मनीषा - लढा अस्तित्वाचा. भाग.१९

अंजू ने,मनीषा बद्दल घेतलेला निर्णय,खुद्द मनीषा स्वीकारू शकेलं का? मनीषा भूतकाळ विसरून नव्या जोमाने स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला तयार होईल का?
"आई' अग सुबोध काय बोलत होते. ते पूर्ण तरी ऐकायचं ना!
हे असे अर्धवट ऐकून, काही ही बोलणं कसे दिसते ते?"

"व्हय बाय.. आता तूच शिकवायची राहिली अम्हासनी.
ती बया, तिथं आपल गुण उधळतिया. त्ये नाय दिसत व्हयंं तुला?
म्हणं, तिला खायला प्यायला देत नाय का आमी?
अग, सकाळ उठल्यापसंन, राती झोपेपर्यंत इथंच, या सयपाक घरात पडीक असती ती. अन् ती खात पित नसलं व्हय?"

"आई' ती इथे असते ते, काम करण्यासाठी. तू किती वेळा तिला लपून छपून खाताना पाहिलेस ग?
आणि काय ग? घरात साधे इकडची वस्तू तिकडे करायची म्हंटले तरी, तुम्हाला सगळ्यांना मनीषा लागते. वर, स्वतःच सांगतेस की, ती दिवस रात्र स्वयंपाक घरात असते. म्हणजे, इथले काम करून वर, घरातले सगळे काम ती करते हे वेगळेच. आणि तरी सुद्धा म्हणतेस, ती फक्त नाटकं करत असते.
हे जरा चुकीचे वाटत नाही का तुला?"

इतक्यात बाथरूम मधून विजया बाहेर येते. आणि स्वयंपाक घरात जात अंजूला बोलते.

"वा रे माझ्या कर्मा..
अंजी ताय तुमाला नक्की काय म्हणायचं हाय?
म्या काय दिस भर माश्या मारत बसते का काय?
मनीच सगळ करत असती तर, मग माझ्या मेलीच कामच सोप्प झालं असत की...'
म्या कश्याला मग, इथं मरत बसली असती. चांगल काय तरी शिकूनच्यांन, म्या बी तुमच्या सारखं, आमच्या ह्यासनी कामात हातभार लावला असता की."

"विजू वहिनी तू तर राहूच दे. तू किती काम करतेस ते, घरातल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आत्ता खर तर, तुला मनीषा नसल्याची कमी जास्त जाणवत असेल? पणं, तू बोलणार नाहीस ग. कारण, बोललीस तर, तूच तोंडघशी पडशील. ही भीती आहे तुला."

"या बया..
आत्त्याबाय बघितलत का? तुमच्या पोरीच, किती पिरेम उतू चाललं हाय ते त्या मनी वर.."

"व्हय ग! जरा जास्तीच चाललं हाय दिसतय की त्ये. पणं, म्या म्हणते एवढी काय जादू केली त्या मनीनं म्हणायची, ह्या अंजी अन् जावयबापूंवर? की, ही दोघं बी आपल्या समद्यांना फासावर लटकवायला उताइळ ( उतावीळ) झालेत."

"आई' तू काय बोलतेस? तुझे तुला तरी कळतं आहे का?
तुम्हाला फासावर लटकावयला उतावीळ व्हायला आम्हाला काय हौस नाही आली.
आणि त्याची सध्या तरी गरज ही नाहीये. पणं तुमच्या मनीषा बद्दलच्या वागणुकीने आम्ही दोघं हैराण मात्र आहोत.
अग तुझीच सून आहे ती. जशी ही विजया वहिनी' तशीच ती. मग दोघीत एवढा फरक का करतेय तू?
तुला जरा ही मनीषा बद्दल प्रेम नाही का ग?"

"होत ना; लय पिरेंम होत मला तिच्याबद्दल, म्हणून तर आनंदला तिच्यासंग लगीन करण्याची गळ घातली हुती म्या.'
वाटलं हुतं लगीन झाल्यानंतर, आनंदा' घराला, घरच्या लोकांना महत्त्व दील. पणं, नाय. तो तर दिस रात बाहिर राहू लागला.
तरी बी, त्या मनीला जपल म्या. म्हटल एक पोर झालं की हुईल सगळ नीट. पणं, ती बया तेवढं बी करू शकली नाय.
एक पोर झालं असतं म्हंजी, सगळ ठीक झालं असत. आनंदा..."
आत्त्याबाय पुढचं बोलण मध्येच थांबवतात. ते वाक्य अंजू पूर्ण करते.

"आनंदा' त्या पोरीला विसरून, तुमच्यात आणि त्या पोरात गुंतला असता. हेच म्हणायचे आहे ना तुला आई."

विजू' अंजूचे बोलणे ऐकून, आच्चर्याने तोंडावर हात ठेवत आत्त्याबायंकडे बघते.
आत्त्याबाय एकदम दचकतात आणि बोलतात.

" तुला कुणी सांगितलं?"

तसे, अंजू हसते. आणि बोलते. "आई अग असल्या गोष्टी किती दिवस लपून राहणार आहेत? तू आनंदला आत्महत्या करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली होतीस. म्हणजे, नक्कीच काही तरी भानगड असणार हे पाळण्यातल्या पोराला ही कळेल. बरं, स्वतः बरोबर माझा ही जीव घेणार होतीस तू. हे तर खरे आहे ना!"

आत्त्याबाय' विजूकडे पाहून अगदी अस्वस्थ होत, अंजूकडे पाहतात. आणि बोलतात.
"ये बाय माझे! तू... तू काय बी बुलून (बोलून) राहीली हाय. उगाच, "पराचा कावळा" नगं करुस..
माझा' आनंदा खरं सोनं हाय.
त्याच्यावर, कसला बी आरोप करू नगस्"

अंजू' अचानक हसू लागते. तिला हसताना पाहून विजू आणि आत्त्याबाय दोघीही गोंधळात पडतात.
आपल हसू आवरत, अंजू बोलते.
"आई' जाऊ दे. तुझ्या खऱ्या सोन्याची चोरी कधीच पकडली गेली आहे. उगाच लपवून ठेवण्यात, आता काहीच अर्थ नाहीये. पणं, एक गोष्ट लक्षात ठेव आई. एका पोरीचा पीच्छा सोडवण्यासाठी, तू दुसऱ्या पोरीचे आयुष्य पणाला लावलेस. त्यात तिची काहीच चूक नसताना, तुला वंशाचा दिवा हवा म्हणून, तिची फरफट केलीस तू. आई' अग, तू एक बाई असून सुद्धा, दुसऱ्या बाईच्या भावना, यातना समजून घेतल्या नाहीस ते नाहीस. पणं, ती आज या घरात नसतानाही, तिच्या बद्दल सहानुभूती तर सोड. पणं, साधी ओढ ही दाखवू शकली नाहीस. याची मला कीव वाटते ग. आणि फक्त तुझीच नाही तर, घरातल्या प्रत्येक सदस्याबद्दल माझी हीच भावना कायम राहणार आहे. तुम्ही सगळे स्वार्थी आहात. फक्त स्वतःचा स्वार्थ साधला तुम्ही लोकांनी.
ज्या मनीषाने' आपले माहेर तुमच्यासाठी तोडले. सासरच्या लोकांना स्वतःचे, सर्वस्व वाहिले. तिलाच, तुम्ही लोकांनी तिच्या आजारपणात पूर्णतः वाळीत टाकले. अग, इतका आपमतलबीपणा तर, प्राण्यात पणं, नसतो.'
प्राणी ही, निस्वार्थ पणें जीव लावतात. पणं तुम्ही? आता बोलण्यात काहीच अर्थ राहिला नाहीये. जाऊदेत चला येते मी. म्हणत, अंजू आत्त्याबायंच्या पाया पडायला वाकते.' आणि बोलते. नमस्कार करते.."

तसे, आत्त्याबाय मागे सरकतात. आणि बोलतात.
"कश्याला "देखल्या देवा दंडवत" करती बया? आमी सार्थी (स्वार्थी) माणसं. तुमी शिकली सवरलेली माणसं. तुमचंच "घोड पुढं दामटणार.."
मग, उगाच ह्ये नाटक बी कश्याला करायचं?

अंजू उभी राहते. तिच्या डोळ्यात पाणी आलेले असते. ती' ते लपविण्याचा प्रयत्न करत बोलते.
"आई खर सांगते. मला माझ्या कुटुंबावर, खूप विश्वास होता. गावातल्या प्रतिष्ठित कुटुंबात मी जन्मले. ह्याचा, मला अभिमान होता. आबा आणि तू मला शिक्षणासाठी कधीच रोखल नाहीत. तेव्हा मला वाटले. तुम्हाला शिकलेल्या मुलींबद्दल आतोनात आदर आणि प्रेम आहे.
पणं, स्वतःच्या दोन्ही मुलांची लग्न, तुम्ही कमी शिकलेल्या मुलींसोबत लावली. तेव्हा ही मला जाणवले नाही की, तुम्हाला मुलींनी शिकलेले आवडत नाही.
पणं, आता ते कळून चुकले आहे.'
असो, जन्मापासून तुम्ही, आणि शिक्षण सुरू झाल्या पासून, माझ्या शिक्षकांनी दिलेले संस्कार, मी आज ही विसरले नाही. तुम्हाला आता, मी ही नाटकं करतेय वाटते. तर, तो तुमच्या विचारांचा प्रभाव आहे. पणं, मी आज ही, तीच अंजू आहे. हे मला माहीत आहे .
जाण्याआधी, तुला एवढेच सांगते आई.
तू' जिला, ध्यान म्हणत आहेस ना? उद्या तिच्याच आठवणीने, तू तळमळशील.
तुझे ते ध्यान परत येण्यासाठी नाही गेले. हे लक्षात ठेव तू.

"आत्ता ग बया! म्हंजी व काय? अंजू ताय."
विजू विचारते.

"म्हणजे, मनीषा आता परत येणार नाहीये. मी तिला इथे येऊ देणार नाही."

"अंजे' तूच एक लक्षात ठिव. तू, किती बी नाय म्हटली तरी, ती या घरची सून हाय. तू, किती बी आडव तिला. पर, तिला इथंच ईवून (येवून) मरायचं हाय. तवा, गपगूमान तिला, गाडीत बसवून इकडं धाड. ( पाठव.) उगच (उगाच) आमच्या वाट्याला जावं नगस्. तुझी तू खुश हायस ना आपल्या घरात? तर, खुशच रहा."

"आई' माझी खुशी, आता फक्त, माझ्यापुरती मर्यादित नाही राहिली.
आणि तसे ही, माझ्या वाट्याला जाण्याची हिम्मत कोण करू शकते? आणि कोण नाही. हे मला चांगलेच माहीत आहे. तेव्हा, आता तुम्ही सगळे एवढच लक्षात ठेवा.'
आज पासून तुम्हाला मनिषाचे तोंड काय? पणं, तिची सावलीही नजरेस पडणार नाही.
किमान, माझी इच्छा असे पर्यंत तरी, नाहीच नाही. येते मी." म्हणत,
अंजू' पटकन स्वयंपाक घरातून बाहेर पडते. सुबोध' तिचे सामान घेवून, नुकताच खोलीच्या बाहेर आलेला असतो.

आत्त्याबाय' रागात धुसपुसत, स्वयंपाक घरातून, अंजूला हाका मारत असतात. "अंजे' तू हे चांगल नाय करत. आमची सून, इकडं पाठवून दे नायतर, तुझ्या आबांना यावं लागलं तिला न्यायला.
अन् त्ये तुमच्यासाठी चांगल नाय हुनार." अंजे...

विजू' आत्त्याबायंना, शांत करत असते.

अंजू' सुबोध पुढे येत. भरलेले डोळे पुसत बोलते. "चला सुबोध. तुम्ही सामान गाडीत ठेवा. मी बाळाला घेवून आलेच.
सुबोधही' तिला काही विचारत न बसता, पटकन सामान उचलून गाडीकडे जातो.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all