Login

मालकीण    भाग १

घरच्या सुनेचे, बायकोचे हाल करतात, मोलकरीण म्हणून वागवतात. मारून घराबाहेर काढतात. त्यानंतर जे घडत ते या कथेत पाहू.



मालकीण    भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर


" ताबडतोब निघायचं इथून. परत या घरात पाय ठेवलास तर याद रख ! पाय तोडून हातात देईन. " सचिन दीप्तीला खूप काही रागात बोलत होता.

अंगावर काळे - निळे वळ उठलेल्या दीप्तीचे अश्रू थांबत नव्हते. आणि हे सर्व पाहून तिची सासू आणि नणंद मज्जा घेत होते. सचिन गरम डोक्याचा त्यात आई, बहिणी पुढे बायको काहीच नाही वाटायची.

दीप्तीच्या आई वडिलांची लव्ह मॅरेज होत. त्यात ती एकुलती एक. दीप्तीचं शिक्षण टूर आणि ट्रॅव्हल्स मध्ये झालं होत. आणि त्यानंतर तिच्या वडिलांच निधन झालं. आईची सुद्धा तब्बेत थोडी नरम - गरम असायची, त्यामुळे आईने थोडी घाई करत मध्यस्ती मार्फत दीप्तीचं लग्न सचिनसोबत ठरवलं.

गरीब घरची दीप्ती पाहताच सचिनला आवडली. त्यात सासूबाईनी दीप्तीची परिस्थिती बघता ' घरात राबवून घेता येईल.' या मुळे लगेच होकर दिला. दीप्तीचं लग्न झालं आणि सहाच महिन्यात तिची आई सुद्धा वारली. लग्न झाल्यापासून तिच्यावर अन्याय होत होताच पण आता त्याची तीव्रता अधिक वाढली. कारण ' ती कुठे जाणार ना ?'

रोज तिला होणाऱ्या त्रासाची तीव्रता वाढत होती. त्यात नात्यात किंवा शेजारी कोणाचं लग्न झालं आणि सुनेने माहेरून हुंडा आणला की घरात तिला मारझोड ठरलेली होती.

आता आता तर तिला मारण्यासाठी कारणांची सुद्धा गरज नसायची. मोलकरिणीपेक्षा वाईट अवस्था झाली होती तिची. काल तिच्या सासूबाईच्या मैत्रिणीने तिच्या ओळखीच्या मुलीबद्दल सांगितलं.

" एकुलती एक आहे. रग्गड पैसा आहे मुलीच्या बापाकडे. पण मुलीची पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न होत नाहीये. सचिन दीप्तीला सोडून, पत्रिका न जुळवता करायला तयार असेल तर लग्न नक्की होईल बघ. " हे ऐकून सासूबाईचे लोभी डोळे लकाकले.
रात्री सचिन आल्यावर त्या सचिनसोबत या विषयावर बोलत होत्या. तोच पाणी घेऊन येणाऱ्या दीप्तीने ते ऐकलं. आणि ती म्हणाली, " आई असं कसं बोलू शकता तुम्ही ? त्यांचं लग्न माझ्यासोबत झालं आहे. विसरलात की काय तुम्ही ? "

दीप्ती असं बोलताच सचिनने दीप्तीला मारायला सुरुवात केली. " माझ्या आईशी या भाषेत बोलायची हिंमत कशी झाली तुझी ? " असं म्हणत त्याने दीप्तीला बेदम मारलं आणि घराबाहेर काढलं. वर म्हणाला," ताबडतोब निघायचं इथून. परत या घरात पाय ठेवलास तर याद रख ! पाय तोडून हातात देईन. "

दीप्ती रात्री बराच वेळ दरवाजा वाजवत राहिली पण दार उघडलं गेलं नाही. दीप्तीने कसा बसा आपल्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणीला कॉल करून परिस्थिती सांगितली. मैत्रिणीने कॅब बुकिंग करून तिला घरी बोलावून घेतलं. दीप्तीची परिस्थिती पाहून तिला खूप वाईट वाटलं. जान्हवी म्हणाली, " आताच्या आता चल पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवूयात. माणसं आहेत किती जनावर ? यांना धडा शिकवायलाच पाहिजे. " 

दीप्ती, " जान्हवी, मला कोणाला काही शिकवायचं नाहीये. मला फक्त शांतपणे जगायचं आहे. खूप त्रास सहन केला गं. आता त्यांचं तोंड पण बघायचं नाही. तक्रार केली की, कोर्ट कचेरी आली, सर्व माझ्या भोवती फिरत राहील. मला ते नकोय. "

दीप्तीचं बोलणं ऐकून जान्हवी शांत झाली. जखमा सारख्या ओल्या होत राहण्यापेक्षा दीप्तीला शांतपणे जगायला मिळणं जास्त महत्वाचं आहे. असं विचार करत जान्हवीने दीप्तीवर प्रथमोपचार करून तिला जेवायला दिलं आणि तिला झोपायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी दीप्ती उठली तेव्हा जान्हवी ऑफिसला निघाली होती. जान्हवी म्हणाली, " दीप.. जेवण बनवलं आहे मी. आता मी ऑफिसला जातेय.  संध्याकाळी आल्यावर आपण बोलू. तू जेव आणि आराम कर तुला आरामाची गरज आहे. " जान्हवी असं बोलून निघणार तोच दीप्तीने तिचा हात धरला आणि म्हणाली, " जान्हवी, या जगात माझं असं कोणीच नाही गं. आणि एवढं सहन केलं आहे की आता परत बोलावलं तरी त्या घरी जायची इच्छा सुद्धा नाही. तेव्हा माझ्यासाठी एखाद छोटं मोठं काम बघितलंस तर उपकार होतील. " दीप्ती हात जोडत म्हणाली.

" असं काय बोलतेस दीप.. मी नक्कीच बघेन तिच्यासाठी जॉब. पण आता आराम कर. " असं बोलून ती गेली.

दीप्तीचं अंग ठणकत होत. तिने थोडं जेवून अंग टाकलं.