Login

मनवलेल्या बहिणीचे भावाला पत्र

मनवलेल्या बहिणीचे भावाला पत्र

प्रिय दादूड्या,
गोड सप्रेम नमस्कार.

पत्रास कारण की तुझे पत्र मिळाले, वाचून काय वाटले मला ते मी शब्दांत नाही सांगू शकत. किती वेळा माफी मागशिल रे वेड्या. मी तुझ्यावर रागावले कारण तू माझ्यावर ओरडला होतास म्हणून. नेहमीचेच आहे हे तुझं, कुठला राग कोठेही, कुणावरपण काढतोस. असं कुठे असतं का रे? जाऊ दे आता शेवटं माफ करतेय हं..इथून पुढे जर ओरडलास ना तर बघच मग. खरंच मौन व्रत धारण करेन. मग नंतर कितीही लाडीगोडी लाव, मस्का मार, अगदी मँगो बर्फीचे अख्ख दुकान जरी खरेदी करून दिलंस ना तरीही नाही बोलणार मी, सांगून ठेवते आधीच. परत म्हणून नकोस की आधी का सांगितले नाहीस ते?

माझ्या आवडीची मँगो बर्फी पाठवण्यासाठी खूप थँक्यू. पण खरं सांगू, नात्यांमध्ये असा रूसवा फुगवा असायला हवा. त्यात बहिणभावाच्या नात्यांत तर तो हवाच. त्याशिवाय आपल्या नात्यातील गोडवा कसा बरं वाढेल? तुझ्यासोबत तू तू मैं मैं करायला मलाही जाम मज्जा येते. कधी तू रागवावं मग मी रूसावं आणि मग तू मनवावं. तर कधी मी रागवावं, तू रूसावं आणि मी तुला मनवावं. हे रुसणे व मनवणे असंच चालू राहावं. त्याशिवाय एकमेकांच्या आवडीचे कसे बरं मिळणार ना.

ये बाबा गंमत करतेय रे मी. नाही तर खरंच रूसून बसशील लगेच आणि मग तुला मनवण्यासाठी पापड बेलावे लागतील मला आणि इकडे तुझे भावजी मलाच धारेवर धरतील. कारण तू त्यांचा लाडका मेहुणा जो आहेस. इतरवेळी माझं ऐकून घेतात. पण तुझ्याबाबतीत नाहीत ऐकत ते. तुला माहिती तू त्यांना मी तुझ्यावर रूसलेय हे सांगितल्यावर किती समजावून सांगितले होतं त्यांनी मला. मी लटका राग दाखवला तर माझ्यासमोर तुम्ही दोघं बहिण भाऊ बघून घ्या म्हटले उगीच नाटकी वरवर बरं का? तसे तर त्यांनीच मला समजावलं हं.

बरं, काय म्हणतोस माझ्या नवऱ्याची स्तुती नको का? हम्म..बसं करते हो, तुझं भावजी पुराण.

बरं ऐक आता, तूच म्हणाला होतास ना, तुला काय पाहिजे ते माग म्हणून. तर मला तुझी साथ हवी, कायमसाठी आणि छानच तुझं हसू. देशील ना..

ये वेड्या लगेच डोळ्यात पाणी आणू नकोस हं. मी हसायला सांगितले. काय! नाही तर पन्नास हजारांची पैठणी मागेन हं.. डोळे मोठं झाले ना, वेड्या गंमत करतेय रे ते.

बरं चल थांबते आता. रूसवा गेलाय माझा केव्हाचाच. ते तर मला पाहायचं होतं की माझा वेडूला दादूड्या मला कसा मनवतो ते. आवडती मँगो बर्फी पाहूनच राग फुर्र ऽऽ झाला होता. साॅरी हं..तुला त्रास देण्यासाठी. मला आवडतं तुला असं सतवायला. मग तो माझा हक्क आहे ना, तुझ्यावर रूसण्याचा व तुझ्याकडून मनवून घेण्याचा. पण एक सांगते, ऑफिसच्या कामाचे टेन्शन नको घेत जाऊस आणि त्याचं रागही घरी माझ्यावरच काय कोणावरही काढायचस नाही. तसं तू प्राॅमिस केलं आहेस म्हणा, बघू कितपत निभावतोस ते.

बघ, थांबते म्हणाले तरी लिहित बसले. पण खरंच रे, फोनवर बोलण्यापेक्षा असे पत्र लिहिणे भारी वाटतं हा, आपण ना अधूनमधून खोटंखोटं भांडण जाऊ आणि मग असं पत्र लिहून मनवत जाऊ. कसली भारी आयडिया आहे ना. ये हसू नकोस हं. जा बाबा!

बरं चल बाबा, खरंच थांबते, नाही तर माझी बडबड काय अशीच चालू राहिलं, मग परत यावरून अजून बोलशील. आधीच म्हणतोस तुझी बोलण्याची मशीन चालू झाली की बंद व्हायचं नावच घेत नाही म्हणून. काळजी घे, लव्ह यू, माझ्या वेड्या दादूड्या.

कळावे,
तुझीच वेडूली

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all