Login

मळ्यातील सावली | भाग ३

A Story Of The Shadow In Village Land.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भाग ३

सकाळी उजाडण्याच्या आधीच सखू दरवाजात येऊन बसली. सकाळ झाली तरी, तिचा नवरा रमेश अजून घरी आला नव्हता. तिला त्याची काळजी वाटू लागली. न राहवून तिने जाऊन तिच्या सासऱ्याला झोपेतून उठवून ही गोष्ट सांगितली.


तिच्या चेहऱ्यावरची चिंता बघून तिचा सासरा तिला बोलू लागला," पोरी, उशीर झाला म्हणून काळजी करू नकोस. तो तिथेच थांबला असेल. आपण पहिले त्याची वाट बघू ."

तिला धीर दिला असला तरी, त्यांच्या मनात देखील त्यांच्या मुलासाठी काळजी वाटू लागली. कारण ह्या आधी असं कधीच झालं नव्हतं.

त्यांनी बराच वेळ वाट बघितली. बघता बघता दुपारचा एक वाजला, आता त्यांच्या मनाची भीती वाढू लागली.

रमेशचे बाबा घरातून बाहेर निघून, त्यांनी गावातील काही लोकांना सोबत घेतले. त्यांच्यापैकी काही लोकांनी मिळेल ती गाडी पकडून बाजारात जायचे ठरवले.


नशिबाने त्यांना एक वडाप बाजाराच्या दिशेला जाताना दिसली. त्यांनी तिला तिथे थांबवली. रमेशच्या बाबांसोबत इतर चार माणसे बाजारात गेले.

बाजारात जाऊन त्यांनी सगळीकडे विचारपूस केली, तेव्हा त्यांना कळले की, रमेश आणि त्याचा मित्र रात्री चालत निघाले होते.

त्याच्या बाबांना त्या मित्राविषयी माहीत होतं. तिथे विचारपूस करता करता त्यांना संध्याकाळ झाली होती. त्यांना संध्याकाळची गावाकडे जाणारी एसटी मिळाली.

ते त्या एसटीने त्याच्या मित्राच्या गावी उतरून त्याच्या घरी गेले. त्याच्याकडून त्यांना समजले की, रमेश रात्रीच गावी चालत निघाला होता.


ते सगळे देखील मग तसेच त्यांच्या गावी चालत निघाले. चालता चालता ते आजूबाजूला लक्ष ठेवून चालू लागले, पण त्यांना कुठेच काही दिसेना झाले.

बघता बघता त्यांनी त्यांच्या गावच्या वेशीत प्रवेश केला. रमेश सापडला नाही, म्हणून त्याचे बाबा उदास झाले. ते सगळे चालता चालता त्या मळ्याजवळ येऊन थांबले.

त्यांच्यातला एक त्याच्या बाबांना बोलू लागला," मामा, आपल्याला एकदा ह्या मळ्यात पण बघायला हवे." त्याच्या बोलण्याला सर्वांनी होकार दिला.

सूर्य मावळतीला गेला असला तरी, त्याचा प्रकाश अजूनही सर्वत्र पसरला होता. ते सगळे त्या मळ्यात शिरले. आत जाऊन गवतामध्येही सर्वत्र शोध घेऊ लागले, तेव्हा त्यांच्यातल्या एकाला खाली बॅटरी पडलेली दिसली. त्याने ते सर्वांना कळवले.

आता ते सगळे मिळून बॅटरी मिळाली, त्या दिशेला चालू लागले. चालता चालता ते त्या झाडाजवळ पोहोचले. तिथे त्यांना सामानाची पिशवी पडलेली दिसली. ते सगळे लगेचच त्या पिशवी जवळ गेले.

रमेशच्या बाबांनी ती पिशवी हातात घेतली. ती त्यांचीच पिशवी असल्याचं त्यांना आठवलं आणि त्यातील सामान त्यांनीच रमेशला आणायला सांगितले होते ते होतं. ते बघून त्यांनी घट्ट पिशवीला मिठी मारून हंबरडा फोडला. इतरांच्या लक्षात आलं की, रमेश सोबत नक्की काय झालं असावं.

त्यांनी तिथे जास्त वेळ न दवडता त्याच्या बाबांना सावरून घरी गेले. घरी गेल्यावर त्यांच्या सुनेला आणि दोन्ही नातवंडांना ही गोष्ट कळताच सर्वांनी टाहो फोडला.
त्यांच्या हसत्या केलात घरात दुःखाचा डोंगर पसरला. घरातला कर्ता पुरुषच त्यांना सोडून निघून गेला होता.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all