Login

मामास पत्र

मामास पत्र

ती.रू. मामा,
आपणास आपली लाडकी भाची जयश्री हिचा
सा. नमस्कार वि.वि.

पत्रास कारण की खूप आठवण येते तुमची. म्हणून पत्र लिहित आहे. लहान असताना पण मी असेच पत्र लिहित होते ना तुम्हाला. किती छान दिवस होतो ना ते! आठवलं की आज ही हसू येत ओठांवर. पण गेले ते दिवस पण आठवणी मात्र कायम राहिल्या मनात.किती कौतुक असायचं तुम्हाला त्या माझ्या पत्राचे, सगळ्यांना दाखवायचात तुम्ही ते पत्र.

मामा,तुम्हाला आठवतय का हो,लहान असताना तुम्ही गावाला न्यायला यायचात. तुम्ही येणार म्हणून किती वाट पाहायचो तुमच्या येण्याची. पण त्या वाट पाहण्यात ही एक वेगळीच मजा असायची. तेव्हा तुम्ही ट्रक ड्रायव्हर होतात.कधी कधी अचानकच ट्रक घेऊन यायचात घरी. तेव्हा किती आनंद व्हायचा म्हणून सांगू. नंतर मग एस. टी. ड्रायव्हर झालात.तेव्हा पण तुम्ही चालवणा-या एस.टीत बसून जायचा आमचा हट्ट असायचा आणि तो तुम्ही पूर्ण ही करायचात. आम्ही राहत असलेल्या गावची ड्युटी घेऊन यायचात फक्त आमच्यासाठी. तो आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.

राखी पौर्णिमा आणि भाऊबीज जवळ आली की जशी आईला तुमच्या येण्याची ओढ असायची तशीच ओढ आम्हां भावंडांना ही असायची.

फोनचा जमाना आला आणि मग पत्र लिहिणं कमी झालं.

फोन वापरायचो तेव्हा मला आई म्हणायची, “अगं, मामा येणार आहे की नाही विचार बरं.”

मी फोन केला की मग तुम्ही लगेच म्हणायचात, “मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो, गं. येतो म्हणून सांग तिला.” किती तो आनंद आम्हाला आणि आईलाही.

पण आता या दोन वर्षात राखी पौर्णिमा आणि भाऊबीज आली आणि गेली पण तुम्ही काही आला नाहीत. येणार तरी कसे म्हणा इतके दूर निघून गेलात की तिथून तुमचे परतणे तर अशक्यच आहे.

मामा, खूपच आठवण येतेय तुमची. खूप मिस करतो आम्ही सर्व तुम्हाला. तुम्हालांही येते का हो,आमची आठवण?

तुमचे परतणे शक्य नाही आता पण या वेड्या मनाला सांगणार तरी कसे?आजही वाटते की तुम्ही आसपास इथेच कुठेतरी आहात. तुमची ती प्रेमळ मिठी, प्रेमाने कुशीत घेणे, डोक्यावर मायेने हात फिरवणे हे सगळे मिस करतो. पुन्हा याल ना हो, तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यायला, कुशीत घ्यायला..वाट पाहत आहे..माहिती आहे येणार नाही तुम्ही..तरीही हे मन वाट पाहतोय.

आज पत्र तर लिहिलय तुम्हाला. पण हे पत्र नेमकं कोणत्या पत्त्यावर पाठवू हा प्रश्न आहे. कारण

ना चिठ्ठी ना कोई संदेश
जाने वो कौनसा देश
जहां तुम चले गये….

कळावे,
तुमची लाडकी भाची
जयश्री