मानलं तर मुलगी - नाहीतर सूनच
"आई, चहा झालाय... आणू का तुम्हाला? अन्विताने किचनमधून तिच्या सासूला विचारलं, बोलताना तिचा आवाज एकदम घाबरलेला होता.
मालतीबाई म्हणजेच अन्विताची सासू खुर्चीत बसून वर्तमान पत्र वाचत होत्या. त्यांचं काहीच उत्तर आलं नाही म्हणून ती त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. पण त्यांनी मान वर करून सुद्धा पाहिलं नाही. त्यांनी तिच्या हातातून चहाचा कप घेतला आणि एक घोट घेतला नाही तर लगेच त्यांची बडबड चालू झाली.
"काय गं, किती वेळा सांगितलंय मी तुला... मला जास्त गोड चहा नाही आवडत तरी सुद्धा तू आजही जास्त साखर घातलीस." मालतीबाई तिला ओरडल्या. अन्विता काहीच न बोलता सरळ किचनमध्ये गेली. तिचे डोळे पाणावले आणि हात पाय सुद्धा थरथरू लागले. तिला खूप रडायला येत होते पण त्या घरात तिचे अश्रू पुसणारंही कोणी नव्हतं. तिने तसेच डोळे पुसले आणि कामाला सुरुवात केली.
अन्विताच्या लग्नाला सहा महिने झाले होते पण आजही तिला या घरात स्वतःचं असं काही वाटत नव्हतं. घर फक्त म्हणायला तिचं होतं पण सासू तिला परकेपणाच दाखवत होती.
अन्विता साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली होती. तिचे आई वडील दोघेही शिक्षक होते. सासूला आईच मानायचं हिच शिकवण तिला त्यांनी दिली होती. पण इकडे सासरी सगळंच चित्र अगदी उलटं होतं. मालतीबाई तिला कधीच मुलीप्रमाणे वागणूक देत नव्हत्या.
मालतीबाईंनी त्यांच्या आयुष्यात खुप दुःख, कष्ट सोसले होते. त्यांचा मुलगा राहुल पोटात असतानाच त्यांना वैधव्य आले होते. तेव्हापासून त्या खुप एकट्या पडल्या होत्या. राहूलचा जन्म झाल्यापासून त्यांनी खुप काबाडकष्ट करून त्याला वाढवलं होतं आणि त्याचं शिक्षणही केलं होतं. तो आता चांगल्या नोकरीला होता. सगळं काही व्यवस्थित होतं पण मालतीबाईंच्या मनात एकच भिती होती ती म्हणजे आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल की काय, त्या भितीमुळेच त्या अन्विताशी तुटकपणे वागत होत्या. पण अन्विता काहीच तक्रार करत नव्हती.
अन्विता पहाटे पाचला उठायची. सगळ्यांचा चहा, नाश्ता, डबा, स्वयंपाक, घरकाम… सगळं व्यवस्थित करून मगच ती स्वतःसाठी वेळ काढायची.
तरीही मालतीबाईंची किरकिर चालूच असायची. "आज पोळी जरा जळाली आहे. उद्या काय तर भाजी तिखटच झालीय." हे टोमणे तिला रोजचंच ऐकायला मिळायचे.
रात्री राहुल जेव्हा जवळ असायचा, तेव्हाच तिला स्वतःची किंमत असल्यासारखं वाटायचं. पण सकाळ होताच ती किंमत पुन्हा शून्यावर येऊन ठेपायची.
एक दिवस राहुल लवकर ऑफिसला गेला होता. घरात फक्त अन्विता आणि मालतीबाई होत्या. दुपारच्या वेळी
अन्विता अंगणात कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता आणि अचानक "आ…!" अशी एक जोरात किंकाळी तिच्या कानावर पडली. अन्विता धावत बाथरूमकडे गेली. मालतीबाई खाली पडल्या होत्या. त्यांच्या कपाळातून रक्त येत होतं. पाय पण वाकडा पडला होता.
अन्विता अंगणात कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता आणि अचानक "आ…!" अशी एक जोरात किंकाळी तिच्या कानावर पडली. अन्विता धावत बाथरूमकडे गेली. मालतीबाई खाली पडल्या होत्या. त्यांच्या कपाळातून रक्त येत होतं. पाय पण वाकडा पडला होता.
"आई…!" अन्विता थरथरत्या आवाजात बोलली. नंतर तिने एक क्षणही विचार केला नाही. लगेच मालतीबाईंना उचलून बाहेर आणलं. आणि रिक्षा बोलवली. एकटीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर आले आणि त्यांनी मालतीबाईंना तपासलं.
"बरं झालं लवकर घेऊन आलात, नाही तर थोडा जरी उशीर झाला असता तर पायाचं हाड मोडण्याचा धोका होता." डॉक्टर म्हणाले.
त्यांचं बोलणं ऐकून अन्विता खुर्चीत बसली आणि सुटकेचा श्वास घेतला. मालतीबाईंना फार गंभीर दुखापत झाली नाही म्हणून तिने मनातच देवाचे आभार मानले.
मालतीबाई बेडवर झोपल्या होत्या. अन्विता त्यांच्या बाजूला बसली होती. पण तिच्या डोळ्यांना झोप नव्हती.
मालतीबाईंना जेव्हा जाग आली तेव्हा समोर पाहिलं तर अन्विता होती. तिला बघून त्यांनी हळू आवाजात विचारलं.
"तू… तू माझ्यासाठी इतकी धावपळ का केलीस? त्यांनी विचारल्यावर अन्विता क्षणभर शांत राहिली, मग म्हणाली
"कारण तुम्ही जरी मला सून मानत असला तरी… मी तुम्हाला मनापासून आईच मानते. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात." तिच्या त्या एका वाक्याने मालतीबाईंना त्यांची चुक कळली.
"मी तुला इतकं दुखावलं… तरी तू… आज माझ्यासाठी एवढं केलंस." मालतीबाई म्हणाल्या. त्याचवेळी अन्विताच्या डोळ्यांत पाणी आलं.
"आई, तुम्ही तुमच्या आयुष्यात खुप सोसलयं ते मला माहित आहे, तुमचं दुःख कळतंय मला… पण मी कधीही तुमच्यापासून तुमच्या मुलाला तोडायचा विचार केला नाही. मला फक्त तुमच्यात आणि माझ्यात एक नातं हवं होतं." अन्विता थरथरत्या आवाजात म्हणाली तसं मालतीबाई तिच्या बोलण्याचा विचार करू लागल्या.
रात्री मालतीबाई झोपल्या नाहीत. त्यांना मागचं सगळं आयुष्य आठवत होतं.
हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मालतीबाई काही दिवस बिछान्यावरच होत्या. त्यांना पायामुळे नीट चालता येत नव्हते त्यामुळे अन्विता त्यांचं सगळं काही मायेने करत होती. त्यामुळे आता मालतीबाई पण हळूहळू बदलत चालल्या होत्या आणि त्यांची तब्येतही बरी होत होती. घरात रोज ऐकू येणारे टोमणे आता बंद झाले होते.
जेव्हा मालतीबाईंची तब्येत बरी झाली तेव्हापासून त्या घरातली हलकी सालकी कामं करू लागल्या. अन्विताला ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या नीट समजून सांगू लागल्या आणि तिला प्रेमाने शिकवू लागल्या. त्यामुळे दोघींमधलं नातं चांगलं घट्ट होऊ लागलं होतं.
एक राहूल ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला समोर एक दृश्य दिसलं. त्याची आई आणि बायको एकत्र हसत बोलत भाजी निवडत होत्या. ते बघून राहुलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.
"आई, आज तू खूप वेगळी वाटतेयस आणि आनंदी सुद्धा वाटतेय. असाच आनंद मला कायम तुझ्या चेहऱ्यावर बघायचा आहे." राहुल म्हणाला. तसं मालतीबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
"हो नक्कीच, पण आज मला एक गोष्ट कळली आहे. माझ्या आनंदाची शत्रू मीच होते… पण आता नाही. आता मी प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणार आहे. आज मला एक गोष्ट नीट कळली… सून घरात येते… पण एक मुलगी आयुष्यात येते! हे मी विसरलीच होती." मालतीबाई म्हणाल्या.
"हो आई, सगळं आपल्या मानण्यावर असतं. मानलं तर सूनही मुलगीच असते. नाही मानलं तर मग ती सूनच राहते." राहुल म्हणाला.
"हो बरोबर आहे तुझं.... आजपासून अन्विता माझी सून नाही तर मुलगीच असेल." मालतीबाईंच्या त्या वाक्याने अन्विताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने लगेच त्यांना मिठी मारली. त्या दोघींना असं बघून राहुलचं मन समाधानी झालं.
मालतीबाईंनी अन्विताला मुलीचा दर्जा दिल्यापासून त्यांचं घर आनंदाने भरून गेलं, त्या दिवसापासून घरात कुठलेही वाद झाले नाही. अन्विताला घराबरोबरच घरातली माणसं पण आपलीशी वाटू लागली.
समाप्त.
सौ. रोहिणी किसन बांगर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा