मला वेगळं राहायचंय…
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“मला वेगळं राहायचंय अक्षय..”
सारा धीर एकवटून चहाचा कप त्याच्या समोर धरत श्रुती म्हणाली.
“काय? वेगळं? म्हणजे तू आमचं घर फोडणार आहेस?”
तिचे शब्द ऐकून अक्षय जवळजवळ किंचाळलाच.
“नाही अक्षय, मला घर फोडायचं नाही; पण मला शांतता हवी आहे. मला इथं राहणं कठीण होत चाललंय. इथलं वातावरण… सततचे टोमणे… मी आतल्या आत तुटत चाललेय.”
“याला कोण जबाबदार आहे? तूच घरातलं वातावरण नकोसं करतेस. नेहमी नकारात्मक भूमिका असते तुझी.. ”
अक्षयने रागाने आवाज चढवला. श्रुतीने डोळे मिटले. आपोआप डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. अक्षयचे शब्द तिच्या मनावर असंख्य घाव करत होते, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी तिच्या घरचे लोकंच जबाबदार होते. श्रुतीच्या डोक्यातलं विचारचक्र सुरू झालं. ती अंगणात उभी राहून हातातल्या सुकत चाललेल्या फुलांना न्याहाळत होती.
“फुलं सुकतात तशीच माणसंही सुकत जातात… आवाज न करता..”
फुलांकडे पाहता पाहता अचानक तिच्या मनात विचार चमकून गेला आणि पुन्हा एकदा घाव हिरवा झाला. मनावर झालेल्या जखमा आठवणी बनून वाहू लागल्या.
त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. सगळं सुरुवातीला गोड होतं.. तिचं हसणं, तिचं असणं, नटणं.. रागावणं, नवी स्वप्नं सारं काही कौतुकाने स्वीकारलं गेलं. पण थोड्या काळानंतर नव्याची नवलाई संपली आणि हळूहळू वातावरण बदलायला लागलं. सासू-सासरे, नवरा सगळ्यांच्या अपेक्षांनी तिच्यावर मनामनाचं ओझं वाढू लागलं.
त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. सगळं सुरुवातीला गोड होतं.. तिचं हसणं, तिचं असणं, नटणं.. रागावणं, नवी स्वप्नं सारं काही कौतुकाने स्वीकारलं गेलं. पण थोड्या काळानंतर नव्याची नवलाई संपली आणि हळूहळू वातावरण बदलायला लागलं. सासू-सासरे, नवरा सगळ्यांच्या अपेक्षांनी तिच्यावर मनामनाचं ओझं वाढू लागलं.
श्रुती विचारात गढलेली असताना अचानक तिच्या सासूबाईंचा आवाज तिच्या कानात घुसला.
“श्रुती! अजून भाजी कापली नाहीस? किती उशीर? इतक्या संथ गतीने काम केल्यावर कसं होणार? आज दुपारचं जेवण आम्हाला मिळणार आहे की नाही? की रात्रीच देतेस?”
श्रुती धावतच आत आली. सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.
“आता येतेय माहेरची राजकुमारी.. सासरी कशी कामं करायची ते शिकावं लागेल ना? आईने काही म्हणजे काही शिकवलं नाही. अडाणी धोंडा आमच्या गळ्यात बांधलाय.”
सासूबाईंचं हे असं उपरोधात्मक बोलणं रोजचंच झालं होतं. नेहमीसारखी आजही श्रुती पुन्हा एकदा शांत राहिली. शांत राहणं हीच तिची एकमेव बचावाची पद्धत बनली होती. दिवसेंदिवस श्रुती अजूनच अबोल बनत चालली होती.
त्या दिवशीही असंच घडलं. अक्षयला सकाळी उठायला उशीर झाला. अंघोळ वगैरे उरकता उरकता ऑफिसला जायला त्याला उशीर होत होता. श्रुतीने पटकन नाष्टा बनवून त्याच्यासमोर आणून ठेवला. डिशमधल्या पोह्यांवर नजर पडताच तो तिच्यावर रागवत म्हणाला,
“अगं हे पोहे इतके कोरडे का? आधी चांगलं करायचीस, आता कसला हलगर्जीपणा? कसला कंटाळा आलेला असतो तुला?”
त्याची त्रासिक मुद्रा पाहून ती हळू आवाजात म्हणाली,
“मी अजून…”
“नेहमी सबबी! तुला नीट येतच नाही काही.”
त्याने श्रुतीचं काहीच ऐकून न तिच्यावरच आगपाखड केली. बिच्चारी श्रुती! त्याला एकही शब्द उलटून बोलली नाही. तिच्या डोळ्यांत फक्त एक प्रश्न होता,
“मला काहीच जमत नाही असं खरंच सर्वांना माझ्याबद्दल वाटतंय का?”
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सासूबाई मोठमोठ्याने गरजू लागल्या,
“काय म्हणायचं हे? किती बेजबाबदारपणा हा? फ्रिजसुद्धा नीट बंद करता येत नाही या बाईला.. तसाच उघडा राहिलाय. बर्फाची वाफ बाहेर दिसतेय.. अशाने लाईट बिल किती येईल, माहित्ये का तुला? असं घर चालवणार तू? रस्त्यावर आणशील तू आम्हाला.. घरच्या गृहिणीने कसं हजरजबाबी असायला हवं. नाहीतर तू..”
सासूबाईंचं बोलणं लगेच अक्षयनेही हेरलं. तोही सुरू झाला,
“श्रुती, इतकं साधं कामही तुला जमत नाही? मी दिवसभर ऑफिसात मान पाठ मोडेपर्यंत काम करतो. माझ्या डोक्याला सतराशे साठ व्याप असतात. सिनियर्स लोकांचं किती प्रेशर असतं माझ्या डोक्यावर! आणि घरी येऊन हेच पाहायचं मी?”
तोही तिलाच बडबडत होता. तिच्या मनाला परत प्रश्न पडला,
“एवढं रागवण्यासारखं मी केलंय तरी काय? इतका मोठा गुन्हा झाला?”
एके दिवशी श्रुतीची आई तिला भेटायला आली. बऱ्याच दिवसांनी आईला आलेलं पाहून श्रुतीला खूप आनंद झाला. इतक्या दिवसांतून पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर निखळ हसू उमटलं. पण सासूबाईंच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती. श्रुतीने आईला बसायला सांगितलं. तिला चहा दिला. थोड्या गप्पा झाल्या आणि मग थोडा वेळ बसून आई घरी निघून गेली. आई घराबाहेर पडत नाही तोच सासूबाई म्हणाल्या,
“सांग तुझ्या आईला, लेकीच्या सासरी सारखं सारखं येऊ नये. आम्हाला आमच्या घरात शांतता हवीय. आमचं घर म्हणजे तुझ्या माहेरची भाजी मंडई नाही!”
त्यांचे कडवट बोल ऐकून श्रुतीच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं.
“माझ्या आईमुळेही त्रास? तिला मी काय सांगू? माझ्या घरी येऊ नकोस? कोणत्या तोंडाने सांगू?”
त्या रात्री श्रुती खूप रडली. आईच्या अपमानाने तिच्या मनात पहिला मोठा थरकाप उडाला होता.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा