मला हे लग्न मान्य नाही. भाग - २
शिवानीला सकाळी जाग आली ती फोनच्या आवाजाने. तिने मोबाईल फोन बघितला तर अनोळखी नंबर वरून काॅल होता. पण तरीही तिने तो रिसिव्ह केला.
"हॅलो, कोण बोलतंय?" शिवानीने विचारलं.
"मी तुषार बोलतोय, कालच तुझ्या बाबांकडून तुझा नंबर घेतला." तुषार म्हणाला.
"हो बोला..." शिवानी म्हणाली.
"मी काय म्हणतोय, आता घरच्यांनी आपलं लग्न ठरवलं आहे तर आपण भेटायला काय हरकत आहे. आपण भेटलो तर एकमेकांशी बोलता येईल आणि एकमेकांना समजून पण घेता येईल." तुषार म्हणाला.
"मी आई बाबांशी बोलते मग कळवते तुम्हाला." शिवानी म्हणाली आणि तिने फोन ठेवला. मग ती तिच्या आई बाबांकडे गेली आणि त्यांना तुषार जे बोलला ते सांगू लागली. मग त्यांनीही तिला तुषारला भेटायला जायची परवानगी दिली. शिवानीनेही मग तुषारला तसं फोन करून कळवले. मग दुपारी एका हाॅटेलमध्ये दोघांचं भेटायचं ठरलं.
शिवानीने छान ड्रेस घातला आणि तयार होऊन ती तुषारने सांगितलेल्या हाॅटेलमध्ये गेली. तर तो आधीच येऊन बसला होता आणि तिची वाट बघत होता. तिने त्याला बघताच ती त्याच्या समोर येऊन बसली.
"जरा उशीराच झाला मला यायला!" शिवानी म्हणाली.
"नाही, मी पण आताच आलोय. मी आपल्यासाठी काही चहा, काॅफी मागवू की डायरेक्ट लंचच करणार!" तुषारने विचारलं.
"नाही लंच वगैरे काही नको, काॅफी चालेल मला." शिवानी म्हणाली तसं त्यानेही काॅफी ऑर्डर केली. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सुरवातीला तुषार खुप छान बोलला पण हळूहळू शिवानीला त्याचं बोलणं खटकू लागलं. पण तरीही ती गप्पच होती.
"शिवानी, आमच्याकडे पद्धत आहे की नवऱ्या मुलाचे आणि नवरीचे दोन्हींचा लग्नाचा पोशाख हा नवरीकडचेच घेतात. तू तुझ्या बाबांना जरा चांगला भारीतला पोशाख घ्यायला सांगशील का? नाही म्हणजे कसंय ना... लग्नात सगळेच पाहुणे असतील, माझेही काही मित्र मंडळी असतील तर आपण त्यांच्यात उठून दिसायला हवं ना!" तुषार म्हणाला.
"मग तुम्हीच घ्या ना पोशाख म्हणजे टेंशनच नाही, तसंही तुम्हाला चांगली नोकरी आहे त्यामुळे तेवढा खर्च तर तुम्ही करूच शकता ना...!" शिवानी डायरेक्ट स्पष्ट बोलली. खरं तर तुषारला तिच्या बोलण्याचा राग आला पण त्याने तिला तसं दाखवलं नाही.
"घ्यायला मी घेतला असता पण आई बाबा काय म्हणतील." तुषार म्हणाला.
"मग माझेही आई बाबा त्यांना जसं परवडेल तसा पोशाख घेतील. तसंही त्यांनी आधीच तुमच्या खुप मागण्या मान्य केल्या आहे. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा थोडं फार समजून घ्यायला हवं." शिवानी म्हणाली.
"हो मी घेईन समजून, इथून पुढे मी कसलीही तक्रार करणार नाही." तुषार म्हणाला तेव्हा शिवानीला पण जरा बरं वाटलं. मग काॅफी घेऊन तिथून बाहेर पडल्यावर शिवानी घरी जाऊ लागली तोच तुषारने तिला आवाज दिला. मग ती ही थांबली आणि त्याच्याकडे बघू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा