मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.१७

आपल्याच कुटुंबाकडून सुनेची होणारी हेळसांड पाहून अंजू आपल्या निर्णयावर ठाम होईल का? मनीषा आपल्या भविष्यासाठी काय निर्णय घेईल?
"हॅलो! हा, बोल अंजू. इतक्या सकाळी फोन केलास, सगळे ठीक आहे ना?"
अंजू : "सुबोध' तुम्ही आत्ताच्या आत्ता, मला न्यायला या.
मला इथे नाही राहायचं."
सुबोध : "अग पणं, झाले काय? एवढ्या तातडीने बोलवत आहेस म्हणजे, काही तरी नक्कीच झाले असणार ना!"
अंजू : "हो झाले ना.. खूप काही झाले आहे. जे मी तुम्हाला' फोनवर नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला माझ्या समोरच यावं लागेल. तेव्हा आपण बोलू."
सुबोध : "बरं डियर. थोड्या वेळात बाबा उठले की, मी घरी जाऊन फ्रेश होतो आणि निघतो चालेल ना?
अंजू : हम्म! ठीक आहे. मी वाट बघते."
म्हणत, फोन ठेवते.

सुबोध डोक्याला हात लावून, वर बघत बोलतो.
" देवा! आता अजुन काय नवीन घडले असेल? काय कळेना! अंजू' माहेरपणाला गेलेली असताना, एवढं सगळ घडले आहे. त्यात, मनीषा वहिनी अन् तीचे सुर अजूनतरी जुळले नाहीत. होप सो! सगळ काही ठीक कराल तुम्ही." म्हणत सुबोध पुन्हा मनीषाच्या रूम मध्ये जातो.

सकाळी नऊ वाजता सुबोधचे' बाबा फ्रेश होवूनच, रूम बाहेर पडतात. आणि तडक, मनीषाच्या रूम मध्ये जातात. तिथल्या सिस्टरही, आपल्या पुढील कामासाठी रूम मधून बाहेर पडलेल्या असतात. आणि सुबोध' मनीषाच्या बेड शेजारी, खुर्ची टाकून त्यात, वेडेवाकडे अंग करून झोपलेला असतो. बाबा मनीषा जवळ येत, तिच्या डोक्यावरून प्रेमाने, हळुवार हात फिरवतात. आणि सुबोधला' न उठवता, त्याच्यासाठी चहा आणायला सरळ, कॅन्टीन गाठतात.
कॅन्टीनमधून, चहा आणून ते सुबोधला उठवतात. सुबोधही, बाबांना' मनीषाजवळ बसवून, फ्रेश होवून येतो. आणि मग, दोघे मिळून चहा घेतात.
चहा घेत असतानाच, सुबोध' बाबांना सांगतो की, तो अंजूला आणायला सोनगावला जात आहे. बाबा त्याला जाण्यास परवानगी देतात.
तसा, सुबोध घराकडे जायला निघतो. तिथून सोनगावच्या सिस्टरांना सोबत घेवून, सुबोध सोनगावकडे रवाना होतो.

सोनगावात, अंजू आपली व बाळाची बॅग, व्यवस्थीत भरून ठेवते. आणि बाळाला सोबत घेवून ती, नाश्त्यासाठी खोलीतून बाहेर येते..
आबा, शंकर आणि आनंद आपापल्या कामाला घरातून सकाळीच बाहेर पडलेले असतात..
विजू' स्वयंपाक घरात काहीतरी काम करत असते. तर, आत्त्याबाय' अंगणात निवांत बसलेल्या असतात. गणू' तिथेच अंगणात खेळत बसलेला असतो. आणि शोभा' शाळेत गेलेली असते. अंजूला थोडे आच्चर्य वाटते. कारण, घरात कोणालाच मनीषा नाही. त्याचे काहीच सोयरसुतक नसते. ती वहिनीला नाश्ता द्यायला सांगून. बाळाला घेवून, बाहेर आई जवळ येऊन बसते.

आत्त्याबाय, तिच्याकडून बाळाला घेत बोलतात. "काय ग अंजे' आज ऊन डोक्यावर आलं तरी तू बाहीर आली नाय. पोरानं' रातभर लय तरास (त्रास) दिला काय तुला?"

"नाही ग, तसे काही नाही. बर, मी काय सांगते ते ऐक. थोड्या वेळाने, सुबोध येतील मला न्यायला. आम्ही आज निघतोय."

"व्हय का? बरं! बरं..
आता काय? तुला आल्यासारखी दोन, चार दिस रहा म्हणायची पणं, जबरदस्ती करता येत नाय.
हा पणं, गेलीस की आमचं ते ध्यान तेवढं पाठवून दी इकडं म्हंजी झालं." म्हणत, आत्त्याबाय पुन्हा नातवासोबत खेळू लागतात.


आई चे बोलणे ऐकून अंजू चिडून बोलते.
"आई' खरच तुला काहीच वाटत नाही की, तू मुद्दामहुन निवांत असल्याचं दाखवत आहेस?"

"आत्ता ग बया!
कश्या बद्दल बुलतिया तू? त्ये तरी कळू दे आधी..."
आत्त्याबाय' अंजूकडे प्रश्नार्थक बघत विचारतात.

"आई'
तुझी सून तिथे पुण्यात, हॉस्पिटल मध्ये अॅडमीट आहे. तिचा नवरा निवांत, आपल्याला काही फरक पडत नाही, या आविर्भावात कामावर गेलाय. आबा आणि शंकर ही तसेच गेलेत. तू आणि विजू वहिनी ही निवांत बसला आहात.
इतके कसे काय तुम्ही पाषाणहृदयी झाला आहात?"

"ये बाय!
तू' ते लय मोठं शब्द बोलणं आधी थांबव. अन् काय ग! तुला लयच पुळका आलायं त्या मनीचा?
तिच्या पायी, आमी (आम्हीं) आमचं कामंधंदे सोडून बसावं, असं वाटतया का तुला? ती बया, रोज कायनु बायनु (काहीही) उद्योग करलं. मग काय? आमी बी तिची थेरं निस्तारत निवांत बसू काय?'
तू असशील मोकळी. पणं, आमचं तसं नाय बाय. तुला जायचं हाय तर, खुशाल जा की. आमी काय तुला आडवत नाय. पर, आमी कुणी (कोणी) येऊ अन् तीची शेवा (सेवा) करु, असा ईचार (विचार) बी मनात आणू नगसं.
तसं बी, तीन आज पातूर आम्हासंनी ताप देण्या पलिकडं दिलचं काय हाय म्हणा!"

"अग आई' तुला काहीच कसं वाटतं नाही हे अस बोलताना! रात्रंदिवस ती तुमच्या दिमतीला इथे हजर असते. तुमच्यासाठी तिने तिचे माहेर ही तोडले. आणि तू म्हणतेस तिने काय दिले म्हणून?
अग, तूच शोधली होतीस ना आनंदासाठी तिला?
तेव्हा तर हट्टाला पेटली होतीस की, आनंदाने' मनीषा बरोबर लग्न नाही केले तर, जिवाचं बर वाईट करशील म्हणून! मग आता का तिच्यासाठी काही करताना हात झटकत आहेस?"

"चूक केली म्या. तीच आता निस्तार्ते. (निस्तारते) तवा वाटलं हुतं पोरगी गुणाची हाय. आपल्या नात्यातली हाय‌. घर, परिवार सांभाळलं. घराला वारस दिलं.
पणं, नाय. नुसती, "खादीला खार अन् धरणीला भार" झाली हाय ती आमच्या."

"आई! अग काय बोलतेस तू' ते तुझे तुला तरी कळतंय का? एक वारस देत नाही म्हणून, तुला ती नकोशी वाटतेय!
शी... इतके घाणेरडे विचार कशी करू शकतेस तू? अग, (अंगणात खेळत असलेल्या गणूकडे बोट दाखवून.) हा गणू पणं, याच घरचा वंश आहे ना.. मग दुसरा वारस कश्याला हवा तुला?"

"त्यो शंकरचा झाला. आता आनंदाचा नको का?"

अंजू स्वतःच्या रागावर कंट्रोल करत बोलते.
"आई मला एक सांग. मनीषाच्या जागी मी असते तर?"

"ये बाय! उगाच काय बी बोलून मला शब्दात पकडू नगसं. तुझ्यात अन् तिच्यात लय फरक हाय."

का बरं? ती या घरची सून आहे. आणि मी मुलगी म्हणून?

"हो. तस समज पायजेल (पाहिजे) तर. अन् एक लक्षात ठीव. बाईच्या जातीला पूर्णत्व तवाचं येतं. जवा ती आय हुती.
आता तू नाही का मोठा शब्द वापरला आई?
म्हणे पूर्णत्व.' अंजू तिरकस हसते. आणि बोलते.
का ग आता हे पूर्णत्व कोणी ठरवलं?"

"अग ठरवायला कश्याला कोण पायजेल? बाईचा जलमचं सगळ सांगून जातो."

"हे गॉड!
तुला तर त्या बद्दल ही नीट माहिती दिसेना...
जाऊदे...
मी पणं कोणाशी वाद घालतेय? म्हणत, अंजू तिथून रागातच उठते. आणि विजू ने अजुन नाश्ता कसा दिला नाही? हे पाहण्यासाठी स्वयंपाक घरात जाते. तर, विजू स्वयंपाक घरात नसते.
ती तिथून तडक विजूच्या खोलीत जाते. तर, विजू आरामात बेडवर पडलेली असते. अंजूचा राग अनावर होतो. पणं, ती, तशीच माघारी वळत, विचार करत, स्वयंपाक घराकडे नाश्ता घेण्यासाठी जाते.

"मनीषाने कधीच आपल्याला, ही गोष्ट दे. म्हणायची वेळ येवू दिली नव्हती.
काही बोलण्याआधीच, ती गोष्ट, मनीषा' आपल्या समोर हजर करत. पणं, एका दिवसात घरातल्या वातावरणात किती फरक जाणवत आहे.
खरच! इथे राब राब राबून ही, मनीषाबद्दल कोणाच्याच मनात सहानभुती नाहीये. आणि आपण ही, तिलाच सतत कमी लेखत आलोय. आता खरच मलाच त्याची लाज वाटत आहे." अंजू स्वतःशीच बोलते.

इकडे पुण्यात'
साडेबारा, एकच्या दरम्यान डॉक्टर' मनीषाला तपासून जातात न जातात तोच, मनीषा शुद्धीत येते.
शुद्धीत येताच, मनीषा आसपासच वातावरण आणि त्यात एक अनोळखी व्यक्ती आपल्याजवळ बसल्याचे पाहून गोंधळते. काही क्षण, ती तशीच पडून राहते. भीती ने तिच्या तोंडून शब्द फुटत नसतो. सुबोधचे बाबा तिच्या शेजारी बसून, एक पुस्तक वाचण्यात मग्न असतात. त्यामुळे, त्यांनाही' मनीषा शुद्धीत आल्याचे लवकर कळत नाही. पणं, थोड्या वेळाने मनीषा जरा हलचाल करते. तसे, बाबांचे लक्ष तिच्याकडे जाते.

"अरे, मनीषा बाळा तुला शुद्ध आली.
अरे वा... वा... वा..."

मनीषा घाबरतच, उठण्याचा प्रयत्न करते. पणं, अशक्तपणामुळे ती उठू शकत नाही.
तसे, बाबा तिच्या जवळ येत, तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात.
"अरे बाळा, घाबरु नकोस. बहुतेक तू मला ओळखले नाहीस. मी सुबोधचा' बाबा.
आपण काही महिन्यांपूर्वीच तर भेटलो होतो की. आम्ही अंजली आणि बाळाला न्यायला आलो होतो तेव्हा. आठवत नाही का तुला बाळा?"

मनीषा थोडं आठवण्याचा प्रयत्न करते. पणं, ताप, अशक्तपणा ने तिचे डोके सुन्न झालेले असते. तरी ही, त्या अवस्थेत ती आपले दोन्ही हात जोडण्याचा प्रयत्न करून, बाबांना नमस्कार करण्याचा प्रयत्न करते. पणं, बाबा तिला थांबवत बोलतात.
बाळा, आत्ता राहू देत ते सगळ. आत्ताच तू शुद्धीत आली आहेस की नाही? पणं, अजुन ही तुला ताप आहे. तू पडून रहा बर, मी डॉक्टरांना बोलवतो लगेच. म्हणत ते दाराकडे जाऊ लागतात.

मनीषा त्यांना जाताना पाहून बोलण्याचा प्रयत्न करते.
"बा...बा..."

तसे, बाबा परत माघारी फिरून तिच्याजवळ येत बोलतात. "हा बोल बाळा.."
मनीषा आपल्या मिटणाऱ्या पापण्यांना आडवत पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते.
"बा...बा.... आ..मचे ह्ये कु.. कुठं हा.. हायत?" (आहेत?)

बाबांना काय उत्तर द्यावे सुचत नाही. ते पटकन बोलून जातात. "ते होय. ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत. तू काळजी करू नको. येतील ते लवकर. तू आता जास्त बोलू नकोस बर.. शांत पडून रहा. मी आलोच डॉक्टरांना घेवून."
म्हणत, बाबा पटकन रूम मधून बाहेर पडतात.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all