा त्रास जाणवत होता. अशाही परिस्थितीत तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती.
गीता ताई प्रेरणा सोबत हॉस्पिटलमध्ये थांबायच्या. मी दिवसभर असायचे, मात्र रात्रीची घरी जायचे. प्रेरणाला एंटरटेन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. एके दिवशी मी प्रेरणा सोबत गप्पा मारत असताना डॉक्टर तिच्या तपासणीसाठी आले, तेव्हा प्रेरणा डॉक्टरांना म्हणाली,
"माझ्याकडे अजून किती वेळ आहे? मला अजून थोडे दिवस जगायचं आहे. इतक्या दिवस मला कोणीच नव्हतं, तेव्हा मी कोणत्याही क्षणी डोळे मिटले तरी चालले असते, पण आता मला एक लहान बहीण आहे. मी गेल्यावर तिचं कसं होईल? याची काळजी मला आहे."
प्रेरणाचं बोलणं ऐकून माझ्या तर डोळयात लगेच पाणी आले. प्रेरणाच्या बोलण्यावर डॉक्टर तिला धीर देऊन निघून गेले. प्रेरणाकडे खरंतर किती वेळ आहे, हे कोणीच सांगू शकणार नव्हते. डॉक्टर निघून गेल्यावर मी तिला म्हणाले,
"तू माझी काळजी करु नकोस. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. मला एकटी रहाण्याची सवय आहे."
यावर प्रेरणा म्हणाली,
"प्रज्ञा तू स्वतःशी खोटं बोलू शकतेस, पण माझ्याशी नाही. तू दररोज हॉस्पिटलमध्ये येतेस ना, तेव्हा डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करते, ते मला कळतं. प्रज्ञा एखाद्या बद्दल आपल्या मनात प्रेम आहे, तर उघडपणे सांगावं ग. तुला कोणाची तरी गरज आहे, हे मान्य करावं. हे कमकुवतपणाचं लक्षण नाहीये. अशी सगळ्यांपासून तुटक वागून तुला शेवट काय मिळणार आहे? प्रत्येकवेळी समोरच्याने आधी व्यक्त होणे गरजेचे नाहीये, कधीकधी तुही आधी व्यक्त झालीस तर काय प्रॉब्लेम आहे?
आता बाबाही तुझ्याशी व्यवस्थित वागत आहेत. बाबांच्या हातून ज्या चुका झाल्या असतील, त्या आपण दोघीही विसरणार नाहीत, पण त्याची शिक्षा आधीच त्यांना मिळाली आहे. आपण त्यांच्याशी कसही वागलं तरी त्याचा परिणाम आपल्यावरही होणार आहे. प्रज्ञा आपल्या डोक्यावर त्यांच्यामुळे छत आहे. आपल्या मूलभूत गरजा त्यांच्यामुळे पूर्ण होत आहेत. एकदा अनाथ आश्रमात जाऊन चक्कर मार म्हणजे तुला या सगळ्याची किंमत कळेल.
अनाथ आश्रमावरुन आठवलं. माझा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे. मी माझा प्रत्येक वाढदिवस आश्रमात जाऊन साजरा करते. मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार आहे. मी तुझ्याकडे एक लिस्ट देते, त्या सगळ्या गोष्टी तू मला आणून देशील. आश्रमात जाताना रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही. या वर्षी तुही माझ्यासोबत आश्रमात येणार आहेस."
प्रेरणाने दिलेल्या लिस्टप्रमाणे मी सगळ्या वस्तू आणल्या. प्रेरणा घरी आल्यावर थोडी बरी झाली होती. प्रेरणाच्या इच्छेखातर मी कारल्याची भाजी खायला सुरुवात केली होती. आजरोजी कारल्याची भाजी माझी फेव्हरेट झाली आहे.
प्रेरणाचा वाढदिवस आम्ही आश्रमात जाऊन साजरा केला होता. प्रेरणाचं म्हणणं खरं होतं. तेथील मुलांची अवस्था बघितल्यावर आपण किती सुखी आहोत, हे त्यावेळी जाणवलं.
मी मुंबईच्या कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेतले होते. प्रेरणा व आम्ही दोघी आता एकत्रच राहत होतो. कॉलेजवरुन आल्यावर दिवसभरात काय काय घडलं? हे मी तिला सांगायचे. आमच्या दोघी बहिणींचं गुळपिट चांगलंच जमलं होतं. गीता ताईंचे नियम आता वेगळे काही वाटत नव्हते. प्रेरणा व गीता ताईंमुळे मला चांगल्या सवयी लागल्या होत्या.
प्रेरणा दाखवत नसली तरी तिची तब्येत खालावत चालली होती. प्रेरणाच्या बकेट लिस्टमधील काही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. पुढील सहा महिन्यांनी प्रेरणा अचानक एके दिवशी हे जग सोडून गेली.
प्रेरणाची कमी खूप जाणवत होती, पण जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही, याची जाण मला होती. खरंतर प्रेरणा माझ्या आयुष्यात कमी कालावधीसाठी आली होती, पण तिने मला पूर्णपणे बदललं होतं. बाबा आणि माझं नातं बदलून गेली होती. नात्यांची किंमत करायला ती शिकवून गेली होती.
प्रेरणा माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती होती. प्रेरणाच्या दर वाढदिवसाला मी अनाथ आश्रमात जाऊन तिचा वाढदिवस साजरा करते."
प्रज्ञाचं बोलून झालं होतं. प्रज्ञाच्या डोळयात पाणी आणि चेहऱ्यावर स्माईल होती.
निलम तिच्याकडे बघून म्हणाली,
"प्रज्ञा तू जेव्हा प्रेरणा बद्दल एकेक गोष्ट सांगत होती ना, तेव्हा मला प्रेरणाला भेटण्याची इच्छा झाली होती. पण शेवटी कळलं की, प्रेरणा या जगात नाहीये. तुझ्या आयुष्यातील ती व्यक्तीही खास होती आणि तुही खास आहेस."
समाप्त.
प्रज्ञाच्या आयुष्यातील खास व्यक्ती जशी प्रेरणा होती, तशीच खास व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. ती व्यक्ती कोणीही असू शकते. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपल्यात बरेच बदल करुन जाते. आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून जाते. अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर तिचे आभार मानायला विसरु नका.
माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली? हे कमेंट करुन नक्की कळवा.
धन्यवाद.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा