मनाची मशागत - १ : वाचनाचे फायदे
सतत करावेअवांतर वाचन
होईल आपले समृद्ध मन
वाचनाचा जपावा छंद
वाचनातून मिळतो निर्भेळ आनंद
होईल आपले समृद्ध मन
वाचनाचा जपावा छंद
वाचनातून मिळतो निर्भेळ आनंद
वाचन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बालपणात पाटीवरील अक्षरे बोलकी झाली. गिरवलेली अक्षरे मनाच्या गाभाऱ्यात रुंजी घालू लागली. संस्कार, शिष्टाचार यामुळे त्यांना नवी दिशा मिळाली. मुखात ती सहज रुळू लागली.अक्षरामुळे शब्दनिर्मिती झाली त्यामुळे नवीन अर्थप्रवाही शब्द बनले त्यातून वाचनाची गोडी लागली.गतीमान झालेले मन भरभर वाचू लागले आणि जीवनात वाचनामुळे प्रगल्भता अधिक जवळ आली.
वाचनामुळे चालना मिळते.नवीन शब्दामुळे ज्ञानात भर पडून माहिती मिळते. वाचनामुळे लेखकांचे साहित्य मनमुराद वाचू शकतो. त्यांच्या प्रत्येक पात्रात आपण समरस होतो, वाचनाचा आनंद घेतो ही अनुभूती वेगळीच वाटते. वाचनामुळे आपण विचारांने परिपक्व होतो त्यामुळे सयंम कसा राखायचा शिकायला मिळते. वाचनातून सर्वप्रकारचे ज्ञान मिळते. वाचनातून आपले स्वतःचे मत तयार करु शकतो.आपले विचार कृतीतून समाजापुढे मांडू शकतो.
चाकोरीबद्ध वाचने म्हणजे चांगल्या ज्ञानाला मुकणे यासाठी अवांतर वाचन काळाची गरज आहे. शालेय जीवनात केवळ अभ्यासाक्रमातील पुस्तके वाचली जातात परंतू ज्ञानाने जर समृद्ध व्हायचे असेल तर वाचन केले पाहिजे. वर्तमानपत्र, कथा, कादंब-या, साप्ताहिके इत्यादींचे वाचन केले असता भरपूर ज्ञान मिळते.पण कोणती पुस्तके वाचावी याची आवडीनुसार प्रथम यादी करावी आणि ग्रंथालयातून मागणीनुसार वाचावीत.
वाचनासाठी बौद्धिक विकास होणारी पुस्तकेसुद्धा वाचली पाहिजेत जेणेकरून मनाची मरगळ जावून आपल्यात स्फुर्ती येईल. यासाठी अनेक लोकांची आत्मचरित्रे वाचली पाहिजेत त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यावर त्यांनी केलेली मात यावर मंथन करुन आपणही प्रेरणा घेतली पाहिजे तरच जीवनात यशस्वी होता येईल याकरिता वाचनासाठी सतत क्रियाशील राहिले पाहिजे.
वाचनाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले पाहिजे.श्रेष्ठ व्यक्तिंची आत्मचरित्रे, दर्जेदार वाडःमय, इतिहास, राज्यशास्र, समाजशास्र, मानसशास्र, अर्थशास्र, तत्वज्ञान, विविध समिक्षा, भाषेतील अनुवाद यामुळे आपल्यात बदल घडेल आणि वाचनाची गोडी निर्माण होईल.
वाचनाचे महत्व विषद करताना ठळकपणे जाणवते की वाचनाशिवाय आपण समृद्ध होऊच शकत नाही. वैचारिक क्षमतेत प्रगल्भता, नवे विचार मांडण्याची कल्पकता, समाजात आत्मविश्वासाने बोलण्याची कला , जगात काय चालले आहे याची जाणीव , भाषातंत्रातील वेगळेपण जपण्याची आपलेपणाची भावना , जीवनाकडे बघण्याचा सकस दृष्टीकोन, व्यक्तिमत्वात आलेली नवी झळाळी , स्री - पुरुष यांच्यात वैचारिक देवाणाघेवाणीसाठी समन्मय असण्याची जाणीव , आपण कुठे चुकतो यांचे सिंहावलोकन करण्याची जाणीव आणि आपण वाचनाने समृद्ध विचारांनी बहरलो आहोत हे समाधान कृतीतून दिसणे यासारखे मौल्यवान फायदे वाचनाने होतात याचा पाठपुरावा करणे नितांत गरजेचे आहे.
मोबाईल, सोशल मीडिया, दूरदर्शन यासारख्या मनोरंजनाच्या साधनामुळे वाचनसंकृती धोक्यात आली आहे यासाठी शाळा , कॉलेजमधून वाचनासाठी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. गावागावातील वाचनालयात पुस्तके उपलब्धते बरोबर योग्य मार्गदर्शन करायला हवे.घराघरात वर्तमानपत्र , पुस्तके वाचायची सवय लागली पाहिजे.महिलांनाही प्रवाहात सामावून घेतले पाहिजे त्यामुळे चांगले संस्कार , चांगले विचार प्रत्येकामध्ये निर्माण होतील दर्जेदार व्यक्तिमत्व निर्माण होवून आपला देश वैचारिक समृद्धतेने नटलेला दिसेल त्यासाठी वाचन संकल्पना सर्वासाठी फायदेशीर व हितकारक आहे.
© नामदेवपाटील