मक्याचे वडे
साहित्य : २-३ मक्याचे कणीस (गावरान), जिरं, मोहरी, तीळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, बेसन, खाण्याचा सोडा, तेल, लिंबू, मीठ.
कृती : गावरान मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेऊन स्वच्छ धुवून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे. जाड बुडाच्या कढईत दोन मोठे चमचे तेल चांगले गरम झाले की त्यात जिरं, मोहरी, तीळ, ५-६ हिरव्या मिरचीचे तुकडे, हळद, गरजेनुसार तिखट घालून त्यात वाटण घालायचे. उपम्याप्रमाणे या सर्व मिश्रणाला छान वाफ येऊ द्यायची. मिश्रण फार कोरडे आणि भगराळ वाटले तर त्यात थोडेसे मक्याचे पीठ (वाळलेल्या मक्याचे पीठ/कॉर्न फ्लोअर) घालून परतायचे. तसेच त्यावर पाण्याचा शिपका मारून मंद आचेवर चांगले वाफवायचे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे. उपमा तयार झाला की त्यावर अर्धे लिंबू पिळून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकून ठेवायचे. एका भांड्यात दीड वाटी बेसन पीठ घ्यायचे. त्यात तिखट, मीठ, हळद आणि पाव चमचा सोडा घालून घट्टसर भिजवायचे. कढईत दोन वाटी तेल घालून चांगले कडकडीत तापवायचे. उपम्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून भिजविलेल्या बेसन पिठावर घोळून घेऊन तेलात सोडायचे आणि मंद आचेवर तळायचे. सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात स्टार्टर म्हणून हा मेनू एक वेगळीच लज्जत आणतो. शिवाय दाणे काढून तयार असले तर २० ते २५ मिनटात अगदी भरपूर वडे तयार होतात. ही माझ्या स्वयंपाकातील प्रयोगातून आणि माझ्या निर्मितीतून आलेली रेसिपी आहे. मक्याचे कणीस हे अत्यंत पौष्टिक असून त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते. वयस्कर मंडळी मक्याचे कणीस खाणे टाळते मात्र या वड्यांमुळे त्यांच्या आवडीच्या मक्याच्या कणसाचा त्यांना एका वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेता येतो. शिवाय हे वडे फार तेलकट होत नाहीत त्यामुळे हा पौष्टिक आणि चटकदार असा मेनू घरातील अगदी सर्वांना भावतो.
निराळी ही रेसिपी... स्वाद अगदी चटकदार...
मक्याच्या दाण्याचा वडा... सर्वाँना आवडेल फार फार...!
©®तृप्ती काळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा