Login

मला हे लग्न मान्य नाही. भाग - ३ (अंतिम भाग)

एका हाताने टाळी वाजत नाही
मला हे लग्न मान्य नाही. भाग - ३ (अंतिम भाग)


"काय झालं... काही बोलायचं आहे का तुम्हाला अजून?" शिवानीने विचारलं.

"हो नेक्स्ट टाईम जेव्हा मला भेटायला येशील तेव्हा साडी नेसून ये, त्याचं काय आहे ना आमच्या घरच्या सूनांना साडीतच वावरावं लागतं. त्यांना हे ड्रेस वगैरे असलं काही चालत नाही. लग्नानंतर तुला आजिबात असं काही घालता येणार नाही." तुषार म्हणाला.

"लग्नानंतर मला अजून काय काय बदल करावे लागतील हे आताच सांगून ठेवा. म्हणजे नंतर मला काही माहित नाही असं व्हायला नको." शिवानी म्हणाली. तसं तो हलकसं हसला.

"आम्ही काही एवढी खाष्ट माणसं नाही आहोत नियमांत ठेवायला." तुषार हसून बोलला पण शिवानीला खुप राग आला होता. ती तशीच रागातच तिथून घरी गेली.

शिवानी घरी आल्यावर तिच्या आईने तिला त्यांच्यात काय बोलणं झालं ते विचारलं पण शिवानीने काहीच सांगितलं नाही. ती शांतच होती.

दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख पण ठरवली. घरात लग्न या विषयावर जोरदार चर्चा होऊ लागली आणि हळूहळू तयारी पण चालूच झाली.

लग्न जवळ आलं होतं पण तुषारच्या घरच्यांच्या अपेक्षा काही कमी होत नव्हत्या, रोज काही ना काही तरी चालूच असायचे. शिवानीचे बाबाही आपली मुलगी सुखात राहणार म्हणून सगळ्याला होकार द्यायचे.

दुपारची वेळ होती. सगळेच दुपारचं जेवण करत होते. त्याचवेळी सुभाषला तुषारच्या बाबांचा फोन आला. मग ते जेवता जेवता बाहेर गेले आणि त्यांच्याशी फोनवर बोलू लागले. बोलून झाल्यावर ते आत आले तेव्हा त्यांचा चेहरा पुर्ण उतरला होता. ते बघून सगळ्यांनाच काळजी वाटली.

"बाबा, काय झालं? तुमचा चेहरा एवढा का उतरला आहे?" शिवानीने विचारलं.

"तुषार रावांच्या बाबांचा फोन होता, ते म्हणत होते की शिवानीला लग्नानंतर नोकरी करता येणार नाही." सुभाष म्हणाले. ते ऐकून शिवानीला खुप मोठा धक्का बसला.

"काय?? बाबा, काही झालं तरी मी माझी नोकरी सोडणार नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल." शिवानी म्हणाली.

"या लोकांच्या एक एक मागण्या वाढतच चालल्या आहेत. मला तर आता टेन्शनच आलंय." चित्रा म्हणाली.

"आई, याला ते एकटे जबाबदार नाही, त्यांच्या अशा वागण्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. जेवढी त्यांची चुक आहे तेवढीच चुक तुमची सुद्धा आहे ते मागन्या करत गेले आणि तुम्ही मान्य करत गेलात पण आता गोष्ट माझ्या नोकरी पर्यंत येऊन पोहोचली आहे. मी हे खपवून घेणार नाही. मुळात मला हे लग्नच मान्य नाही. मला नकोच असा नवरा जो प्रत्येक गोष्टीत माझ्यावर बंधनं घालेल. मी आताच तुषारला फोन करून हे लग्न मोडलं म्हणून सांगते." शिवानी म्हणाली.

"काय करतेस तू शिवानी तू हे, अगं असं केलं तर लोक काय म्हणतील!" सुभाष म्हणाले.

"काहीही म्हणणार नाही, आणि म्हणाले तरी मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी माझी नोकरी महत्वाची आहे. हा समाज आणि हे लग्न नाही. समजलं." शिवानी म्हणाली आणि तिने लगेच तुषारला फोन करून लग्नाला नकार दिला. फोन ठेवताच तिने एक दिर्घ श्वास घेतला. आज लग्न मोडलं म्हणून ती दुःखात नव्हती तर उलट ती मोकळा श्वास घेऊ लागली होती.