माझ्या आयुष्यातील ती भाग २
मागील भागाचा सारांश: प्रज्ञाने एक महिना आधी हाफ डे साठी ऍप्लिकेशन केलेले होते. तिचा हाफ दे मंजूरही झाला होता, पण मिटिंग असल्याने प्रोजेक्ट हेड राखी तिला ऑफिस मधून निघू देत नव्हती. दोघींमध्ये बाचाबाची झाल्यावर मेहता सर मध्ये पडले व त्यांनी प्रज्ञाला ऑफिस मधून निघण्याची परवानगी दिली.
आता बघूया पुढे….
प्रज्ञाचा चिडलेला चेहरा आठवून, ती राखी मॅडमला काय बोलून गेली? ह्याचा विचार निलम करत बसली होती. तेवढ्यात मेहता सरांनी निलमला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.
"मे आय कम इन सर." निलमने सरांच्या केबिनमध्ये जाण्याआधी परवानगी घेतली.
"यस कम इन. बस ना." आपल्या समोरील खुर्चीकडे बोट करत मेहता सर म्हणाले.
"सर माझ्याकडे काही काम होतं का?" निलमने विचारले.
मेहता सर म्हणाले,
"विशेष असं काही नाही. तू प्रज्ञाची जवळची मैत्रीण आहेस ना, म्हणून तुला मी बोलावलं. प्रज्ञा जवळपास तीन वर्षे मुंबईच्या ब्रँचमध्ये नोकरीला होती, तेव्हापासून मी तिला ओळखत आहे. ती अतिशय सिंसीअर मुलगी आहे. इथे पुण्याच्या ब्रँचमध्ये तिला एक वर्ष पूर्ण होईल.
प्रज्ञाने एक महिना आधी हाफ डे साठी ऍप्लिकेशन दिले होते, त्यामुळे आज तिला कोणीच अडवू शकत नव्हतं. राखी तिथे चुकलीचं. पण आज असं काय महत्त्वाचं काम होतं की, ती नोकरी सोडायला एका पायावर तयार होती. एरवी प्रज्ञा अजिबात अशा अरेरावीच्या भाषेत बोलत नाही. तुला तिचं काम माहीत असेलचं."
यावर निलम म्हणाली,
"सर मीही त्याचाच इतक्या वेळ विचार करत होते. प्रज्ञाला मी गेल्या वर्षापासून ओळखत आहे, पण प्रज्ञा म्हणजे एक कोडं आहे. ती कधी काय बोलेल, याचा काही नेम नसतो. आज काय आहे? याचं उत्तर तिने मला दिलंच नाही, पण जाताना आज रात्री घरी ये, मग तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असं सांगून गेली."
"मी जनरली स्टाफच्या व्यक्तिगत आयुष्या बाबतीत विचार करत नाही. प्रज्ञाच्या वर्तनावरुन मला प्रश्न पडला होता, म्हणून मला वाटलं तुला माहीत असेल. प्रज्ञाला यातील काही बोलू नकोस. उगीच तिचा गैरसमज व्हायचा." मेहता सर म्हणाले.
निलम म्हणाली,
"नाही सांगणार. सर राखी मॅडमने मिटिंग ठेवली आहेत, वेळेत कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलं नाहीतर प्रज्ञाचा संपूर्ण राग माझ्यावर काढेल. मी जाऊ का?"
"तू जा, पण थोडा उशीर झाल्यावर राखी काहीच बोलणार नाही. प्रोजेक्ट हेड झाल्यामुळे तिला माज चढला होता, तो मी उतरवला आहे. आज तिच्यामुळे प्रज्ञा सारखी एक एफिशियंट एम्प्लॉई ऑफिस मधून गेली असती." मेहता सरांनी सांगितले.
निलम मेहता सरांची परमिशन घेऊन कॉन्फरन्स हॉलमध्ये गेली. मेहता सरांनी सांगितल्या प्रमाणे राखी एकदम शांत झालेली होती.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर निलम आपल्या घरी गेली. फ्रेश होऊन, कपडे बदलून आईला सांगून ती प्रज्ञाच्या घरी गेली.
निलमला दारात बघून प्रज्ञा म्हणाली,
"तू लगेच आलीस सुद्धा. मी तुला रात्री बोलावलं होतं."
"मी इथूनचं परत जाऊ का?" निलमने विचारले.
"आता आली आहेसचं तर आत ये. अग मी आत्ता काही वेळापूर्वी आले. अजून फ्रेशही झाले नाही. मी फ्रेश होते, तोपर्यंत चहा करते का? मला जाम कंटाळा आला आहे ग." प्रज्ञा घरात जाता जाता म्हणाली.
घरात गेल्यावर निलम म्हणाली,
"आता तुझा हुकूम आहे म्हटल्यावर मला पाळावा लागेल. तू मला हे सांगणार आहेस, त्यासाठी किती वेळ लागणार आहे? चहा पिता पिता सांगशील ना? की स्वयंपाकही करायला सांगशील. एकतर तू डोक्यात दुपार पासून पिल्लू सोडून आली आहेस."
यावर प्रज्ञा हसून म्हणाली,
"निलम तू पण ना. उद्या शनिवार आहे, सो आपल्याला सुट्टी आहे, तर काकूंना फोन करुन तू रात्री इथेच थांबणार असल्याचे सांग. मला हे सांगायचं आहे, ते ऐकायला रात्रही अपूरी पडेल. तुला पूर्ण ऐकल्याशिवाय झोप येणार नाही, हे मला माहित आहे. आज रात्रीचं जेवण आपण ऑर्डर करुयात. तुला बनवायला सांगणार नाही."
"रात्रही अपूरी पडेल, असं तू काय सांगणार आहेस?" निलमने आश्चर्याने विचारले.
"निलम डार्लिंग इतनी देर रुके और थोडी देर रुको. आखीर सब्र का फल मिठा होता हैं." प्रज्ञा हसून बोलून फ्रेश होण्यासाठी निघून गेली.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा