मनीषा - लढा अस्तित्वाचा. भाग.२०

अंजू आणि सुबोध, मनीषाला सगळ काही सांगून, एका नवीन जीवनाची सुरवात करण्यास प्रोत्साहित करू शकतील की, मनीषा पुन्हा आपल्या सासरी जाण्याचा हट्ट धरेल? मनिषाची अस्तित्वाची लढाई आता तरी सुरू होईल की, ती आहे ते जीवन स्वीकार करून त्यातच आयुष्य काढेल?
दुपार ढळून, सायंकाळ होत आलेली असते. इकडे पुण्यात, बाबा पुस्तक वाचत खुर्चीत, तसेच झोपी गेलेले असतात. एक सिस्टर येवून, त्यांना उठवते आणि झोपेत असलेल्या, मनीषाचा हात पकडुन, तिची नाडी तपासते. बाबा उठून सिस्टरांना पाच मिनिट तिथेच थांबायला सांगून. पटकन फ्रेश होवून, कॅन्टीनमध्ये जाऊन एक गरमागरम चहा घेतात, आणि सुबोधला कॉल करून तो कधी येणार? याची चौकशी करून, ते पुन्हा रूममध्ये येतात. तेव्हा, मनीषाही जागी झालेली त्यांना दिसते. सिस्टर' तिला' बाबांनी आणलेले, नारळ पाणी पाजत असतात.
बाबा' रूम मध्ये येत, मनीषाला पाहून एक गोड स्मित करतात. आणि खुर्चीत येवून बसतात.
सिस्टर थर्मामीटरने मनीषाचे टेंप्रेचार चेक करतात. आणि फाईलमध्ये नोंद करून ठेवतात. तिला काही मेडीसिन देवून, त्या आपल्या पुढील कामाला निघून जातात.
तसे, बाबा' मनीषाला पाहत विचारतात. "काय मग मुली. कसे वाटत आहे आता?"

मनीषा स्वतःला सावरत, उठून बसण्याचा प्रयत्न करते. पणं, ते तिला जमत नाही. मग, तशीच पडून ती हलकेसे हसत बोलण्याचा प्रयत्न करते.
" म....
म...
म्या....
म्या ठीक हाय. थ...थोडंसं डोकं अन् अ... अंग दुखतंय प.... पणं, सकाळ परीस, ब .... बरी हाय म्या."

बाबा बोलतात. "चांगले आहे. कर. आराम कर अजुन. तो पर्यंत सुबोध आणि अंजू येतीलच."

बाबांचे बोलणे ऐकून मनीषा बोलते.
"बा...
बाबा.."

"हा बोल बाळा."

"म.. म्या.. तुमाला, बा.. बाबा' म... म्हण... म्हणलं तर, चा... चालल का?"

"हो. बिन दिक्कत बोल. नाही तरी, मी तुला माझी मुलगीच समजतो. पणं, आता पहिला आराम कर बर. अग किती त्रास होतोय तुला बोलताना?
अजुन तू पूर्ण बरी नाहीस ग बाळा. तू एकदा पूर्ण बरी हो. म्हणजे मग आपण खूप गप्पा मारू."

मनीषा तरी ही अडखळत बोलते.
"प... पणं, बा... बाबा माझ्या घरची म... मला आदीच घी.... घिउन जातील..'
म.. मंग् आपण कसं बुलनार?" (बोलणार)

मनीषाचा प्रश्न ऐकून, बाबांना थोड हसू येत. आणि दुःख ही होत. दोन क्षण ते मनातच बोलतात.
"किती निरागस आहेस तू पोरी. ज्या घरच्यांबद्दल तू एवढ्या विश्वासाने बोलतेस. त्यातले एक ही तुझ्या काळजीने इथे फिरकले नाहीये ग...
हे जेव्हा तुला कळेल. तेव्हा कसे वाटेल तुला? देवा मलाच विचार करावा वाटेना.. तुम्हीच सांभाळा या पोरीला."
म्हणत, बाबा मनीषाकडे पाहत बोलतात.
"अग तू जाशील तेव्हा जाशील. तुझे घरचे येण्याआधीच आपण भरपूर गप्पा मारू. मग तर झाले."

मनीषा हसण्याचा प्रयत्न करत, हुंकार देते. आणि आपले डोळे अलगद मिटवून घेते.
बाबा शांतपणे पडलेल्या, मनीषाकडे' एक टक बघत राहतात.

संध्याकाळी आठच्या दरम्यान, सुबोध आणि अंजू आधी घरी जाऊन फ्रेश होतात. आणि बाळाला आईंकडे सोपवून, तडक हॉस्पिटल मध्ये येतात.
त्या वेळेस मनीषा नुकतीच जागी झालेली असते. आणि बाबा व एक सिस्टर तिला थोडफार जेवण करण्याचा आग्रह करत असतात.

"अग, मुली थोड तरी जेव. अग, अन्न पोटात नाही गेले तर, तू लवकर बरी कशी होणार?"
बाबा तिला काळजीने बोलत असतात.

तेव्हाच, त्यांच्या पाठीमागून, अंजू पुढे येत बोलते. "हो. बरोबर बोलत आहेत बाबा. मनीषा चल बर लवकर लवकर जेवण करून घे."

अंजू आणि सुबोधला पाहताच, मनीषा थोडी गडबडते. आणि सिस्टरने जबरदस्तीने भरवलेल्या घासाचा तिला ठसका लागतो.
ती अचानक जोरजोरात खोकु लागते. तसे अंजू, सुबोध आणि बाबा सगळेच तिच्या जवळ येतात. अंजू पटकन तिला पाणी प्यायला देते. आणि पाठीवरून हळुवार हात फिरवू लागते. पाच मिनिटात मनीषाला जरा बरे वाटते.

ती' अंजूकडे पाहून तुटक शब्द वापरत बोलू लागते.
"अ... अ... अंजू ताय तू... तूमी कवा आलासा?"

तसे, अंजू बोलते. "अग मला येवून बराच वेळ झाला. तू आधी शांतपणे जेवून घे बर." सिस्टरकडून, वरण भाताचे ताट घेवून अंजू' स्वतः मनीषाला जेवण भरवू लागते.
तिच्या या प्रेमळ वागण्याने, मनीषाचे डोळे पाणावतात.

अंजू हातातले ताट ठेवून, मनीषाचे डोळे पुसते. आणि बोलते. "मनीषा रडू नकोस. हे बघ थोडस खाऊन घे. म्हणजे, तुला लवकर बरे वाटेल."

"प..पणं त.. ता...ताय."

अंजू' तिला डोळ्यांनीच शांत रहा बोलते. आणि मनीषा पुन्हा तोंडातला घास संपविण्यात मग्न होते. अंजू' तिला गोड बोलून बऱ्यापैकी जेवण करवून घेते.
नंतर, सिस्टर' तिला मेडिसिन देवून, आपल्या पुढील कामाला निघून जातात. तेवढ्या वेळात सुबोध आणि बाबा डॉक्टरकडे जातात.

आता, रूम मध्ये अंजू आणि मनीषा दोघीच असतात.
मनीषा' अंजूकडे पाहून, नव्या ठिकाणाच्या भीतीतून सावरलेली असते.
थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही.
अंजू' एक टक मनीषाकडे पाहत असते. आणि मनीषा रूमला पाहत असते.
शांत वातावरणाला, अंजू छेद देत बोलते.
"काय बघतेस मनीषा?"

"उम्!
क.... काय नाय...
त्ये आपल असच.."

"मनीषा' तुला घरची आठवण येत आहे का?"
अंजूच्या प्रश्नाने मनीषा चे डोळे पाणावतात.
ती अंजूकडे' एक टक पाहू लागते.
तसे, अंजू तिच्या डोक्यावर हात ठेवते. आणि बोलते.
"मनीषा. तुला एकटे वाटत आहे ना? कळतंय मला. त्यात, इथे तुझ्या ओळखीतले कोणीही दिसेना. त्यामुळे तू भांबावलेली आहेस.."

"तस ना... नाय, का ..काय!
तू.. तुमी हाय की.."

मनीषाच्या उत्तराने अंजूला गलबलून येते.
ती मनातच बोलते.
" इतक्या वर्षात मी ही हिच्याशी इतकी वाईट वागत आले. तरी ही, ही म्हणतेय मी तिच्या सोबत आहे म्हणून, तिला एकटेपणा वाटत नाही.
इतकं निर्मळ, साधे मन कोणाचे असू शकते?"

मनीषा' अंजूची तंद्री तोडत बोलते.
"अंजू ता.. ताय..
तुमी' कवासा आला घ...घरणंं...
हे.. आण घ... घरची सम... समदी (सगळी) बरी हायत नवं? (आहेत ना?)
आ... आत्त्याबाय' माझी का..काळजी क...करत अस्त्याल... (असतील) नवं?
म... मला.. घरी क.. कवा सोडणार हायत डा... क.. ट .. डाक्टर?" (डॉक्टर)

"घरी जायची एवढी कसली घाई आहे ग तुला? आधी पूर्ण बरी तर हो तू."

"त.. तस नाय. स.. सम... समदी कामं ए.. एक.. ट्या
विजू वय... वयंनी वर प.. डत अ..स..त्याल
त्या..त्यांची लय धावपळ हुतं..आ..सल."

मनीषाचे बोलणे ऐकून, अंजूला दोन क्षण वाटते. "हिला आत्ताच सांगावं का?
ज्यांची तू, एवढ्या आपुलकी ने विचारपुस करत आहेस? त्यातल्या कोणाला ही, तुझी काहीही पडली नाही." पणं, तिने हे आत्ताच बोलायला नको. असा विचार करून, तोंडातले शब्द तोंडातच दाबून टाकले.
आणि विषय बदलण्यासाठी अंजू बोलली.
"ते बाकी सगळे राहू दे. आता तब्बेतीच्या निमित्ताने का होईना, तू पुण्यात आली आहेस. तर, आता काही दिवस तू इकडेच माझ्या सोबत राहायचे.
तुला' मस्त पुणे फिरवून दाखवते मी. बाळाला पणं, तेवढेच, त्याच्या मामी सोबत वेळ घालवायला मिळेल की नाही?"

मनीषा हसते. आणि डोळ्यांनीच होकार देते.
इतक्यात, सुबोध आणि बाबा डॉक्टरांना भेटून येतात. आणि अंजूच्या मनावर आलेले दडपण नकळत कमी होते.
सुबोध पुढे येत मनीषाकडे पाहून बोलतो.
"मग काय पेशंट? आता बर वाटत आहे ना?"
मनीषा हसून फक्त होकारार्थी मान हलवते.
औषधांचा प्रभाव तिच्यावर पुन्हा होवू लागलेला असतो. तिच्या डोळ्यांवर झोपेचा अमल चढायला लागलेला असतो.

बाबा आणि सुबोध बाहेर पॅसेजमध्ये येवून, तिथेच खुर्चीत बसून थोडावेळ मरतात. मनीषाला गाढ झोप लागताच. अंजू ही तिथून उठते. आणि बाहेर येवून, सुबोधला बोलते. "सुबोध' मला, मनीषाला सगळ सांगायला, खूप कठीण जात आहे. तुम्हीच बोलाना तिच्याशी प्लीज."

"अग पणं, इतकी घाई करायला नकोच.
तसे ही, डॉक्टर म्हंटले आहेत तिच्या प्लेटलेट्स ही थोड्या कामी आहेत. त्या मुळे तिला, आत्ता लगेच तर डिस्चार्ज ही मिळणार नाहीये. तो पर्यंत, आपल्या वागण्या बोलण्याने, ती ही आपल्यात रुळेल.
मग, हळू हळू सांगू की आपण.
हो ना बाबा! तुमचे काय मत आहे?"

"हो अंजू बाळा, सुबोध अगदी बरोबर बोलतोय.
आत्ता तिला आधी पूर्ण बरी होऊदे. आपण सोबत आहोत हे पाहून ती हळूहळू का होईना स्वतःला सावरेल.
योग्य वेळ आली की आपण मग बोलूच तिच्याशी."

"पणं बाबा, तुम्हाला वाटत आहे का? ती भूतकाळ विसरून एक नवीन सुरवात करण्यास तयार होईल?"
'कारण, तिच्याकडे पाहून म्हणजे तिचा स्वभाव, भाषाशैली, पेहराव सगळ पाहून, मला तरी अशक्य गोष्ट वाटत आहे."

"अंजू हे तू बोलतेय. अग आपली भाषा, पेहराव, आणि स्वभाव अगदी, जन्म कुठे घ्यायचा? या गोष्टी आपण निवडलेल्या नसतात. आणि कोणी कस वागायचं? हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असते. उगाच म्हणतात का? "साधी राहणी उच्च विचार!" राहणीमान आणि विचार यांचा काही संबंध नसतो. हे लक्षात ठेव तू. नाहीतर सावित्री बाई फुले पासून, सिंधुताई सपकाळ पर्यंत, एका ही स्त्री ने आपली वेगळी ओळख निर्माण केली नसती.
तुझेच घे ना. छोट्याश्या गावातून तू शिकण्याच्या जिद्दीने शहरात आलीस. अगदी पहिल्यांदा आली असशील तेव्हा, इथल्या शुद्ध भाषेचे, वातावरणाचे दडपण तू ही घेतले असणारच ना..?
पणं, हळू हळू तू ही बदलली. सगळ्या गोष्टींशी जुळवून घेतलेस ना?"

"हो सुबोध' मला तसे म्हणायचे नव्हते.
मी तर."

"अंजू बाळा' आणि सुबोध हे बघा, तुम्ही दोघे ही वाद घालत बसू नका. आधी, मनीषा पूर्ण बरी होवू द्या. त्या नंतर तिला सर्व कळेल तेव्हा, ती काय निर्णय घेते! या वर सगळे अवलंबून आहे.'
तिने कुठे राहायचे? काय करायचे? कसे बोलायचे? किंवा, कसे जगायचे? हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल. आपण फक्त तिचे मार्गदर्शक बनून, तिला योग्य दिशा दाखवू शकतो. हे लक्षात ठेवा तुम्ही.

"हो बाबा. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काय अंजू' पटतेय का तुला?"

अंजू फक्त हुंकार देते. "हुं..."

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे


🎭 Series Post

View all