Login

मला लग्नचं करायचं नाही...भाग -२

मला लग्नचं करायचं नाही...भाग -२
मला लग्नचं करायचं नाही...
भाग- २


अनेक मुलींना संसार कसा करावा, संसारात तडजोड कशी करावी, कुटुंब कसं बांधून ठेवायचं हे काहीच माहित नसतं. आपली मुलगी शिकलेली आहे, हुशार आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, म्हणून तिच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार. मग अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मग मुलींचं वय वाढत राहणार असंच होतंय बघ.

मग अशावेळी शेती करणाऱ्या, कमी पगार असणाऱ्या, आई-वडिलांना घेऊन चालणाऱ्या, चांगल्या स्वभावाच्या मुलांचं नुकसान होतं. अरे तुम्ही नोकरी करत आहेत नां, मग कमवा आणि मिळवा सगळी भौतिक सुखं. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापेक्षा कमवा आणि घ्या शेती, फ्लॅट विकत. अनेक मुला-मुलींच्या बाबतीत तर असंही दिसतं की त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. खरंतर मुलाचे शहरात घर असण्याची, त्याच्याकडे शेती असण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्या मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवणं हे गरजेचं आहे. मुलांनाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी बळ हवं असतं नां.

केवळ उपवर मुला-मुलींच्यासाठीचं नव्हे तर त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा हल्ली लग्न म्हणजे स्टेट्स सिम्बॉल विषय झालेला आहे. आपल्या जावयाला किती चांगलं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतो. खरंतर लग्नात भौतिक सुखापेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदारपणाची जास्त गरज असते. म्हणूनच मुलाच्या, मुलीच्या सुखाचा विचार जरूर करावा पण तो करत असताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आई-वडिलांनी जरुर ठेवलं पाहिजे.


हो गं अंजली, अगदी खरं आहे तुझं म्हणणं. कधी कधी तर असं वाटतंय की तरुण पिढीला लग्न हवं आहे पण ते टिकेल की नाही आंतरिक भीतीपोटी त्यांचा निर्णय लांबणीवर तर पडत नाही नां. अवती भवतीच्या दाम्पत्यांमध्ये वादावादी, मतभेद, मनस्ताप असे प्रसंग पाहायला मिळतात. घटस्फोटीत तरुण तरुणींची संख्याही वाढते आहे. पती-पत्नीचं नातं अबाधित, एकनिष्ठ व बांधिलकीचं ठेवता येईलच असा विश्वास वाटत नाही. लग्नानंतर धुसफूस, वादावादी, भांडण होतातच, अशा नकारात्मक विचारांनी तरुण पिढी घेरली जात आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यायला ही पिढी घाबरत आहे. माधवी बोलत होती.


अगदी शंभर टक्के खरं आहे माधवी तुझं म्हणणं.अंजली म्हणाली.
लग्न करायचं म्हटलं तर सकारात्मक विचारांची दिशा पकडायला हवी. त्यासाठी, ते बळ येण्यासाठी, विलंब टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करायला हवा. लग्न या संकल्पनेवर विश्वास हवा. त्यातून येणारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, निभावण्याची हिंमत असायला हवी.

पुढे काय? हे जाणण्याची उत्सुकता आहे नां. मग पुढील भाग अवश्य वाचा.