माझ्या आयुष्यातील ती भाग ३
मागील भागाचा सारांश: प्रज्ञा २५ ऑगस्टला नेमकं काय असतं? आणि ती हाफ डे घेऊन कुठे गेली होती? हे सांगण्यासाठी तिने निलमला घरी बोलावले होते. निलमलाही ते ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतो, म्हणून ती प्रज्ञाच्या घरी गेली.
आता बघूया पुढे….
प्रज्ञा फ्रेश झाली, मग निलमने बनवलेल्या चहाचा तिने आस्वाद घेतला.
"निलम थँक् यू सो मच यार. आपण थकून आल्यावर असा आयता चहा प्यायला मिळाला ना, तर जाम भारी वाटतं. तुझी आई घरी असल्याने तुला हे सुख दररोज मिळत असेल, पण माझ्या नशिबात ते सुखचं नाहीये." प्रज्ञा म्हणाली.
"प्रज्ञा तुझं विनाकारण बोलणं संपलं असेल, तर मूळ विषयावर येशील का? आज असं काय होतं? की ज्यासाठी एका महिन्यापूर्वी हाफ डे टाकला होता. तू राखी मॅडम सोबत वरच्या आवाजात का बोललीस? कंपनी सोडण्याची भाषा का केलीस? आज विशेष असं काहीतरी नक्कीच असेल, कारण तू ह्या टोकाचं त्या शिवाय बोललीच नसती." निलम म्हणाली.
यावर प्रज्ञा म्हणाली,
"अग हो मी तुला सांगणारचं आहे. त्यासाठी तर तुला घरी बोलावलं आहे. निलम खूप कमी दिवसात आपल्यात खूप चांगली मैत्री झाली आहे. तुला माझ्या बाबतीत जवळपास सगळंच माहीत आहे. माझा स्वभाव, माझ्या आवडीनिवडी. माझे आई वडील कोण होते? ते कुठे राहत होते? याची थोडी फार कल्पना तुला आहेच, पण माझ्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती होती, त्या व्यक्ती बद्दल तुला काहीच माहिती नाहीये.
मी जनरली त्या व्यक्ती बद्दल कोणालाच सांगत नाही. तू मला समजून घेतेस, म्हणून मी तुला त्या व्यक्ती बद्दल सांगणार आहे."
प्रज्ञा बोलत असताना मध्येच निलम म्हणाली,
"अच्छा तर तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती. मला वाटलं होतं की, तू कधीच प्रेमात पडली नसशील. तू इतकी स्ट्रेट फॉरवर्ड आहेस की, कोणालाच तू आवडली नसशील. मला आज प्रज्ञा मॅडमच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती समजणार आहे.
प्रज्ञा पण तू त्या व्यक्ती बद्दल कोणाला काहीच का सांगितलं नव्हतं? म्हणजे मला ते कळालं नाही. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती सगळ्यांना कळली तर प्रॉब्लेम काय आहे?"
"तू सगळं स्वतःच ठरवून टाकलं आहेस का? माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. तू इतरांसारखाच विचार करत आहेस. हो हे खरं आहे की, माझं त्या व्यक्तीवर खूप प्रेम होतं, आहे आणि राहिलं. त्याही व्यक्तीचं माझ्यावर खूप प्रेम होतं.
माझा जो स्वभाव आहे ना, ज्याला तू स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतेस म्हणजे आपल्या सामान्य भाषेत फटकळपणा. माझ्या त्या स्वभावामुळे माझे खूप कमी मित्र मैत्रिणी होते. मला समजून घेणारी पहिली व्यक्ती ती होती. तिला न बोलताही माझ्या मनातील सर्व काही कळत होतं. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात कशी आली? हे सांगण्यापूर्वी माझ्या आयुष्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी तुला माहीत असाव्यात.
मी त्या व्यक्तीबद्दल कोणालाच सांगत नाही, कारण मी त्या व्यक्तीबद्दल बोलताना खूप इमोशनल होते. काही गोष्टी आपल्या आयुष्यातून गेल्यावर त्यांची किंमत तेव्हा आपल्याला जाणवते. आपण सगळ्यांना गृहीत धरत असतो आणि इथेच आपलं चुकतं." बोलता बोलता प्रज्ञाला भरुन आल्यामुळे ती थांबली.
प्रज्ञाच्या डोळ्यातील पाणी बघून निलम म्हणाली,
"प्रज्ञा तू ठीक आहेस ना? आपण या विषयावर नंतर बोलूयात का? तुझ्या डोळयात पाणी बघण्याची सवय नाहीये ग. एका स्ट्रॉंग मुलीच्या मागे ही हळवी मुलगी असेल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्या हट्टासाठी तू स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस."
"मी कधी रडतच नव्हते ग. लहानपणापासून आयुष्यात इतकं काही घडून गेलंय की, आपली इमोशनल अटॅचमेन्ट कोणाशी होऊ शकते असं वाटलंच नव्हतं. मी ना प्रॅक्टिकल तत्वावर जगणारी मुलगी होते. माझी आई वारली तेव्हा मी अवघ्या सात वर्षांची होते. मला कळायला लागल्यापासून आई आजारी असल्याने ती एका बेडला खिळलेली होती, त्यामुळे एका आईचं प्रेम, माया काय असते? हे मला कधीच कळलं नाही. ती गेल्यावर घरातील एक व्यक्ती गेली एवढंच वाटलं. मी त्यावेळी रडलेही नव्हते.
माझ्या बाबांचा स्वभाव माझ्यासारखाचं फटकळ असल्याने आमच्या दोघांचं कधी काही पटलंच नाही. तसेही बाबा कामानिमित्ताने जास्तीत जास्त काळ घराबाहेरचं रहायचे, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये भावनिक असा बॉण्ड कधी निर्माण झालाचं नाही.
आपल्या लोकांसोबत असणारा भावनिक बॉण्ड काय असतो? हे कधीच मला कळले नव्हते. शाळेतून आल्यावर आपल्या खोलीत जाऊन पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे या सवयींमुळे मी एकलकोंडी होऊन गेले होते. आयुष्यात आपल्या सोबत पुस्तकं असली, तरी बस झालं. मला कोणाच्याच सोबतीची गरज वाटत नव्हती.
नाती,कमिटमेंट या गोष्टींचा आणि माझा दूरदूरचा संबंध नव्हता. ज्या व्यक्तीमुळे मला नाती, कमिटमेंट, भावनिक बंध ह्या शब्दांचा खरा अर्थ कळला, त्या स्पेशल व्यक्तीचा आज वाढदिवस होता. ती व्यक्ती इतकी स्पेशल आहे की वाढदिवस सुद्धा हटके पद्धतीने साजरा करावा लागतो. तो वाढदिवस साजरा करण्यासाठीचं आज मी हाफ डे घेतला होता आणि इथून पुढे दरवर्षी घेत जाईल.
मागच्या महिन्यात मेहता सरांनी कंपनीच्या कामासाठी जर्मनीला जाण्याची ऑफर दिली होती, ती आजच्या दिवसामुळे मी नाकारली होती."
२५ ऑगस्टला काय असते? याचं उत्तर तर आपल्याला मिळालं आहे. पण प्रज्ञाच्या आयुष्यातील ती स्पेशल व्यक्ती कोण आहे? ते जाणून घेऊया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा