Login

मन सुद्ध तुझं

संबंध सेतू प्रणाली चंदनशिवे

ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2023 ची घोषणा झाली आणि माझ्या लिहिणाऱ्या सगळ्या मैत्रिणी लगबग करू लागल्या तेव्हा कुठे मला कळलं की असं काहीतरी असतं ते!

माझ्या वृषाली गुडे ह्या मैत्रिणीने तर मला यात भाग घेण्यासाठी फारच गळ घातली. 

"आपल्या लिखाणाचा अगदी कस लागतो लागतो त्यात. एक लेखक म्हणून आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत" तिने मला समजावलं.

मला वाटलं, असेल काहीतरी आपल दोन-तीन नवीन स्टोरी लिहायचं. तिला "ठीक आहे" म्हटलं आणि फॉर्म भरला. पण जेव्हा संजना मॅम यांचं  पहिलं लेक्चर झालं तेव्हा आकाशात विहरणारी मी धाडकन जमिनीवर कोसळले!

एक तर मराठीत लिहायला जेमतेम वर्षभरापूर्वी सुरुवात केलेली. त्यातून कथांच्या व्यतिरिक्त मी फारस कधी लेखन केलं नव्हतं. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या राऊंड पाहिल्यानतर कसं जमणार आपल्याला हे सगळं, आणि प्रत्येक वेळी टाइमलाइन सांभाळायची म्हणजे फारच कठीण बाबा.

स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीची मी फारच मनमौजी लिखाण करणारी होते. माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातलं अतिशय डीमांडिंग करिअर सांभाळून कसं बसं फक्त वीकेंडला लिखाण करायचे. आता स्पर्धेची टाइमलाइन पाहता आपण इथे पुरेसा वेळ देऊ शकू का किंवा आपल्यामुळे संघातल्या इतर मेंबर्सच नुकसान नको व्हायला असा विचार करून नाव मागे घेणार होते. पण त्यापूर्वीच संघ घोषित झाले.

माझं नाव पहिल्याच संघात आलं होतं. पाहते तो काय? माझ्या इतर प्लॅटफॉर्मवर लिहिणाऱ्या मैत्रिणींपैकी एकही या संघात नव्हती. 

फक्त एक नाव थोडसं ओळखीचं वाटलं आणि ते होतं "प्रणाली चंदनशिवे"

नावच किती कव्यात्म ना! नुसतं ऐकलं तरी एक गोडवा मनात भरून राहतो. तीची आणि माझी थेट ओळख नसली तरी आम्ही एका साहित्यिक ग्रुप मध्ये होतो. त्या ग्रुप वरच्या चर्चेत नेहमीच भाग घेणारी प्रणाली आपल्या टीम मध्ये पाहिली आणि थोडासा सुकून मिळाला.

सुरुवातीला आम्ही सगळे जेव्हा ग्रुप चॅट करायचो तेव्हा प्रणाली चर्चेत भाग घ्यायची पण व्हिडिओ किंवा ऑडियो कॉल म्हटला की मागे फिरायची. प्रत्येक फेरीत मात्र न चुकता वेळेवर आपलं योगदान द्यायची … तिच्या न बोलण्याच कारण तेव्हा कळत नव्हत पण मग एकदा तिनेच स्वतः बद्दल ग्रुपवर सांगितल. एवढ्याशा जीवाने काय काय आणि कसं कसं सहन केलं असेल या विचाराने मन भरून आलं.

पुढे आत्मकथन च्या राऊंड मधे ती नव्याने उमगली …. तिचं खडतर जीवन आणि त्यात अवचित आलेली संकटांवर संकटं वाचून मन सुन्न झालं. पण तरीही ह्या सर्वांवर मात करून ती कशी खंबीर उभी राहिली ते पाहून खूप खूप अभिमान वाटला.

प्रणालीचा जन्म धायटी नावाच्या छोट्याश्या खेडेगावात झाला. घरचं अठरा विश्व दारिद्र्य आणि चार भावंडे. नातेवाईकांनी पाठ फिरवलेली, हातावरच पोट आणि तशाही परिस्थितीत शिकून पोलीस व्हायची जिद्द!

ती जिद्दच तिला शाळेत घेऊन गेली आणि तिथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खरया अर्थाने प्रणाली बहरली. 

अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व, गायन, नृत्य, खेळ अश्या बऱ्याच क्षेत्रात ती आघाडीवर असायची. त्यामुळे तिला अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असं नावच पडलं होत. विशेष म्हणजे वक्तृत्व स्पर्धा तिला सर्वात जास्त आवडायची.

दमदार आवाज, स्पष्ट भाषा शैली, उत्कृष्ट वक्तृत्व यांच्या जोरावर अखिल भारतीय साने गुरुजी कथामालिकेच्या स्पर्धेसाठी निवड झाली. आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत नंबर मिळवण्याचा मान तिला मिळाला. खरोखरच तिच्यासाठी, तिच्या शाळेसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट होती.

पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

दहावीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली आणि प्रणाली खूप आजारी पडली. 3 महिने अंथरुणाला खिळलेली, शाळेतील शिकवणी बंद आणि परिणाम अभ्यासावर!

तेव्हाच तिच्या आयुष्याने खूप वेगळं वळण घेतलं. आजारपणामुळे तिला बहिरेपण आलं. 

त्याच परिस्थितीत बोर्डाची परीक्षा दिली आणि 78.60% गुण मिळवले. 

पण ह्या आजारामुळे तिचे आई वडील खूपच खचून गेले. होतील तेवढे उपचार केले, पण काहीच उपयोग नाही झाला. परिस्थिती ही बेताचीच होती त्यामुळे शिक्षण तिथेच खुंटल. 

ती ऐकू शकत नाही म्हणून आई वडिलांनी सोळाव्या वर्षी आत्याच्या मुला सोबत लग्न करून दिलं. इतक्या लहान वयात संसार पदरात पडला त्यामुळे तिला जास्त समज नव्हती. आणि नवरा सोडुन कुणीच समजून घेतलं नाही. उठता बसता टोमणे पाचवीलाच पुजलेले. कानांनी बहिरेपणा असलं तरी समोरच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात ना! ज्यांना ती आपल मानत होती ती माणसं कशी दुरावतात हे तिने जवळून अनुभवलं. आतड तीळ तीळ तुटत राहिलं ... पण नशिबाने नवऱ्याने तिला समजून घेवून साथ दिली आणि आजतागायत देत आहेत.

त्यानंतर आयुष्यात खूप बरेवाईट प्रसंग येत राहिले आणि पण ती निर्भिडपणे त्यांना सामोरी जात राहिली. जसजशी वर्षे सरत गेली तसतशी माणसं उमजत गेली. 

पण कौटुंबिक वातावरण आणि मानसिक तणाव यामुळे तिचं पोलीस बनण्याच स्वप्न मात्र विरून गेलं.

इतकं सर्व होऊनही ती विधत्याला मनापासून धन्यवाद देते ते ह्यासाठी की दुःखासोबत जगण्याची, त्यावर मात करण्याची ताकत त्याने तिला दिली,  तिचा आत्मविश्वास कधीच ढळू दिला नाही. 

त्या दुःखाला आड घालून चेहरा हसरा ठेवण्याची कला तिच्या लेखणीत आहे.

"आज देवाने दोन गोंडस मुली पदरात टाकल्या आहेत अजून आयुष्यात काय हवं?" असं म्हणणारी प्रणाली, मनातलं कागदावर रेखाटण्याची प्रबळ इच्छाशक्ती घेऊन ती आज जमेल तसं लिहिते आहे. व्यक्त होते आहे.

नियतीने निर्माण केलेल्या अवघड परिस्थिती पुढे हार न मानता प्रणाली एका कसलेल्या योद्धा सारखी लढली आणि टिकून राहिली हे सर्वात महत्त्वाचं. लढा अजून संपला नाही तरीही त्या लढ्यासाठी लागणारा आत्मविश्वास आता तिच्याकडे आहे. 

शेवटी इतकंच म्हणेन की …

आपलं मन प्रणाली सारखं शुद्ध असावं मग कोणाचीही भीती न बाळगता आलेल्या संकटांवर आत्मविश्वासाने मात करत गगनझेप ती नक्कीच घेईल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. 

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवि मोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

अशीच सदा बहरत रहा आणि तुझ्या चेहऱ्यावरच ते गोड स्माइल नेहमीच अक्षय राहो.

प्रणाली तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

0