(मनोगत- मखमली कवडसा ही मालिका एक अशी कथामालिका आहे ज्यातली प्रत्येक कथा किंवा ललित हे वेगळं आहे त्याचा एकमेकांशी संबंध नाही पण त्यांना जोडणारा धागा एकच आहे. मनातल्या रेशमी कप्प्यातली ती सुखद भावना जिला मी मखमली कवडसा असं नाव दिलंय.
यात आठवणींचे काही कवडसेही असतील . . कुठलीच कथा पुर्ण कथा म्हणून समोर येणार नाही.? त्यातला तो रेशमी व मखमली कवडसा तुम्हाला अनुभवायचा आहे. . इतकच!
वाचून प्रतिक्रिया नक्की द्यावी.?
प्रोत्साहनाच्या प्रतिक्षेत- सखी)
तो आलाय की नाही पाहण्यासाठी त्याच्या घराकडेच निघाले, घरातलंयाच कपड्यानिशी, सहजच अंगावर एक शाल लपेटून! त्याच्या घरासमोरून "सहज" चक्कर टाकण्याचा बेत बाद झाला कारण तो समोरच दिसला , त्याच्या अंगणात उभा!
मी येण्यापूर्वी त्याच्या मनात उद्भवलेल्या वादंगापासून अनभिज्ञ ! त्याच्या मनातली उलथापालथ तोच जाणो अन माझ्या मनातली. .. मीच ! चौकशीच्या औपचारिक चार ओळी संपल्या की तो निर्धाराने म्हणाला "आत चल!" एकटक पहात . मी सरळ मनाने त्याच्या पावलासोबत पाऊल टाकीत आले. समोरून त्याची आई कसलंसं भांडं घेवून येत होती. दोघांना एकत्र येताना पाहून तिने रागाने पातेलं पटकलच जणु. . . .खाली ठेवलं! त्याच्या मनाचा निर्धार जणु त्याच्या हातात उतरला. माझ्याही नकळत त्याने त्याच्या हातांचा आधार माझ्या खांद्यांना दिला. एक हात पाठीमागून खांद्यावर होता , त्याचा तो हक्क दाखवणं? मी विना तक्रार पाऊल पुढे ठेवत होते , त्याच्या डोळ्यात पहात पहात. .
त्याने खांद्यावर हलकासा दबाव दिला, म्हणाला" अशीच चल " मी यंत्रवत चालत राहिले, त्याच्याकडे पहातच उंबरा ओलांडला होता , पुढचं पाऊल पडलं अन . . पाय अडखळला .माझ्या पायाच्या धक्क्याने पातेल्यातले तांदूळ घरभर पांगले होते, पापणी लवेपर्यंत!
मी क्षणभर चरकलेच, त्याने मात्र मला तसंच पुढे नेलं, माझ्या चेहर्यांवरच्या प्रश्नचिन्हांसहित, निर्विकार चेहर्यांने, दीर्घ श्वास सोडून मनाशीच पुटपुटला " थँक गॉड. . मनासारखच झालं!"
"हे सगळं काय चाललंय?" माझा इतकाच खुळा प्रश्न .
तो हसतमुखाने वदला. . " घरात येताना तांदळाचं माप ओलांडून आलीस. . पहा ना. . ऄता परत जाता येणार नाही . तू ठरवलंस तरीही! तू आता या घरची लक्ष्मी झालीयस! कळंलं ?"
या अनपेक्षित उत्तरासरशी, अघटित, अकल्पित घडलेल्या चाहूलीने मी भिरभिरले! भेदरूनच वळून पाहिलं. . .
कुणीतरी खट्याळपणे माझ्या शालची गाठ त्याच्या खांद्यवरच्या पंचाशी बांधली होती. . . आता मात्र मी अडखळले. . .
पाऊल पुढे टाकावं तर त्याची खोली होती, परतावं तर खाली तांदूळ होते अन ती गाठ! . . तिथेच थबकले तर शेजारी तो होता, त्याची नजर तर . . . असह्यच . . जीवघेणी पण हुकमी!
त्याक्षणी तिथेच एक प्रसंग आठवला, बालपणी आम्ही भातुकली खेळायचो. लुटुपुटूचा संसार मांडायचो. . सारं कसं खोटं खोटं!
एकदा बाहूलीचं लग्न केलं होतं , तेव्हा त्या बाहुला बाहुलीला कडेवर घेवून आम्हीच सात फेरे घातले होते आणि हारही आम्हीच घालून घेतले होते! तेव्हा सप्तपदी अन मंगलाष्टकाचं महत्व कळायचं नाही.
सगळ्या मित्रमैत्रिणी कितीतरी दिवस चिडवत होते. . . कालांतराने आम्ही दुरावलो अन या दुनियादारीत त्या आठवणींवर जणु धूळ जमली, तीव्रता धूसर झाली.
आज अचानक जाणवलं , तोच छोटासा, मोहक , अनुभव किंवा आठवण , मनातल्या मखमली घडीखाली त्यानेही दडवला होता तर. . माझ्याप्रमाणेच!. . त्याच्या मनातलाही तोच मोरपिसारा! बस्स आज जणु तो मखमली कप्पा अलगद उलगडला गेला इतकंच!
" एकटी बसलीस की कुठे हरवतेस गं हल्ली? बघ कोण आलंय ? "
बाबांच्या आवाजाने भानावर आले अन पाहते तर मी माझ्या अंगणात ओट्यावर बसलेली. . बाबा बाजूला अन् तो. . . माझा राजकुमार समोर उभा, हाताची घडी घालून मिश्किल हसत!
©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - १८. ०१ .२१
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा