चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
भाग २
शेवटी बघता बघता बराच वेळ चालून तो त्याच्या मित्राच्या गावाजवळ पोहोचले. त्याला निरोप देऊन रमेश पुढे वाटेला लागला. त्याच्या मित्राने त्याला आजची रात्र त्याच्या घरी राहण्याचा आग्रह केला, पण आता पुढचं गावं त्याचंच असल्यामुळे, तो काही वेळातच घरी पोहोचेल असं सांगून, तो त्याचा निरोप घेऊन पुढे चालत निघाला. जाताना मित्राने त्याला आपल्या हातातील बॅटरी दिली.
पुढच्या काही वेळात रमेशने त्याच्या गावाच्या वेशीत प्रवेश केला. गावाबाहेर त्याच्या गावाच्या नावाचा फलक बघून त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. आता पुढच्या काही मिनिटात तो घरी पोहोचणार होता. चालून चालून आता तो पूर्णपणे थकून गेला.
काही मिनिटे चालल्यावर त्याला त्याच्या डाव्याबाजूला मळा दिसला. त्याला आठवले की, ह्या मळ्यातून जर तो चालत गेला तर त्याचा चालायचा काही वेळ वाचणार होता. तो थोडा लवकर घरी पोहोचणार होता.
त्याने जास्त विचार न करता त्या मळ्यात प्रवेश केला. त्याची नशा उतरली असली तरी दारूची थोडी फार गुंगी त्याला होतीच. त्या गुंगीत त्याला हे नाही समजलं की, त्याला रात्री त्या मळ्यात प्रवेश नव्हता करायचा.
मळ्यात शिरताच त्याला अचानक थंड वातावरण जाणवू लागले. चालताना आजूबाजूने थंडगार वारा त्याला स्पर्शून जाताना जाणवू लागला. त्या मळ्यात अगदी कंबरेपर्यंत सुकलेले गवत उगवले होते. दिवसा तो किती तरी वेळा त्या मळ्यातून चालला होता, पण आताचा अनुभव त्याला काही वेगळाच वाटू लागला.
काही अंतर चालल्यावर त्याला समोर मळ्याच्या मधोमध असलेले मोठे पसरलेले झाड दिसले. रात्रीच्या वेळेस ते अगदी भयानक दिसू लागले. जणू एक मोठा राक्षस रात्रीच्या अंधारात त्याचे हात पसरून त्याला आलिंगन द्यायला त्याची तिथे वाट पाहतो आहे, असेच वाटत होते.
आता त्याची होती नव्हती ती सगळी नशा उतरली. त्याला दरदरून घाम फुटू लागला. उशीर होत होता, म्हणून तो मागे देखील फिरू शकत नव्हता. त्याला ते झाड पार करून पुढे जाणं भाग होतं.
तो मनातल्या मनात देवाच्या नावाचा धावा करत तसाच पुढे चालू लागला. चालताना त्याला चंद्राच्या प्रकाशात त्याच्या शेजारी त्याच्या सोबतच एक सावली चालत असल्याचं जाणवू लागलं. ते जाणवताच त्याने त्याच्या चालण्याचा वेग वाढवला.
ती सावली देखील आता वेगाने चालू लागली. आता ती कधी त्याच्या डाव्या तर कधी उजव्या बाजूला जाणवू लागली. कधी ती अतिशय वेगाने त्याच्या समोरून तर कधी मागून धावताना जाणवू लागली.
त्याला आता काही करून लवकरात लवकर त्या मळ्याच्या बाहेर निघायचं होतं, पण त्या आधी त्याला ते झाड पार करणं गरजेचं होतं.
बघता बघता तो त्या झाडाजवळ पोहोचला आणि अचानक त्याची पावले जागीच थिजली. इतक्या वेळापासून जी सावली त्याच्या अवती भवती फिरत होती, ती आता अचानक त्याच्या नजरेसमोर येऊन थांबली. तिला बघून त्याच्या शरीरातून जीव निघून जातो की काय, असं त्याला वाटू लागलं.
त्याच्यापेक्षा उंचीने असलेली ती काळी कुट्ट सावली त्या अंधारात अतिशय भयानक वाटू लागली. त्या काळ्या सावलीचे भीतीदायक लाल भडक डोळे अंधारात चमकू लागले.
तो पुढे काही करणार इतक्यात त्याचे पाय ओढले गेले आणि तो जमिनीवर कोसळला आणि तो उठणार त्याच्या आधीच जोरात फरफटत झाडाच्या दिशेला ओढला गेला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा