मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२२

काय मग कसा वाटत आहे मनीषाचा नवीन प्रवास? तो खरच एखाद्या फिल्म सारखा असेल की,वास्तव वेगळेच असेल? मयंक च्या येण्याने मनीषा चे जीवन पुन्हा बदलेल की मनीषा आपल्या चालू जीवनातच आनंदी राहील? सगळ्या प्रश्नांची उत्तरे हळू हळू उलगडत जातील. वाचत रहा. मनीषा - लढा अस्तित्वाचा.
मनीषाचा शिरा खाऊन होतो तो पर्यंत, बाहेर धुंवाधार पावसाचे आगमन झालेले असते.
मनीषा पटकन बेडरूम मध्ये जाऊन, स्वतःला आरश्यात न्याहाळते. स्वतःत झालेला अमुलाग्र बदल पाहून, तिला स्वतःला ही विश्वास बसत नसतो. ती पुन्हा पुन्हा आपल्या चेहऱ्यावरून आणि कायेवरून आपली नजर फिरवत असते. फिकट गुलाबी ड्रेस त्यावर, कानात मॅचींग गुलाबी मोत्याचे कानातलते, छोटीशी गुलाबी टिकली, गळ्यात छोटासा मोत्यांचा नेकलेस, एका मनगटात घड्याळ आणि दुसऱ्या मनगटात गुलाबी बांगड्या. या सगळ्यांनी तिचे सौंदर्य आणखी उजळलेले असते.

तिच्या मनात सहजच विचार येतो..
"काय होतीस तू मनीषा? आणि आता बघ. अग, किती बदलली आहेस तू? तुझी भाषा, तुझे व्यक्तिमत्त्व, तुझे राहणीमान सगळेच किती बदलले.
एकेकाळी अंजू ताईला (जीभ चावत) सॉरी सॉरी सारखी विसरते तू. आता ती तुझी वहिनी आहे. पणं, काही का असेना. तेव्हा वहिनीला तू अश्या पद्धतीने राहिलेले. इतकचं काय गावात राहून पणं, शुद्ध बोलत असलेले पाहून, हरकून जायचीस.. अस वाटायच आपण ही आई' बाबांचं ऐकले असते आणि व्यवस्थित शिक्षण घेतले असते तर, आपण ही..
( दीर्घश्वास घेवून)
पणं, आज त्यांच्या मुळेच, तू ही तुझ्या मनासारखे जगू शकत आहेस. ते किती ही नाही म्हणतील. पणं, तुला विसरून चालणार नाही की, त्यांनीच या नव्या मनीषाला जन्म दिला आहे."
मनीषा आरश्यात बघून, स्वतःशीच संवाद साधत असताना, अचानक, तिची आई बेडरूमच्या दारात येत बोलते.
"अग मने' काय करतीस इतका येळ? झालं का नाय तुझ आवरून बाय?"

"हो आई. हे काय झालेच.."
म्हणत,
ती' पटकन आपले केस व्यवस्थित विंचारते. आणि वरच्यावर केसांना पिनप करून, त्यात मोगर्याचा गजरा माळते. कपड्यांवर कस्तुरीचे परफ्यूम मारून, तोंडावर पावडरचा पफ फिरवते. तिच्या गोऱ्या कांतीला मेकअपची गरजच नसल्याने, एकदम साध्या, सुंदर पद्धतीने तयार होवून, ती अजूनही दारातच उभ्या असलेल्या आईकडे बघते..

आई तिच्या जवळ येत तिला' तिथेच आरश्यासमोर ठेवलेले काजळ घेवून कानाच्या मागे, केसात लावते. आणि तिच्या तोंडावरून मायेने हात फिरवून बोलते. "कुणाची नजर नको लागायला माझ्या बायला."

तोच, दोघींना सुबोधच्या बाबांचा आवाज येतो.
"मनीषा ये मनू" घरात आहेस की, वरच्या घरी गेली?"

बाबांचा आवाज ऐकून, संदेश आपली खेळणी सोडून "आजोबा आले. आजोबा आले." करत, पळतच दाराकडे जातो. आणि दाराची एकदम वरची कडी पाहून, हिरमुसून आत, बेडरुमच्या दारात उभ्या असलेल्या, मनीषा आणि आज्जीकडे पाहू लागतो. त्याचे पडलेले तोंड पाहून, मनीषा आणि आई' दोघीही हसू लागतात.
मनीषा पटकन पुढे जाऊन दार उघडते. तसा, संदेश पळतच बाहेर जातो. आणि पिशव्यांचे ओझे घेतलेल्या आजोबांना बीलगतो.

सुबोधचे बाबा आणि आई' दोघेही' मनीषाच्या दारात थांबलेले असतात. त्यांच्या हातात सामानाच्या भल्या
मोठ्या पिशव्या पाहून, मनीषाही बाहेर येते. आणि बाबांच्या हातातल्या पिशव्या पकडत बोलते. आई' बाबा अहो, मला हाक मारायची ना खालूनच? कश्याला उगाच इतका त्रास करून घेतलात? चला आधी, घरात चला बर."

"अग राहू दे. आता तूच चल वरच्या घरी पटकन. अंजू आणि सुबोध वाट बघत असतील आपली." आई बोलतात.

"हो आई . जाऊया ना. पणं, आधी थोडे चहा, पाणी घ्या. मग जाऊ. तिथे कामाच्या रगाड्यात तुम्ही काहीच करणार नाही आणि घेणारही नाही. हे चांगलच माहीत आहे मला. चला, या पटकन आत." म्हणत, मनीषा एक एक पिशवी नेवून आत ठेवते.

सुबोधचे आई' बाबा एकमेकांना पाहून हसतात. आणि संदेशला' दोघे दोन्ही बाजूने पकडुन आत घेवून जातात.
आत जाताच, मनीषाची आई' त्यांना पाणी आणून देते. आणि बोलते. "आवं भाऊ' एवढा कश्याला त्रास करायचा जीवाला. आम्हांसनी सांगायचं ना.. मनी आणि मी आणलं असत की सामान."

"नाही हो ताई' थोडेच तर सामान होत. म्हणून म्हंटले, पटकन जाऊन घेवून येवू. पणं ,नेमका आजच पावसाला जोर आलाय बघा." सुबोधचे बाबा बोलतात.

"व्हय तर काय? आज लयच जोराचा पाऊस पडतोया.
दुपारच्या टायमिंगला, रात झाल्यागत वाटू लागलया बघा."

"हो ना, अहो तुम्हाला सांगते. तिथे दुकानात होतो तेव्हा, नुसता वारा सुटला होता. आणि इथे येई पर्यंत, पूर्ण झोडपून काढले आम्हाला पावसाने."
सुबोधची आई बोलते. इकडे या तिघांचे बोलणे सुरू असते.
तेवढ्या वेळात, मनीषा' सुबोधच्या, आईने बाहेर ठेवलेल्या पिशव्या आत आणून ठेवते. आणि पटकन चहा करून आणते.
मनीषाची आई, आणि सुबोधचे' आई' बाबा गप्पा मारत चहा संपवतात. आणि उठतात.

"चला ताई येतो आम्ही. आणि तुम्ही पणं तुमचं सगळ आवरून लवकर या वर. चल ग मनीषा." म्हणत, सुबोधची आई आणि बाबा पुढे निघतात.
मनीषा ही दोन पिशव्या सांभाळत निघणारच, तर आई तिचा हात धरून विचारते.
"मने..
काय ग आई?
अग म्या येवू वय?"
"हो मग! ये की. आत्ताच तर आईंनी सांगितले ना तुला?"
"अग, तस नाय. पणं, म्या आलेली चाललं नवं? नाय म्हंजी मी ही अशी.."

"आई हे लोक, तसल्या विचाराचे नाहीत ग. तू ही नको तो विचार करत बसू नकोस. ये आवरून पटकन."
"अग पणं."

पुढे गेलेले सुबोधचे बाबा दारातच, मनीषाच्या आईचे बोलणे ऐकतात. आणि बोलतात. "ताई काही प्रॉब्लेम आहे का?"

"नाय व दादा' काय परा.. बलेम नाय. तुमी व्हा फूड. म्या बी येते थोड्या येळात." म्हणत, मनीषाची आई पटकन चहाचे कप उचलून किचन मध्ये घेवून जाते. मनीषा,संदेश' सुबोधचे बाबा आणि आईही वरच्या घरी निघून जातात.

वरच्या घराच्या दारात येताच, त्यांना सुबोध दाराला डेकोरेट करताना दिसतो. संदेश पळतच घरात जातो.
आई' बाबा आणि मनीषाला जड पिशव्या घेवून आलेले बघून, सुबोध हातातले काम मित्राकडे सोपवून, पळतच मनीषा जवळ येतो आणि बोलतो. "अग आवाज द्यायचा ना मला." ह्या एवढ्या जड पिशव्या एकटीने कश्याला आणायच्या?"

"अहो दादा इतक्या काही जड नाहीत त्या. असू द्या."
बाबा त्याच्या डोक्यात मारत बोलतात. "काय रे, जड वाटत आहेत ना तुला? मग, आधीच खाली येवून थांबता आले नाही का तुला?
"अहो बाबा' मी घरात काम करत होतो. तुम्ही एक कॉल तरी करायचा मला!"
" बर असू देत. आता तिच्या घरी जा. आणि दोन पिशव्या अजुन बाकी आहेत. त्या पणं घेवून ये. जा लवकर."
सुबोध हसतो. आणि दरवाज्यात काम करत असलेल्या मित्राला हाक मारून, दुसऱ्या मित्राला बाहेर बोलवायला सांगतो.
आणि मनीषाकडे पाहून बोलतो.

"काय ग मनू! तू काय पाहुणी आहेस का?"
"अस का बोलताय दादा? काही चुकलं का माझे?"
अग चुकलच की, तुझ्या वहिनीचे ओटीभरण आहे आज. आणि तुझाच अजुन पत्ता नाही. हे बरोबर दिसते का? तिथे ती बिचारी अवघडल्या अवस्थेत नुसती मनीषा' मनीषा करत बसली आहे. (आई' बाबांकडे बघून डोळा मारत.) आणि ही बघा अजुन ही इथेच. म्हणत, सुबोध गालातल्या गालात हसतो. तसे, मनीषा घाईतच घरात जायला निघते.

नेमका त्याच वेळी, सुबोधचा खास मित्र मयंक बाहेर येत असतो. त्याला मनीषा सरळ जाऊन धडकते. मनीषा स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी हातातल्या पिशव्या सोडते आणि पटकन मयंकचा हात पकडते. आणि मयंक ही स्वतःला सांभाळण्यासाठी पटकन मनिषाच्या कमरेत हात घालतो. पणं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. दारातल्या पायपुसणी वरून पाय घासरून दोघांचा तोल जातो. आणि दोघे ही खाली पडतात. दाराला डेकोरेट करणारा सुबोधचा दुसरा मित्र विवेकचाही स्टूल ह्यांच्या धडकेमुळे पडतो. आणि त्याच्या हातातले फुलांचे तोरण ह्या दोघांच्या गळ्यात पडते. आणि विवेक बाजूला पडतो. दोन क्षण काय झाले हे कोणालाच कळत नाही. मयंक आणि मनीषा एकमेकांना बिलगून पडलेल्या अवस्थेत एकमेकांना एकटक बघत असतात. आणि विवेक कळवळत त्या दोघांना.

सुबोध आणि आई' बाबा पळतच आधी विवेककडे जातात. आणि त्याला उभे करतात.आणि या दोघांकडे जाऊ लागतात. तोच विवेक त्या तिघांना थांबवत बोलतो. "अरे थांबा जरा." सुबोध प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहतो. तेव्हा तो बोटानेच मनीषा अन् मयंककडे बघायला सांगत बोलतो. कितना फिल्मी नजारा है! नई?
आई, बाबा आणि सुबोध एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसतात. तोच आतून अंजूचा आवाज येतो.

"अरे माझ्या कर्मा."
मनीषा. अग पडलीस की काय?

मनीषा पटकन सावध होते. आणि मयंक पासून दूर होत, आपल्या गळ्यातला हार काढून त्याच्याकडे फेकत, पटकन कपडे झाडत उठते.
मयंक मात्र तो हार आपल्या हातात घेत. आहे त्या जागेवर बसूनच मनीषाला एकटक पाहत असतो. मनीषा पटकन अंजू जवळ येत बोलते.
"वहिनी अग ते चुकून."
तसे, बाहेर सुबोध, विवेक, आई, बाबा सगळेच हसू लागतात.
अंजू त्यांच्याकडे आणि मनीषाकडे प्रश्नार्थक पाहू लागते. आणि मनीषा या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत, चिडून आतल्या रूममध्ये जाते.

मयंक मात्र, काही झालेच नाही. अश्या आविर्भावात आहे तिथेच बसून गालातल्या गालात हसत, मनीषा गेलेल्या वाटेकडे बघत, त्या फुलांच्या हार मधील फुलांच्या पाकळ्या काढून सगळीकडे टाकू लागतो.
अंजू' त्याची कृती पाहून पुढे येत त्याच्या खांद्याला हलवत बोलते. "मयंक भाऊजी तुम्ही ठीक तर आहात ना?"
पणं, मयंकचे एक नाही की, दोन नाही. अंजू हसणाऱ्या सुबोध आणि विवेककडे रागात बघते. तसे ते दोघे पुढे येत हसत, मयंकला गदागदा हलवतात. आणि विवेक त्याच्या कानात बोलतो. "अरे भाई होश मे आ. फिल्म कब की खतम हो गई! वो तो कब की गई भी. उठ अब."

सुबोधला' विवेक काय बोलतो हे कळत नाही. पणं, मयंक मात्र पटकन शुद्धीत येतो. आणि आपल्या जवळ सुबोध' विवेकला आणि समोर अंजू' आई' बाबांना पाहून भांबावतो. व पटकन उठून आपले कपडे झाडत बोलतो.

"ते.. (डोक्यात हात मारून) ते मी.. (विवेककडे पाहत) अरे विवेक मला बोलावलं होतास ना? कश्यासाठी बोलावल सांग पटकन. नाहीतर मला आतली सजावट पूर्ण करू दे." म्हणत, अस्वस्थपणे उभा राहतो.

त्याची भांबावलेली अवस्था पाहून, अंजूला पणं हसू आवरत नाही. आणि पुन्हा सगळेच जोरजोरात हसू लागतात. मयंक ही त्यांच्या हसण्यात सामील होत बोलतो. "काय राव तुम्ही. इथ काय फिल्मचे शूटिंग सुरू आहे का? ते इथेच ठाण मांडून थांबला आहात. चला लवकर आत. खूप कामं पडली आहेत अजुन. चला चला.. म्हणत तो स्वतःच गडबडीने आत पळून जाऊ लागतो...

त्याला असे पळताना पाहून विवेक मोठयाने त्याला ऐकू जाईल असे बोलतो.
"ये भाई अरे सून तो, तेरे चेहरे का नुर देखकर् पता चलता है की, थोडी देर पहले जो सिन क्रिएट हुआ ना वो तो शुरवात है! पिक पिक्चर अभी बाकी है मेरे भाई!!!"
म्हणत, विवेक' सुबोध आणि बाकीच्यांकडे पाहून हसतो. सुबोध त्याच्या पोटात पंच मारत बोलतो विवेक भाई तुसी बडे मजाकिया हो.
सर्वजण काही क्षणापूर्वी घडलेला सगळा प्रसंग मजेत घेऊन, मनसोक्त हसतात. आणि हसतच घरात प्रवेश करतात.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all