Login

मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.०५

मनीषाची मनस्थिती कोणी समजून घेईल? की, तिची मानसिक कुचंबणा अशीच चालू राहील.
स्वयंपाक घरात सगळ्यांचे जेवण शांतपणे होते. आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीत निघून जातात.

सगळ्यांचे जेवण झाल्यावर, मनीषा एकटीच जेवण करते. सर्व भांडी गोळा करून स्वयंपाक घर स्वच्छ करते. नंतर, भांडी घासून मांडणीत जिथल्या तिथे ठेवते.
आणि आपल्या खोलीत येते. तर, आनंद कोणते तरी पुस्तक वाचत पलंगाच्या शेजारी अंथरूण टाकून खाली जमिनीवर निवांत पडलेला असतो.

मनीषा खूप दुखी होते. ती मनातच बोलते. असं किती काळ चालणार हाय ह्यांचं?

खोलीचा दरवाजा लाऊन ती ही पलंगावर येवून बसते. आनंद पुस्तक वाचनात इतका हरवलेला असतो की, त्याला मनीषा आलेली ही कळत नाही.

मनीषा थोडा वेळ आनंद ने पुस्तक ठेवण्याची वाट बघते. पणं, तो आपल्याकडे लक्षच देत नाही हे पाहून ती बोलू लागते.

"आवो ऐका की.' आनंदला तरी ही तिचा आवाज जात नाही.
ती पुन्हा मोठ्याने बोलते. "आवो मी काय म्हणते जरा ऐका की!"

ह्या वेळेस मात्र आनंदच्या कानावर तिचा आवाज पडतो. आणि, तो पुस्तक बाजूला करत, थोड दचकूनच तिच्याकडे बघत बोलतो.

"तू... तू कधी आलीस?"
( आनंद शहरातल्या मुलांना शिकवत असल्याने, त्याच्यावर शहरी भाषेत बोलण्याचा प्रभाव असतोच. पणं, आपल्या घरी मात्र तो लहानपणापासून बोलत आलेल्या बोली भाषेतच, आपल्या माणसांशी संवाद साधत असतो. तरी अध्ये मध्ये त्याच्या बोलण्यात शहरी भाषा येतच असते.)

मनीषा, त्याच्या दचकण्याने गालातल्या गालात हसते. आणि, बोलते.
"म्या वयं.. 
म्या येवून जमाना झाला की. तुमचं आपल पुसकात (पुस्तक) वाचनं चालू हुतं. तेव्हाच आली की म्या.
बर त्यें जाऊ द्या. मी काय म्हणते.."

तोच, आनंद हातातले पुस्तक बाजूला ठेवून, तिचे बोलणे तोडत बोलतो.
"किती वाजले? स्वतःच्या मनगटातले घड्याळ बघून, अरे देवा!
अकरा वाजत आले की, चला मी झोपतो." मला सकाळी लवकर निघायचं हाय.
म्हणत, आनंद अंगावर चादर घेत मनीषाच्या विरूध्द बाजूला कुस बदलतो.

मनीषाला खूप राग येतो. ती तसेच आनंदकडे बघत बोलते.
काय वो, "तुम्हाला लग्नाच्या बायकुशी दोन शब्द बोलायला जड जातंय व्हय? मग लगीन तर कश्याला करायचं माझ्याशी?

'रोज बघलं तवा, राती उशिरा घरी यायचं.  अन्, दिस उजडायच्या आत' घरातन बाह्यर पडायचं.
तुम्हाला कधी वाटत नाय का? माझ्या बर बोलावं.
म्या कशी असल? काय करीत असल? साधं एवढं सूदिक विचारावं वाटत नाय!

"त्ये बी राह्यलं म्हणते म्या.
पणं, "जवा कधी म्या तुमच्याशी बोलायला येईन' तवा बी हायच तुमचं' उशीर झालाय झोपतो आता म्हणूनश्यानं.

'आवं, एवढा का माझा तरास हुतं असल तर सांगा की मला सरळ सरळ चालती हू म्हणून!
मला बी असला रटाळ संसार करायचा कंटाळा आलाय आता. नाय तरी काय हाय माझ्या मेलीच्या जीवनात?

ज्याला सात जल्माच (जन्म) साथी मानलं त्याला जरा सुदिकं किंमत नाय माझी.'
मग कश्यापायी ह्या संसाराच ओझ म्या एकटीच रेटत बसू सांगा की..."
म्हणत, मनीषा रडू लागते.

तिचे रडणे ऐकून' आनंद अंथरुणात उठून बसतो. आणि, रागातच तिला बोलतो.

"ये बाय!
गप गुमान पड की आता. उगाच डोक्याला ताप करू नगस माझ्या' सांगून ठीवतू. तुला जायचं असल जा, नायतर रहा. माझ्या मागं उगच हये रडगाण लावयच नाय."
म्हणत, आनंद पुन्हा पांघरूण अंगावर घेतो आणि झोपतो.

मनीषाचा हुंदका थांबता थांबत नसतो.
पांघरुणातून आनंद जरा चिडूनच बोलतो. "लाईट बंद कर आणि झोप नायतर बाहेर जाऊन रडत बस. मला झोपू दे शांत."

मनीषाला अतीव वेदना होत असतात. ती रागातच उठते आणि लाईट बंद करून खोलीचा दरवाजा उघडत रडत बोलते.

"आपला नवराच समजून घेत नाय तर जगाकडून काय अपिक्षा (अपेक्षा) करणार म्या तरी!"
म्हणत, ती खोलीचं दार जोरात लावते आणि अंगणात जाते.

तिथे एका कोपऱ्यात बसून ती स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून देते.
घरात सुबोध सोडून, सगळेच आपापल्या खोलीत शांत झोपलेले असतात.

सुबोध एकटाच शतपावली करण्यासाठी घरातून बाहेर पडलेला असतो. गावाकडील स्वच्छ हवा, निसर्गाचे सानिध्य, आणि, वर  काळ्याभोर आकाशात चमचमणारे तारे..
हे सगळ पाहून तो भारावलेला असतो.

आपण शतपावली करत कुठपर्यंत आलोय ह्याचे ही त्याला भान राहिलेले नसते. गावाबाहेर मरीआईच्या डोंगरावर तो एकट्यानेच आलेला असतो. थोडावेळ मरीआईच्या देवळात बसून आसपासचा शांत निसर्ग देखावा तो डोळ्यात साठवून घेतो.

शहरात वाढलेल्या सुबोधसाठी हे सगळेच नवीन असते. त्यामुळे, मुक्त निसर्गाची उधळण झालेल्या सोनगाव मध्ये येताच त्याला प्रसन्न वाटते.

आत्ता ही शतपावली निमित्त बाहेर पडलेल्या सुबोधला पुन्हा घराकडे जावेसे वाटत नसते. पणं, रात्र फार झाली आहे या विचाराने त्याची पावले आपसूक घराकडे वळतात.

चांदण्याच्या प्रकाशात रस्ता स्पष्ट दिसत असल्याने सुबोध आरामात पावले टाकत घराकडे येतो. 
बाहेर अंगणात आल्यानंतर तिथेच आंब्याच्या झाडाच्या चौथर्यावर तो थोडावेळ निवांत बसतो. तेवढ्यात त्याला कोणीतरी मुसमुसत असल्याचा आवाज येतो.

सुबोध एकदम दचकतो. अंगणात लाईट नसल्याने त्याला चंद्राच्या प्रकाशात फारसे काही दिसत नसते.
तो हळूवार आपल्या श्र्वासांचा ही आवाज येणार नाही इतक्या हळुवार उभा राहत आसपास अंदाज घेतो. त्याला आसपास कोणी ही दिसत नाही. पणं, मुसमुसण्याचा आवाज मात्र येत असतो. तो तसेच हळुवार पावले टाकत घराकडे निघतो.

घराचे दार नुसते पुढे ढकललेले असते. तो दार उघडणारच की, त्याला अंगणाच्या कोपऱ्यात कोणी तरी स्त्री बसल्याचे अस्पष्ट दिसते.

सुबोधला दरदरून घाम फुटलेला असतो. इथून कधी एकदाचे आत जातोय अस त्याला होते. पणं इतक्यात त्या स्त्रीचा रडत काही बोलत असल्याचा आवाज त्याच्या कानी पडतो.

"आयं मला नाय राहायचं ग इथ!
मला इथून घिवून (घेवून) जा..  (अस्पष्ट हुंदका.)
तू.... तुझी लेक एकटी पडलिया बघतीस ना!

'आय मला खरच नाय राहायचं इथ.
बा अन् तू ये ना ग एकदातरी मला भेटाया!
पाच परतवणीला तुम्हासणी शेवटचं बघितल हुतं म्या.
आता त्येला बी पाच वरीस झालं की.'

तुम्हाला' माझी जरा सुदिक आठवण येत नाय का ग? एकदा तरी यायचं हुतं की, आपली लेक जिवंत हाय का मेली बघाया."
म्हणत, मनीषा ताऱ्यांशी बोलत' रडत असते.

घाबरून घरात जाणाऱ्या सुबोधची पावलं आपसूक मनीषाकडे वळतात.
तो मनीषाच्या पाठीमागे येवून थांबतो. पणं, मनीषाचे त्याच्याकडे कसलेच लक्ष नसते. ती आपल्याच नादात बोलत असते.

"आयं लग्नाला पाच वरीस झाले माझ्या. पणं, अजुन ह्यांनी मला जवळ केलं नाय ग. यात माझी काय चुकी? तूच सांग एकदाचं.
'इथं जे ते मला माझी कुस उगवणा म्हणून बोल लावत्यात. पणं, कुणी ह्यांना एका शब्दाने बोलणा बघ..
म्या कुणाला माझी तकलीफ सांगू? सांग ना ग! इथं हाय का कोण माझं म्हणून असं?" म्हणत, मनीषा पुन्हा हुंदके देत रडू लागते.

सुबोध तिच्या मागे उभा राहून तिचे सगळे बोलणे ऐकतो. पणं, तिला जराही जाणीव करू न देता' आल्या पाऊली मागे फिरतो.
अर्धवट उघडलेल्या दारातून हळुवारपणे आत जात तो हळूच दरवाजा पुढे ढकलतो आणि आपल्या खोलीत जातो.

खोलीत अंजू  नुकतीच उठून बाळाला दूध पाजत असते.. त्याला आत आलेले बघून ती बाळाला त्रास होणार नाही अश्या आवाजात बोलते.

"अहो काय हे! किती वेळ झाला. इतक्या रात्री बे रात्री अस एकट्याने फिरू नये. एवढे ही कळत नाही का तुम्हाला?"

सुबोध आपले कान पकडून हळूच बोलतो. "सॉरी."
म्हणत, तिच्या शेजारी येवून बसतो.

झोपलेल्या बाळाला अंजू हळूच खाली ठेवते. आणि, त्याच्या अंगावर एक मऊ मुलायम कपडा टाकते. सुबोध अंजूची बाळाबद्दल काळजी पाहून सुखावतो. अंजू त्याच्याजवळ येवून त्याला बिलगते. आणि, बोलते. "कुठे गेला होतात इतक्या रात्री?"

"अग इथेच होतो. मरी आईच्या डोंगरावर जरा शतपावली करायला गेलो होतो."  "काय? इतक्या रात्री तुम्ही शतपावली करण्यासाठी मरीआईच्या डोंगरावर गेला होतात! अहो काळ वेळेचे जरा तरी भान ठेवत जा. किमान आपल्याला एक लहान पोरं आहे. त्याला काही त्रास होवू नये म्हणून तरी..."

तसे, सुबोध तिचे बोलणे खोडत बोलतो.
"अग तू तर अस बोलत आहेस की मी इतक्या रात्री मरीआईच्या डोंगरावर नाही तर स्मशानात जाऊन आलोय."

तसे, अंजू त्याच्या तोंडावर हात ठेवत बोलते. "अहो जरा शुभ शुभ बोला ना."
सुबोध नुसता "हम्म" करतो.
आणि आपल्याच विचारात हरवून जातो.

खोलीत निर्माण झालेली शांतता अंजूला खाऊ लागते आणि ती पुन्हा सुबोधशी बोलते. "काय विचार करताय?"

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.


0

🎭 Series Post

View all