Login

मला हे लग्न मान्य नाही. भाग - १

एका हाताने टाळी वाजत नाही.
मला हे लग्न मान्य नाही. भाग - १

"शिवानी, आज तुला बघायला पाहुणे येणार आहे. ही घे माझी साडी नेस आणि छान तयार हो. तू इतकी छान दिसली पाहिजे की बघताच क्षणी तुला त्या मुलाने पसंत केले पाहिजे." शिवानीची आई चित्रा तिला म्हणाली. तसं शिवानी लाजली. त्यावर तिला तिची लहान बहिण रेवा लगेच चिडवू लागली.

शिवानीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता ती जाॅब करत होती. अशातच तिला तुषारचं स्थळ सांगून आलं होतं. मुलाला सरकारी नोकरी होती. त्यामुळे तिची आई चित्रा आणि वडील सुभाष दोघेही खुश होते. शिवानी सुद्धा खुप खुश होती आणि का नसणार होती. सरकारी नोकरीला असलेला मुलगा आपल्याशी लग्न करणार आहे म्हटल्यावर तिला आनंद तर होणार होताच.

चित्राने सांगितल्याप्रमाणे शिवानी तिच्या खोलीत गेली आणि साडी नेसून छान तयार झाली. थोड्या वेळातच मुलगा आणि त्याचे आई बाबा आले. त्यांनी बघताच क्षणी शिवानीला पसंत केले.

"आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, आपण आता देण्याघेण्याचं काय ते बोलू." तुषारचे वडील म्हणाले.

"अहो... पण आमची मुलगी सुद्धा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे मग आता देणं घेणं कशाला!" शिवानीचे बाबा म्हणाले.

"तुमचं बरोबर आहे हो, आम्हालाही तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, पण सगळं कसं जगरीतीप्रमाने व्हायला हवं म्हणून म्हणतोय." तुषारचे वडील म्हणाले. तसं सुभाष नवऱ्या मुलाकडे म्हणजेच तुषार कडे बघू लागले. पण तो काहीच बोलला नाही. त्याच्या वडीलांनी देण्याच्या घेण्याच्या काही गोष्टी मांडल्या. आपली मुलगी लग्नानंतर सुखात राहिल हा विचार करून सुभाषनेही दुसरा कुठला विचार न करता सगळ्या गोष्टी मान्य केल्या पण शिवानीला हे अजिबात पटले नाही. शांतनू आणि त्याचे बाबा तिथून गेल्यावर शिवानीने लगेच तिच्या बाबांकडे विषय काढला.

"बाबा, तुम्हाला काय गरज होती त्यांच्या मागण्या मान्य करायची, आपली तेवढी परीस्थिती नाहीये. एवढा सगळा खर्च तुम्ही आताच माझ्या लग्नाला केला तर रेवाच्या लग्नाला काहीच शिल्लक राहणार नाही." शिवानी म्हणाली.

"तिच्या लग्नाला अजून वेळ आहे अजून, तेव्हा करू काहीतरी. आता तुझं चांगलं होतंय मग थोडा जास्त खर्च झाला तर काय बिघडलं. मुलगा दिसायला चांगला आहे शिवाय त्याला सरकारी नोकरी आहे आणि आपल्या ओळखीचे आहेत. एवढं चांगलं स्थळ कशाला हातचं जाऊन द्यायचं." सुभाष म्हणाले. त्यावर शिवानी काहीच बोलली नाही. तिला खरं तर काहीच पटत नव्हते पण आपले बाबा ऐकणार नाही हा विचार करून ती गप्प बसली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all