Login

मळ्यातील सावली | भाग १

A Story Of A Shadow In Village Land.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भाग १

" बाबा, रम्या चल लेका बिगी बिगी. ह्या चपटी आणि चिकनच्या नादात एसटी सुटली अन् असं चालत यावं लागलंय. नशीब आता कसा बसा गावात पोहोचलो. "
रमेश मनातल्या मनात पुटपुटत झपाझप पावले टाकू लागला.

आज सकाळच्या एसटीने लवकरच रमेश आठवड्याचा बाजार घ्यायला आठवडा बाजारात गेला होता. दिवसभर ठरलेले सामान घेऊन, मग तो त्याच्या एका ओळखीच्या माणसासोबत बाजारात असलेल्या देशी दारूच्या ठेक्यात शिरला. तिथे पिता पिता त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.

बघता बघता संध्याकाळ कधी झाली त्यांना कळलेच नाही. शेवटी त्यांचा कार्यक्रम आवरून ते तिथून निघायला उठले. उठताच क्षणी त्याच्या दोघांच्या डोक्याचे चक्र आता चांगलेच फिरू लागले होते. दोघांना दारू चांगलीच चढली होती.

ते त्या ठेक्यातून बाहेर निघून मग एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बोलत एसटी थांबते, त्या ठिकाणी जाऊ लागले. दारूच्या नशेमुळे त्यांना वेळेचा काहीच अंदाज नव्हता. ते एसटी लागते त्या ठिकाणी पोहोचताच त्यांना समजले की, एसटी काही वेळा पूर्वीच निघून गेली आहे.

ते समजताच रमेशचा मित्र त्याला हसतच बोलू लागला, " काही नाही मित्रा, आपण आपल्या घरी आज चालत जाऊ. तेवढ्याच आपल्या गप्पा होतील."

त्याच्या म्हणण्याला रमेशने हसतच होकार दिला.

दोघे मग त्वरीत तिथून चालत घरी जाण्यासाठी निघाले. बाहेर बऱ्यापैकी अंधार पसरला होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. त्यांनी मुख्य रस्त्याने चालत न जाता, डोंगर वाटेने चालत जाण्याचं ठरवलं.

ते तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगर वाटेला लागले. नशेत असल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या वातावरणाचा अजिबात अंदाज नव्हता. त्याचा तो मित्र त्याच्या शेजारच्या गावात राहत होता. त्याची सोबत त्याला तिथ पर्यंतच होती.

चालता चालता ते एका मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. चालून थकल्यामुळे तिथे त्यांनी काही क्षण बसून पुन्हा पुढे चालू लागले. सर्वत्र आता बराच काळोख पसरला होता. त्याच्या मित्राकडे बॅटरी होती. रात्री यायला उशीर होऊ शकतो, म्हणून त्याने आधीच ती सोबत आणली होती.

अशा गावाकडच्या वाटा म्हणजे त्यांच्या रोजच्या पाया खालच्या वाटा, म्हणून त्यांना रात्रीचं त्या वाटेवर चालताना कसलीच भीती वाटत नव्हती.

ते थोडा विसावा घेऊन पुन्हा पुढे तो डोंगर उतरत खालच्या दिशेला जाऊ लागले. काही वेळाने ते चालून पुन्हा थकले.

पुन्हा समोर त्यांना तेच मोठं आंब्याचं झाड दिसलं. ते बघून त्यांची पावले जागीच थिजली.

त्यांची दारूची नशा काहीशी कमी झाली. ते दोघे काही न बोलता एकमेकांकडे पाहू लागले. ते तसेच पुन्हा पुढे चालू लागले, पण काही वेळाने पुन्हा त्यांच्या सोबत तेच घडले.

आता मात्र दोघे चांगलेच घाबरले, पण थोडी हिंमत करून दोघांनी मागे फिरून मुख्य रस्त्याने चालत जायचं ठरवलं. ते तसेच पुन्हा चालत रस्त्यावर आले आणि गावच्या रस्त्याला लागले. आता त्यांचा प्रवास बराच लांबणार होता.

त्यात तिथे जास्तीच चालल्यामुळे त्यांना चांगलाच थकवा जाणवला होता, पण त्यांना झालेली दारूची नशा उतरून आता त्यांना चांगलीच भूक लागली होती.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all