Login

मन हे तुझ्यात गुंतले

बनारसची ती आणि मुंबईचा तो. त्यांच्या निरागस मैत्रीची, एका विलक्षण नात्याची गोष्ट.
मन हे तुझ्यात गुंतले !
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527

( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )

मुंबई. दादरमध्ये शाकुंतल चाळीत एका १० बाय १० च्या खोलीत राहणारं मध्यमवर्गीय कानिटकर कुटुंब . आपला नायक संकेत कानिटकर. वय वर्ष 28 . त्याची आई गृहिणी . नाव – कुसूम. वय वर्ष – 61. अतिशय भोळी पण अतिशय स्वाभिमानी, सततच्या वाढत्या आजारपणाला कंटाळलेली पण काहीही तक्रार न करता घरचं सर्व काही करणारी..संकेतला 2 भावंडं.. शाश्र्वती आणि शार्दुल. संकेतचे बाबा तो लहान असतानाच एका अॅक्सिडेन्ट मध्ये गेले. भावंडांमध्ये संकेत सर्वात मोठा.24 वर्षांची, नोकरीच्या शोधात असलेली शाश्वती आणि बारावीत असलेला, अभ्यासात कंटाळा करणारा, bollywood च्या films मध्ये hero व्हायचं स्वप्न पाहणारा शार्दुल. एकीकडे शाश्र्वतीचं एका मुलावर प्रेम असतं. त्याचं‌ नाव रोहित. रोहित हा शाश्वतीचा जवळचा मित्र. शाश्वतीने रोहितवरील प्रेम घरी सांगितलं नसतं..
चला आता आपल्या हिरोबद्दल जाणून घेऊयात..संकेत. संकेत हा त्या घरातला कर्ता पुरुष. तो एम् कॉम असून एका कंपनीत तो नोकरी करत असतो... महिना पगार 25,000 रूपये. 25,000 रूपये घरचा खर्च पाहता 10 -15 दिवसात संपून जातात. आईचा औषधांचा खर्च जास्तच. अतिशय संयमी, हळवा असणारा, कुटुंबाची 24 तास चिंता असल्याने चेहऱ्यावर आठ्या आणून आयुष्याचा एक एक क्षण जगत राहणारा असा आपला हा साधासा नायक- संकेत.
नेहमीप्रमाणे सकाळी संकेत आजही फारच धावपळीत होता.. ऑफिसला जायची तयारी करत होता. आईने त्याला घाईघाईने डबा भरून दिला आणि शार्दुलला झोपेतून उठवलं. शाश्वती मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती. कानात इअरफोन होते. ते आईनं पाहिलं..
“शाश्र्वती , जा खाली जाऊन 4 कळश्या पाणी आणि पटकन.. “ असं म्हणत आई घरातला केर कचरा काढू लागली.
शाश्वती तशीच बसून राहीली. संकेत हातात घड्याळ घालत तिच्याकडे पाहत होता. ती मोबाईलमध्ये डोकं खुपसून गालातल्या गालात हसत होती. संकेत तिच्या जवळ गेला,” काय गं ? आई काय बोलली ते ऐकलं नाहीस का ? आणि काय एवढं आहे गं त्या मोबाईलमध्ये ? “
कानात इअरफोन असल्याने संकेत काय बोलतोय ते शाश्वतीला कळलं नाही.. संकेतने घड्याळ पाहिलं . सकाळचे ७:४५ वाजले होते, “ बापरे , पावणे आठ ? 8:26 ची लोकल चुकली ना तर आजही लेटमार्क लागेल .. आई , मी निघतो गं.”
“सावकाश जा..” - आई म्हणाली.
“हो..” असं म्हणत संकेतने बॅग उचलली आणि तो निघून गेला. इथे आईची नजर शाश्र्वती कडे गेली.. आई तिच्या कानातले इअरफोन खेचत म्हणाली, “अगं हे कानातले दोरे काढ , ते डबडं बाजूला ठेव आणि खाली जाऊन पाणी आण .. पाणी संपलं तर दिवसभर बोंबलत बसावं लागेल..”
“ होय गं जाते.. आणि ह्याला दोरे नाही इअरफोन म्हणतात ..” आळस देत शाश्वतीने सांगितलं.
“तेच गं ते.. जा पहिली .. पाणी आण. तोपर्यंत मी तुमच्यासाठी पोहे बनवते..”
“ जाते. “ असं म्हणत शाश्वती कंटाळा करत जागची उठली.
आई किचनमध्ये पोहे करायला गेली...आणि शाश्र्वती हंडा घेऊन जाताना शार्दुल दाराबाहेर व्हरांड्यात जाऊन दात घासत असताना तिने बघितलं, “ ए कार्ट्या , काय चाळीसमोर दात घासत उभा आहेस रे ? किती वेळा सांगितलं आत मोरी आहे तिथे घास कि दात.. घाणेरडा कुठचा.. त्यातल्या त्यात नशिब माझं अंघोळ इथे करत नाहीस..”
“ ए , चल पतली गली से निकल यहासे.. शेहेनशहा यहाँपे बिझी है..” कुठला तरी फिल्मी डायलॉग बोलत शार्दुल तिला हाकलवू लागला.
“शहेनशहा ला आईने पाणी आणायला सांगितलंय.. हि घे कळशी पाणी आण खालून.. पाणी संपलं ना तर दिवसभर बोंबलत बसावं लागेल..”
“ ए काय यार , सगळी कामं मलाच सांगता तुम्ही ? मी लहान आहे म्हणून एवढा छळ ?”
“जा हा सोन्या.. तिथपर्यंत पोहे करते मी..” त्याच्या हातात हंडा देत, त्याचे गाल खेचून शाश्वती म्हणाली.
“ बापरे . म्हणजे आज पोट बिघडणार माझं..”
“ ए कार्ट्या , नाटकं बंद कर . जा पाणी आण.”
“दात घासून जातोय गं..”
“ हा.. “ असं म्हणत शाश्वती आईपाशी जाते..
“आई , कर ना‌ गं पटकन पोहे.. खूप भूक लागल्ये..”
शाश्वती लगेच आल्याचं पाहून आईने विचारलं, “काय गं ? पाणी भरून झालं पण ?”
“ कारटं बोल्लं कि मी पाणी भरून आणतो.. म्हटलं जा.. त्याला कामं करायची हौस मग मी काय करू.”
“ कारटं काय म्हणतेस त्याला ? भाऊ आहे तुझा तो.. “
“ हं..”
इकडे संकेत धावत पळत, घामाघूम होऊन ऑफिसच्या लिफ्ट पर्यंत येतो न येतो तोच त्याला त्याच्या कलीगचा - गौरवचा कॉल येतो.
“ हॅलो, अरे संकेत आहेस कुठे?”
“ अरे 2 मिनिटात येतो. लिफ्ट मध्येच आहे मी आत्ता.” लिफ्टचं बटण दाबून संकेत म्हणाला.
“ ठिके, ये लवकर, बॉस तुला विचारत होते. थोडे चिडलेत तुझ्यावर, सो ये लवकर !”
“ काहीतरी नवीन सांग ना गौरव, बॉस कधी आपला happy दिसलाय का तुला ?” नेहमी चिडलेलाच तर असतो. आलोच मी.” त्याने कॉल कट केला आणि तोच लिफ्ट ग्राऊंड फ्लोअर वर आली. तो घाम पुसत लिफ्टमध्ये शिरला. त्याने 11 व्या फ्लोअरचं बटण दाबलं.. लिफ्टचं दार बंद होणार तोच एक 22-23 वर्षाची मुलगी कॉल वर बोलत बोलत, धावत लिफ्ट मध्ये शिरली आणि दरवाजा बंद झाला. तिने एक उसासा टाकला. 2 मिनिटं संकेत तिच्याकडे पाहत उभा राहीला. ती chaubby होती. गहुवर्णीय, लांबसडक केस, gen-z दिसणारी, ट्रेंडी कपडे घातलेली राधा. राधा वशिष्ठ.
“ पहले ही दिन लेट हो गई... क्या सीन है ये मुंबई का! ट्रैफिक, आवाज़, भीड़... हर चीज़ जैसे मेरी टेस्टिंग ले रही हो। ये शहर तो किसी को चैन से बैठने ही नहीं देता... और मैं, बनारस की आदतवाली, इतनी भागदौड़ में कैसे टिकूंगी? अब सोच रही हूं सही किया क्या यहाँ आके…? ” ती कुणाशी तरी call वर बोलत होती. नाईलाजाने त्याच्या कानी तिचं बोलणं ऐकू येत होतं. “ ती मुंबईची नसून बनारसची आहे हे त्याला तिच्या बोलण्यातून समजलं होतं. ही ‘बंबई’ नसून मुंबई आहे आणि मुंबई सगळ्यांना सामावून घेते असं ठणकावून सांगावं का हिला ? असा प्रश्न त्याला पडला पण उगाच काही ओळख नसताना चूक सुधारायला जाणं बरोबर नव्हे असं मनात म्हणत तो शांत उभा राहिला. तिचं एकीकडे मुंबईला बंबई म्हणणं चालू होतं तोच अकराव्या मजल्यावर जात असलेली लिफ्ट मध्येच बंद पडली. तिचं फोनवर बोलणं थांबलं. लिफ्ट अचानक बंद झाल्याने दोघेही जरा हादरले. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. त्यांचं असं हे लिफ्ट मध्ये अडकणं हीच सुरुवात आहे ह्या कथेची, त्यांच्यात फुलणाऱ्या एका नात्याची. मुंबईचा संकेत आणि बनारसची राधा !

To be continue
Written by poornanand mehendale

🎭 Series Post

View all