चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
भाग ५
दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच सर्व गावकरी त्या मळ्यात शिरले. तिथे ते त्यांच्या पाहुण्याचा शोध घेऊ लागले. त्याच्या नावाने हाका मारू लागले. त्यांच्या हाकेचा आवाज विष्णूच्या कानावर पडला आणि अचानक त्याला जाग आली. त्याला जाग आली, तेव्हा त्याला कळले की, तो झाडाच्या एका फांदीवर पडला होता.
तिथूनच त्याने खाली मळ्यात गावकऱ्यांना येताना बघितले. ते त्याच्याच शोधात तिथे आल्याचं त्याला समजले. तो देखील वरून जोरजोरात त्यांच्या हाकेला ओ देऊ लागला.
ते सगळे चालत झाडाखाली आले. त्यांना झाडाखाली विष्णूची पिशवी सापडली. ती पिशवी रिकामीच होती. त्याच्या ओळखीचे आता रडत त्याच्या नावाने हाका मारू लागला.
तो वरून त्यांच्या हाकेला ओ देत त्यांना जोरजोरात आवाज देऊ लागला. खाली उभे असलेल्या काहींनी किती तरी वेळा झाडावर पाहिलं, पण तो कोणाच्या नजरेस पडला नव्हता. शेवटी खालचे सगळे उदास होऊन तिथून निघून जाऊ लागले.
ते बघून त्याला धक्काच बसला. त्याला सगळे दिसत होते, सगळं ऐकू येत होतं, पण त्याचं अस्तित्व कोणालाच जाणवत नव्हतं. ते सगळे तिथून गेल्यावर, तो निराशेने खाली बघू लागला. तेव्हा अचानक त्याच्या कानांना कसलीशी कुजबुज ऐकू आली.
ते ऐकताच त्याने लगेच आजूबाजूला पाहिलं, तर त्याला तिथे त्याच्या जवळपास आणि झाडाच्या आणखीन वर काही लोकं त्याच्याकडे पाहत असलेली दिसली. त्यांना त्याच अस्तित्व जाणवत असल्याचं माहीत पडताच त्याच्या मनाला समाधान वाटले.
त्याने त्यांच्या सोबत बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला कळले की, ते सगळे देखील त्याच्या सारखेच तिथे अडकले होते, त्यातलाच एक काल गायब झालेला रमेश देखील होता.
त्यांच्या माहितीप्रमाणे ती सावली झाडाच्या खाली मुळांमध्ये राहते. ती एका अविवाहितेची आत्मा होती. जिला पूर्वी गावातील लोकांनी बाहेरच्या एका मुलासोबत प्रेम प्रकरणामुळे ह्या झाडाला बांधून मारले होते. तिचा तो प्रियकर त्या अवस्थेत तिला कायमचा सोडून गेला होता, म्हणून तिला पुरुष जातीचा खूप राग होता.
त्यामुळे मेल्यानंतरही ती इथून गेली नव्हती. इथे येणाऱ्या पुरुषाला ती इथेच तिच्या जगात कैद करत होती. कैद करून दिवसा ती बाहेर येत नव्हती, पण रात्रीच्या वेळी कैद केलेल्या पुरुषांचे हाल हाल करत होती आणि त्यातच तिला आनंद मिळत होता. तिच्याकडूनच त्यांना तिची ही कहाणी समजली होती.
ते सगळं ऐकून विष्णू शांत बसला. हळू हळू दिवस सरून रात्र होऊ लगली. रात्र होताच ती झाडाखाली असलेल्या बोगद्यातून बाहेर येऊ लागली. बाहेर येताच ती वर त्यांच्याकडे बघून क्रूरतेने हसू लागली, मग तिने त्या सगळ्यांना इशाऱ्यानेच खाली पाडले.
खाली पडताच ते सगळे भीतीने इथे तिथे धावू लागले. विष्णू देखील त्यांच्या सोबत धावला, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्याच्या दोन्ही मुठी बंद होत्या.
ती एक एक करून त्यांच्या मागे धावून त्यांना त्रास देऊ लागली. त्यांना उचलून जमिनीवर आपटू लागली. त्यात तिला असुरी आनंद मिळू लागला. ती असं करून जोरजोरात विकृतपणे मध्येच हसत तर मध्येच रडू लागली. विष्णू सोबत देखील तिने दोन वेळा असं केलं, पण त्याने आपली मूठ उघडली नाही. तो एका महत्त्वाच्या क्षणाची वाट पाहत होता. तो झाडाच्या अवती भवतीच तिच्या पासून लपून राहू लागला, पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.
बघता बघता सकाळ होत आली. तिला सकाळची चाहूल लागताच, ती वेगाने त्या बोगद्याच्या दिशेने जाऊ लागली, पण त्या झाडाजवळ पोहोचताच तिला जणू विजेचा झटका लागल्यासारखे झाले आणि ती उडून मागे पडली. काही वेळा पूर्वी विष्णूनेच पळताना एका हातात असलेल्या हळद आणि कुंकूच त्या झाडाभोवती रिंगण काढलं.
त्याने रात्री कैद होण्या आधीच पिशवीत हात टाकून मंत्र म्हणत, दोन गोष्टी त्याच्या सोबत ठेवल्या त्यातील एक हे हळद आणि कुंकू.
पूर्वेच्या डोंगरा आडून पहिले सूर्यकिरण त्या मळ्यात पडले. त्या किरणाचा त्या सावलीला स्पर्श होताच, तिने अचानक पेट घेतला. पेट घेतल्यावर ती जोरजोरात किंचाळू लागली.
विष्णू धावतच तिच्याजवळ गेला आणि त्याने त्याची दुसरी मूठ उघडून, त्यात असलेली रुई त्याने तिच्या अंगावर टाकली.
त्याने त्या रुईच लग्न अविवाहितेच्या आत्मासोबत लावून तिचा तिचेच अंतिम संस्कारही केला.
तिचा तो आवाज इतका भयानक होता की, गावातील लोकं तो ऐकून तिथे मळ्यात धावत आले. समोर जळत असलेल्या सावलीला बघून ते थक्क झाले. तिच्या मागे त्यांना गावातील गायब झालेले लोकं दिसले. त्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली.
सर्वांनी विष्णूचे आभार मानले आणि त्यांना सोबत घेऊन ते सगळे गावात परतले आणि त्यांच्या मागे ती जळणारी सावली हळू हळू आकाशात विलीन झाली, कायमची!
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा