Login

मला लग्नचं करायचं नाही...

मला लग्नचं करायचं नाही...भाग-१
मला लग्नचं करायचं नाही...
भाग- १

अहो वन्स, आटपा बरं लवकर. आपल्याला खरेदीला जायचं आहे नां.अहो,आईंची एकसष्टी आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अजून बरीच खरेदी बाकी आहे.मनस्वी आपल्या नणंदेला आवाज देत म्हणाली.

"हो गं वहिनी चल निघूया."

जातांना मनस्वी ने आपल्या सासुबाईंना आवाज दिला. "आई येतो आम्ही दोन तासात परत." आणि संस्कृती व मनस्वी खरेदीसाठी निघून गेल्या.

माधवी व मुकुंदराव यांना मकरंद व संस्कृती ही दोन अपत्ये. मकरंदचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. मनस्वी सारखी अत्यंत लाघवी आणि मनमिळाऊ सून त्यांना मिळाली होती. मकरंद पेक्षा संस्कृती दोन वर्षांनी लहान होती. तिलाही चांगली चांगली स्थळ यायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला तर ती चक्क म्हणायची, "मला लग्नच करायचं नाही." पण सर्वांनी तिला समजावल्यावर कुठे ती लग्नाला तयार झाली. परंतु एकही स्थळ तिला पसंत येईना. एवढ्यात माधवीला मुकुंदरावांचा आवाज आला,

"अगं माधवी कोण आलंय बघ. बाहेर ये जरा."

अगं बाई अंजली तू. मी तुझीच वाट बघत होते. मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. म्हणूनच मी यांना म्हटलं अंजलीला फोन करा म्हणून.


हो माधवी. म्हणूनचं तर मी आले. मुकुंदरावांचा कालच फोन आला होता आमच्या ह्यांना.अंजलीला लवकर पाठवा म्हणून.

होय गं. बरं अंजली तू हातपाय धू. तोवर मी चहा ठेवते. असं म्हणत माधवी स्वयंपाक घरात गेली. चहापाणी झाल्यावर दोघीही निवांत गप्पा करत बसल्या.

अगं अंजली आपल्या संस्कृतीसाठी चांगली चांगली स्थळ येत आहेत परंतु ती प्रत्येकामध्ये काही ना काही उणीवा काढत असते. सर्व गोष्टी बरोबर असूनही मुलाची उंची सुतभर जास्त आहे, तो माझ्यापेक्षा लठ्ठ आहे, तो माझ्यापेक्षा बारीक आहे, त्याला टक्कल आहे. एक ना अनेक कारण. तूच समजावून सांग या पोरीला. आम्हाला तर अलीकडे खूप टेन्शन आलंय बघ.

सुरुवातीला तर ती लग्नासाठी तयारच नव्हती. लग्नाचं नाव काढलं की ती गायब. म्हणे मला लग्न करायचं नाही. आम्ही सर्वांनी खूप समजावल्यावर आता कुठे थोडीफार ताळ्यावर आली.


अगं माधवी ही फक्त आपल्या संस्कृतीचीच कथा नाही तर बऱ्याच जणींची व्यथा आहे. कोणी म्हणतं मुलाकडे स्वतःचे घर नाही, कोणी म्हणतं शेती नाही, कोणी म्हणतं सासू-सासरे जवळ राहतात कां. एवढंच नाही तर कधी कधी सर्व गोष्टी बरोबर असूनही, तो लठ्ठचं आहे, तो सावळाच आहे. अशा अनेक अटी शर्थी. पण या सगळ्या कारणांसाठी मुलांना नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट्ये असतात हे आई वडील सांगू शकतात काय?

पुढे काय? हे जाणण्याची उत्सुकता आहे नां. मग पुढील भाग अवश्य वाचा.