Login

माझ्या आयुष्यातील ती भाग ६

Story Of Pradnya And Prerna
माझ्या आयुष्यातील ती भाग ६

मागील भागाचा सारांश: प्रेरणा प्रज्ञा सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रज्ञा तिच्या सोबत रागातचं बोलत होती. गीता ताईंनी प्रज्ञाला घराचे नियम सांगितले.

आता बघूया पुढे….

जेवणाची वेळ झाल्यावर प्रेरणा माझ्याकडे बघून म्हणाली,
"प्रज्ञा जेवायला चल."

मी पुस्तक वाचत बसले होते, म्हणून मला वेळ लक्षातचं आली नव्हती. मलाही भूक लागली होती, म्हणून मीही प्रेरणा सोबत जेवायला गेले. डायनिंग टेबलवर बसल्यावर गीता ताई म्हणाल्या,
"जेवढं पाहिजे तेवढं जेवण ताटात वाढून घे. ताटात उष्ट अन्न टाकलेलं या घरात चालत नाही."

मी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ताटात पोळी वाढून घेतल्यावर भाजी बघितली तर कारल्याची भाजी होती. मी लगेच म्हणाले,
"शी कारल्याची भाजी कोणी खातं का?"

यावर गीता ताई चिडून म्हणाल्या,
"प्रज्ञा अन्नाला कोणी असं बोलतं का? कारल्याची भाजी शरीरासाठी चांगली असते."

"पण मला आवडत नाही. मला दुसरी भाजी पाहिजे. वरण भात का बनवला नाही? आमच्याकडे दररोज रात्री जेवणात वरण भात असतो." मी मोठ्या आवाजात म्हणाले. 

"इथे रात्री वरण भात नसतो. दुपारच्या जेवणात वरण भात खायला मिळेल. रात्रीच्या वेळी भात खाल्लेला चांगला नसतो. तुला कारलं आवडत नसेल, तर रस्सा खा. बाकी वेगळं काही मिळणार नाही." गीता ताईंनी सांगितले.

मला जाम राग आला होता, पण पोटात भूक लागल्याने मी अर्धी पोळी व थोडा रस्सा खाऊन उठले. प्रेरणा मस्त कारल्याच्या भाजीचा आनंद घेत जेवत होती. माझं पोट भरलं नव्हतं. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. बाहेर जाऊन काही खावं म्हटलं, तर तो एरिया माझ्यासाठी नवीन होता.

प्रेरणाचं जेवण झाल्यावर ती रुममध्ये आली व म्हणाली,
"प्रज्ञा मी खाली वॉकला चालली आहे. माझ्यासोबत चल."

"इथे माझ्या पोटात काही नाहीये. मी वॉक करायला येऊन काय करु? मला यायचं नाहीये." मी सांगितले.

प्रेरणाने पुढं काही न बोलता माझा हात धरुन मला हॉलमध्ये आणलं. गीता ताई समोर बसलेल्या होत्या.

"ताई मी आज प्रज्ञाला माझ्यासोबत वॉकला घेऊन जाते. आम्ही एक तासात परत येतो." प्रेरणाने सांगितले.

"हो चालेल. तुझ्यामुळे हिला चांगल्या सवयी तर लागतील." गीता ताईंनी टोमणा मारला.

प्रेरणाने खाली येईपर्यंत माझा हात सोडला नाही. खाली आल्यावर मी तिचा हात झिडकारला.

"तुझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला आहे. मला त्याची कल्पना आहे. तुझी चिडचिड त्यामुळेचं चालू आहे, हे मला कळलंय. गुपचूप माझ्यासोबत चल." प्रेरणाने सांगितले.

प्रेरणा पुढे व मी मागे असे आम्ही चाललो होतो. बिल्डिंगच्या थोडं पुढे आल्यावर एक चायनीज हॉटेल होते, तिथे प्रेरणा गेली. मीही तिच्या पाठोपाठ गेले.

"आपल्याकडे वेळ कमी आहे. तुला जे आवडत असेल, ते पटपट ऑर्डर कर." प्रेरणाने सांगितल्यावर मी पटकन ऑर्डर दिली. 

"प्रेरणा तुला काही हवंय का?" मी तिला विचारले.

"नको. मी पोटभर जेवण केलं होतं." प्रेरणाने हसून उत्तर दिले.

प्रेरणाच्या चेहऱ्यावरील हास्य बघून मी म्हणाले,
"तुला हसायला काय झालंय?"

"तू आल्यापासून माझ्या सोबत चिडून बोलत आहेस. आत्ता एकदम नॉर्मल बोललीस म्हणून हसायला आलं." प्रेरणाने सांगितले.

"सॉरी." मी पटकन बोलले.

"तो हिशोब आपण नंतर करु. पटकन तू खाऊन घे." प्रेरणा बोलल्यावर मी खाण्यावर ताव मारला. माझं खाऊन झाल्यावर प्रेरणाने बिल दिलं. मी जाताना पैसे घेऊन गेलेच नव्हते.

हॉटेल मधून निघताना प्रेरणा म्हणाली,
"आपल्याकडे अजून वीस मिनिटे आहेत. तेवढ्या वेळ वॉक करुन मग घरी जाऊयात."

आम्ही दोघी चालता चालता गप्पा मारत होतो.
"तू गीता ताईंना घाबरते का?" मी विचारले.

"घाबरते असं नाही, पण आपल्या सर्वांना एक प्रकारची शिस्त असायला हवी. गीता ताई जे बोलतात ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतात." प्रेरणाने उत्तर दिले.

"तुझं शिक्षण किती झालं आहे?" माझा पुन्हा प्रश्न आला.

प्रेरणा म्हणाली,
"माझी दहावी झाली आहे. यावर्षी बारावीचा अभ्यास करते आहे. मी बाहेरुन बारावीची परीक्षा देणार आहे."

"म्हणजे तू माझ्यापेक्षा मोठी असशील ना?" मी म्हणाले.

"हो, तुझ्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी मी मोठी असेल." प्रेरणा म्हणाली.

"तू कॉलेजमध्ये जाऊन शिकत का नाहीस?" माझा पुढील प्रश्न हजर होता.

"माझ्या बद्दल सगळं काही लगेचच जाणून घेणार आहेस का? आपण या विषयावर नंतर बोलूयात. बरं ऐक दररोज मी तुला चायनीज किंवा बाहेरचं खायला घेऊन येणार नाही. तुझ्यासाठी हे सगळं नवीन होतं,म्हणून आज मी तुझी मदत केली होती." प्रेरणाने अगदी सहज प्रश्न टाळून विषय बदलवला होता.

पुढील काहीवेळ अश्याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वॉक करुन आम्ही दोघी घरी परतलो. पोटभर खाल्ल्याने झोप येत होती, म्हणून मी प्रेरणा सोबत काही न बोलता झोपून घेतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर मी बघितले, तर प्रेरणा तिच्या जागेवर नव्हती. मला वाटलं हॉलमध्ये असेल, म्हणून मी ब्रश करुन हॉलमध्ये गेले, तर ती तिथेही नव्हती. गीता ताईही घरात दिसत नव्हत्या. 

मी डायनिंग टेबलवर जाऊन बसल्यावर स्वयंपाक बनवणाऱ्या मावशींनी मला चहा नाश्ता आणून दिला. प्रेरणा कुठे गेली असेल? हा प्रश्न मला त्यावेळी सतावत होता.