मन बावरे...
© शुभांगी शिंदे
ऑफिसच्या वार्षिक संमेलनादिवशी सगळेच आपापल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उपस्थित होते. यावर्षीची थीमच तशी होती. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने आपल्यासोबत असावे अशी. शक्यतो सगळेच आपापल्या पार्टनरसोबत येण्याचे ठरवून आले होते. ती मात्र एकटीच आली होती नेहमीप्रमाणे.
पार्टी छान रंगात आली होती. इतक्यात विनयने तिला कोल्ड ड्रिंक ऑफर केल.
विनय : अवनी मॅम हे तुमच्यासाठी..
अवनी : thank you विनय. (गोड हसत)
विनय : रागावणार नसाल तर एक बोलू??
अवनी : काहीही काय.. बिनधास्त बोला..
विनय : आज तुम्ही खरंच खूप छान दिसताय.
अवनी : thanks for the complement. यात रागावण्यासारखं काय आहे. (मिश्किलपणे हसत आपले खांदे उडवून म्हणाली)
विनय : तसं नाही आपण जास्त बोलत नाही आणि पटकन असं तारिफ करणं तुम्हाला आवडेल की नाही हे कळत नव्हतं येवढंच.
अवनी : हो का?? (आणि खळखळून हसली)
इथं पासून बोलायची सुरूवात झाली ती अगदी कायमचीच. सकाळची गुड मॉर्निंग ते दिवसाच्या शेवटे सरशी बाय बाय म्हणत त्यांची चॅटिंग सुरूच, हो पण ऑफिसमध्ये कोणालाही याची कुणकुण न लागता. अगदीच गुलाबी दिवस असल्यासारखी जाणिव.
अवनी!! आर्कीटेक्ट आहे. तिचं तिच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. एका नामांकित कंपनीत गेली दहा वर्षे कार्यरत आहे. तिथेच तिची ओळख विनय सोबत झाली. विनय तिथल्या एच आर डिपार्टमेंटमध्ये आहे. तीनच वर्षे झाली त्याला येऊन. कामात अगदी प्रामाणिक. ऑफिसचा सर्वात देखणा मुलगा. आधी कधी तसा बोलण्याचा संबंध नाही आला पण आता त्याला पाहिल्याशिवाय दिवसच संपत नव्हता तिचा. तो दिसला नाही तर काहीतरी हरवल्यासारख वाटायचं.
ऑफिसमध्ये आलं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असल्याकारणाने समोर भेटणं शक्य नव्हतं मग मेसेज करून एखादी वेळ ठरवायची आणि कॉफीच्या बहाण्याने कॅफेटेरियामध्ये भेटायचं. हातात कॉफी कप घेऊन थोडंसं लाजायच थोडंसं बोलायच. हे आणि असंच काहीसं सुरू असायचं. पण खूप छान वाटायचं.
त्यादिवशी अवनीचा वाढदिवस होता. केक आणि बुके प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ऑफिस अकांऊट मधून येत होता. आफिस मधून हे असं सेलिब्रेशन ठरलेलं असायचं.
गडद जांभळ्या रंगाची साडी त्याला काळ्या चंमकेरी रंगाची काठ, कानात खड्याचे स्टडस् , उजव्या हातात ब्रासलेट, पीनप करून मोकळे सोडलेले काळेभोर केस, कपाळावर साजेशी मोत्याची टिकली, ऐन तारुण्यात न्हाऊन निघालेली जणू अप्सराच भासत होती ती. आरशासमोर उभे राहून एकदा स्वतःला सर्वत्र निरखून पाहिले आणि स्वतःच्याच प्रेमात पडली.
ऑफिसमध्ये येताच सगळ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. ठरल्याप्रमाणे केक कटींग, पुष्पगुच्छ यांचा सोपस्कार पार पडला. अवनी आपल्या डेस्क जवळ आली तिथे ऑफिस बॉयने तिच्या नावाच कुरीअर आणून दिले. तिने ते उघडले तर त्यात सुंदर असे नाजूक घड्याळ होते, सोबत एक गडब लाल रंगाचं गुलाबाच फूल आणि एक शुभेच्छा पत्र..
"A beutiful gift..
for a very beautiful lady..
From someone special "
इतक्यात तिचा व्हाट्स ॲप मेसेज आला.. गिफ्ट आवडलं ना?? कॉफीच्या वेळेला स्टेअरकेसवर भेट. अवनी खूप खूश झाली. तिने आवडीने ते घड्याळ मनगटावर घातलं.
अवनी नेहमीच्या सवयीप्रमाणे कॉफी मशिनच्या ठिकाणी पोहचली. तिला पाहताच विनयची विकेटच उडाली. क्षणभर तिला पाहताच राहिला. आज काय बोलावं त्याला सुचतच नव्हतं. तिने गिफ्टसाठी त्याला थॅंक्यू म्हटले आणि निघाली. मागे वळताना अचानक तिच्या सॅंडलची हील तुटली आणि ती अडखळी. विनयने तिला सावरले. त्या सावरण्यात दोघांमधलं अंतर फार कमी राहिल होतं. त्याच्या पिळदार भारदस्त दंडाचा स्पर्श, तिची मखमली काया, दोघांच्या परफ्यूमचा सुगंध एकमेकांना संमोहित करत होता. अवनी स्वतःला सावरत मागे वळली पण त्याने तिचा हात घट्ट धरत थांबवले.
अवनी : सोड विनय.. कोणीतरी बघेल..
विनय : दोन मिनिटे थांब ना. मला मनसोक्त पाहु तरी देत तुला. तसंही इथे सध्या कोणी नाही आहे.
त्याची रोखून पाहणारी नजर तिच्या काळजात चर्र करुन गेली. नको नको म्हणत असतानाच विनय दोन बोटांच्या अंतरावर तिच्या समोर उभा राहिला. तिच्या गालावरुन ओघळणारे मोकळे केस तिच्या कानामागे सारले. त्याच्या त्या स्पर्शाने ती मोहरली. हृदयाची धडधड अचानक वाढली. त्याच्या गरम श्वासात कावरीबावरी झाली. संयम सुटला आणि त्याच्या ओठांवर आपला हक्क गाजवू लागली. दोन मिनिटे त्या ओलावलेल्या ओठांत दोघेही चिंब भिजले. अवनी अचानक बाजूला झाली. काय बोलावं काय करावं किंवा आता आपण काय केले याच काहीच गणित लागतं नव्हतं. दोघेही गालातल्या गालात हसले. आसपास पाहिले तर त्या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते.
अवनीला तो क्षण हवाहवासा वाटू लागला. जागेवर येऊन बसली तेव्हाही ती त्याच क्षणाच्या विचारात होती. कामात लक्ष लागत नव्हतं. आज मन वेडावल होतं. या क्षणात हरवून जाऊ पाहत होतं.
वाढदिवस म्हणून लवकर घरी गेली. घरी येताच थोडी स्थिरावली. हॅपी बर्थडे मम्मा म्हणत हातात केक घेऊन येणाऱ्या आपल्या मुलांना बिलगली. समरनेही तिला शुभेच्छा दिल्या.
समरला पाहताच ती मनातुन खूप गोंधळली. आज विनय सोबत जे झालं ते नको व्हायला पाहिजे होत. मी हे कसं विसरले की, माझं लग्न झालंय, दोन मुले आहेत मला, मी आपलं भान कसं काय हरपून बसले?? अशा एक ना अनेक प्रश्न डोक्यात फिरु लागले.
रात्री झोपताना शेजारी झोपलेल्या समरने तिला लाडाने जवळ घेतले. ती मात्र विनयच्या आठवणीत हरवलेली. सगळ चूकीच आहे हे कळत असूनही तिला विनयची ओढ जास्त हवीहवीशी वाटत होती. त्याचा पहिला स्पर्श, त्याच्या भारदस्त शरिराची ती ऊब, त्याच्या ओल्या ओठांची चव, आजचा प्रसंग काही केल्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. यासर्व विचारांत समर कधी आपलं शरीर सुख पूर्ण करून झोपला तिला कळले सुद्धा नाही.
समरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ती विचार करू लागली. आपण का विनयकडे ओढले जातोय? वयाच्या या टप्प्यावर आपण हे काय करू पाहतोय या विचारातच ती झोपी गेली.
समर म्हणजे अवनीचा नवरा. लग्नाला बारा वर्षे झाली. दिवस सरू नये आणि रात्र कधी ढळू नये अशी अवस्था होती. एकमेकांची खूप काळजी करणं, कौतुक करणं, भरभरून गप्पा मारणं, त्या गप्पांच्या ओघात प्रेमात अजून गंध चढण, त्यात रुसवे फुगवे सांभाळून मनवणं ही आलंच. यात २-३ वर्षे निघुन गेली. मग बाळाची चाहुल लागली. एक मुलगा, मुलगी, सासू सासरे आणि हक्काचा नवरा. मुलं मोठी होत चालली, त्यांच्या शाळा सुरु, स्वतःची नोकरी, घराची जबाबदारी, सासू सासरे यांचे औषधपाणी या धावपळीत इतकी वर्षे निघून गेली.
नव्याची नवलाई ही पहिल्या दोन वर्षांतच संपली.
पस्तीसीच्या उंबऱ्यावर असलेली ती स्वतःकडे लक्ष देवु लागली होती. शरिर आणि सौंदर्य दोनही खूलून आले होते. सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळत होती, पण तरीही वयाच्या या स्टेजवर काहीतरी निसटून चाललंय असे क्षणोक्षणी जाणवत होते. असं का?? तर तिला प्रत्येक बाबतीत गृहीत धरले जात होते.
समरचे मित्र, मैत्रीणी, पार्ट्या आउटींग मस्त सुरु असायचं. आधीच ऑफीसमधून रोज रोज उशिरा येणं, कधी फोन किंवा मेसेज करून साधी चौकशीही नाही. रविवारी कधी लक्ष देईल तर तेही नाही. दिवसभर मोबाईल तरी हातात नाहीतर आपला टिव्ही बघत बसायचं. मुलांचा अभ्यास बघेल तर तेही नाही. दमून भागून का फक्त पुरुषच येतात आम्ही बायका दमत नाही का?? पैसा, ऐशोआराम असला म्हणजेच सुख का?
समरच्या मनात काय चाललंय हे अवनीला कळत नव्हतं आणि समरला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नव्हत. नात्यामधे तोच तोच पणा आलेला होता. प्रेम नाही असंही नव्हत फक्त आयुष्यात एकमेकांच्या असण्याची सवय झाली होती. पण ती ओढ, आपलेपणा, एकमेकांबद्दल असलेलं आकर्षण संपत आलं होतं.
ती हरली होती स्वत:शीच, मेंटली थकून गेली होती. शरीराचा थकवा दूर करता येतो पण मनाचा थकवा कसा दूर होणार ना. शारिरीक सुखापेक्षा स्त्रीला मानसिक सुख खुप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं. किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं. खूप फरफट होत होती तीची यात. मनात खूप मोठी उलथापालथ होत होती. अन ज्याने समजुन घ्यायला हवं तो आपल्याच विश्वात रममाण होता. त्याला या कसल्याचा गंधच नव्हता.
अवनीला नेमकं काय हवं होतं. तिला फक्त त्याच अटेंशन हवं होतं. दिवसातून एखादातरी फोन किंवा मेसेज हवं होतं. आज तु खुप सुंदर दिसतेस असं एकदातरी त्याने म्हणावं हि माफक अपेक्षा. पण त्याच तिला गृहीत धरणं ओघानेच आलेलं होतं. आता काय लग्न झालंय आपलं तु आहेस सुंदर, वेगळं कशाला सांगायला हवं. आज नको उद्या बाहेर जाऊ. तु हवं ते कर मी नाही म्हणालो काय पण मला आता फोर्स करू नकोस. साधं प्रणयाच्या वेळी तरी तीची मर्जी पाहावी तर तिथेही तिला गृहीत धरणं आलं.
तिला मनापासुन वाटत होतं कोणीतरी अशी व्यक्ती हवी, जी आपल्याला समजून घेइल. आपल्या हक्काची असेल. माझे मुड्स त्याला कळतील, माझं शांत रहाणं त्याला कळेल.. माझी चिडचिड सहन करेल, मला समजावेल,
या अपेक्षा तिला सांगताही येत नव्हत्या आणि नवरा म्हणून त्याने ते समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. कधी विषय काढलाच तर तो मस्करीत घ्यायचा. तिची मात्र घुसमट होत होती.
अश्यातच तिला विनय भेटला होता. समर कडून अपेक्षित असलेल्या गोष्टी विनय कडून पूर्ण होत होत्या. अवनीला शरीर सुखाची हाव नव्हतीच. सेक्स आणि रोमान्स यात फरक आहे. स्त्रीला सेक्स पेक्षा रोमान्स जास्त आकर्षित असतो. समर कडून अवनीला हेच तर हवं होतं. तिची धडपड तर याच मानसिक संतुलनासाठी होती. पण हेच शोधताना तिच्या मनात विनय घर करून गेला होता आणि ती त्याच्या ओघात वाहवत जात होती.
दुसऱ्या दिवशी अवनी सकाळी लवकर आटपून ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये येताच विनयला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेण्यास सांगितली. दोघेही दुपारी एका निवांत ठिकाणी होटेलवर भेटले. थ्री स्टार होटेलच्या त्या बंद खोलीत आज ते एकटेच होते. दोघांनाही मनमोकळा एकांत मिळाला होता. ना कोणी पाहणारं होतं ना कोणाची भिती होती. आत येताच दोघेही एकदम शांत होते. मग विनयनेच बोलायची सुरूवात करत तिला धीर दिला. अवनीला खूप हायसे वाटले. विनयने तिचे दोन्ही हात हातात घेत तिला विश्वास दिला. प्रथम तिच्या कपाळावर चुंबन घेतले. मग तिच्या मिटलेल्या पापण्यांचे चुंबन घेतले. त्याच्या ऊबदार श्वासात ती हरवत जात होती. त्याने आपल्या ओंजळीत तिचा चेहरा सामावला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत त्याचे रसपान करु लागला. ती मोहरली, हृदयाची धडधड वाढू लागली, अंग अंग शहारून गेलं आणि त्याची तिच्या भोवतीची मिठी घट्ट झाली. आता तिलाही धीर धरवेना, कावरीबावरी ती पुढच्या मिलनासाठी आसुसलेली. त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले. उजव्या खांद्यावरून टॉप हलकेच खाली सरकवत आपले ओठ टेकवले. कपड्यांचा अडसर दूर होणारच होता की, ती....
ती... खाडकन झोपेतून जागी झाली. तिला त्याच्या स्पर्शाचा किळस वाटू लागला. संपूर्ण शरीराला नुसता घाम फुटला होता. तिने थंड पाण्याचा घोट घेतला आणि शांत पडून राहिली कारण तिची झोप कधीच उडून गेली होती.
सकाळी मनाशी विचार पक्का करून ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये येताच विनयला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेण्यास सांगितली. दोघेही बाहेर कॅफे टाईम या होटेल मध्ये भेटले. कोपऱ्यातल एक टेबल निवडून तिथे बसले. दोघेही शांत, कोणीच काही बोलत नव्हते, पण आज अवनीला खूप काही बोलायचे होते.
अवनी : विनय.. I am sorry..
विषयाला सुरुवात कशी करावी या विचारातच ती गडबडीने बोलू लागली.
विनय : अरे तु sorry नको बोलू प्लीज.. मला तु आवडतेस अवनी अगदी मनापासून.
अवनी : पण ते शक्य नाही. माझे लग्न झाले आहे दोन मुले आहेत. मला माझा संसार आहे आणि तुलाही तुझा संसार आहे. तु हे विसरतोयस का??
विनय : नाही.. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आपल्या दोघांचेही संसार आहेत. माझ्यामुळे तुला किंवा तुझ्या वैवाहिक आयुष्याला कोणताही त्रास होणार नाही हा शब्द मी देतो.
अवनी : अरे पण हे सर्व खूप विचित्र आहे.
विनय : विचित्र आहे. पण आपल्याला एकमेकांची ओढ आहे, हेही तितकंच खरं आहे.
अवनी : मी समरला दगा नाही देऊ शकत. माझ समरवर खूप प्रेम आहे. हा मला तुझा सहवास आवडतो पण ते प्रेम नाही.
विनय : खरं सांगू अवनी. तु मला पहिल्या दिवसापासून आवडतेस. तुला लग्नासाठी मागणीही घालणार होतो पण नंतर कळालं की तु आधीच मॅरिड आहेस. असो मी विषय तिथेच सोडला होता. पण लग्न झाल्या नंतर कळालं माझी बायको खूप संशयी आहे. तीच आपल एकच म्हणणं आहे की तु इतका हॅंडसम आहेस तर तुझी बरीच अफेअर झाली असतील. आताही असेलच ना?? रोज काही ना काही कारण काढून माझा फोन चेक करणं.. उलट तपासणी करणं.. अगदीच कंटाळा आला आहे गं.
अवनी त्याच्या या बोलण्यावर निशब्द होती.
विनय : तुझा बिनधास्त स्वभाव, सर्वांशी मनमोकळेपणाने बोलन मला आवडतं. मलाही नाही कळलं ग, की कधी मी तुझ्या जवळ येवढा ओढला गेलो.
अवनी : तरीही हे फार विचित्र आहे. आपल्या या नात्याला ना नाव आहे, ना कसली ओळख, जगाला घाबरून भेटायचं, सततची लपाछपी, डोक्यावर बदनामीची भीती. कशाला जगायचं असं आयुष्य? आजपासून आपण नको बोलायला. आपण जर असेच बोलत राहिलो तर ही ओढ खूप वाढेल आणि मग परतीची वाट कठीण होऊन बसेल. त्यापेक्षा आपण आता न बोललेलच बरं, असं म्हणत त्याने दिलेलं कालच बर्थडे गिफ्ट तिने त्याला परत केलं.
कालचा दिवस मला नेहमीच आठवणीत राहील. जमलंच तर मला माफ कर.एवढं बोलून अवनी तिथून निघाली.
घरी जात असताना वाटेत तिचा अपघात झाला. वळणावर एका दुचाकीची धडक लागली. उजवा हात आणि पाय दोन्ही फॅक्चर झाले. समर लगोलग हॉस्पिटलमध्ये हजर झाला. तिला पाहून रडवेला झाला. प्रेम होतं ना त्याच तिच्यावर, त्यामुळे तिला या अवस्थेत पाहुच शकत नव्हता.
तीन चार दिवस ती हॉस्पिटलमधेच होती. समरची मात्र तारांबळ उडाली होती. घरीही लक्ष देत होता आणि इथे अवनीची काळजीही घेत होता. अवनीला रोज स्वतः आपल्या हाताने जेवण भरवत होता. त्याची आपल्याबद्दलची काळजी, प्रेम आणि जिव्हाळा बघून अवनीला भरून आले. तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्यावर आपले ओठ टेकवले. आपण योग्य वेळी विनय पासून सावरण्याचा निर्णय घेतला याचे तिला समाधान वाटले. तिच्या डोळ्यांतील दोन आसवे टपाटपा त्याच्या हातावर सांडले. त्याने तिला मायेने आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.
समाप्त..
सदर कथा हि काल्पनिक नसून वास्तविक घटनेवर आधारित आहे. विषय थोडा नाजूक आहे, अपेक्षा करते तुम्हाला आवडेल. स्त्री मनाची एका टप्प्यावर होणारी घुसमट, एक्स्ट्रा मॅरीटल कडे झुकतं माप आणि नात्यात येणारा दुरावा, पण तरीही प्रेम खरं असेल तर रस्ता भरकटला जात नाही, हेच या कथेचं उद्देश. बाकी कथा कशी वाटली हे नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा