मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२३

खुशाल चेंडू असलेल्या मयंकच्या मनात, मनीषाने एंट्री केली होती.ती कोण आहे?सुबोधशी तिचे नाते कसे जुळले?हे जाणून घेण्यासाठी चांगलाच उत्सुक झाला होता. पणं मनीषा बद्दल खरच त्याला सगळे काही कळेल तेव्हा, मयंक तिचा विचार करेल की तिला ही स्वप्नं पाहिल्यासारखे विसरून जाईल?
विवेक आणि मयंक' सुबोधचे जिवलग मित्र. कॉलेज पासून, त्या तिघांचे ट्यूनिंग जुळलेले. ते सुबोधचे लग्न झाल्यानंतर ही कायम राहिले.

विवेक मिश्रा. हा मूळचा दिल्लीचा. त्या मुळे त्याची मातृभाषा हिंदी. त्यात शाळेपासून पंजाबी मित्रांच्या सानिध्यात असल्याने बोलण्यात पंजाबी टोन थोडफार आलेला होताच. शिक्षणाच्या निमित्ताने तो पुण्यात आला. पुण्यात आल्यापासून सुबोध आणि मयंकच्या सानिध्यात राहून थोडीफार मराठी भाषा त्यालाही येवू लागली. कॉलेज झाल्यानंतर, विवेक पुण्यातच स्थिर झाला. इथेच एका कंपनीत चांगल्या पोझिशनवर असल्याने आणि त्याची बायको लतिका ही पुणेकर असल्याने, तो पुण्यातल्या वातावरणात मिक्स होवून गेला. स्वभावाने दिलदार, दिलखुश असलेला विवेक' सुबोध आणि मयंकचा जिवलग यार कधी झाला? हे त्यांना ही कळले नाही. इतका तो गोड स्वभावाचा असतो. त्यांच्या घट्ट मैत्रीच्या बंधामुळे त्यांच्या कुटुंबाचेही एकमेकांशी घनिष्ट संबंध निर्माण झालेले असतात. कोणताही घरगुती कार्यक्रम असो की, सुट्ट्यांचा वेळ असो. ते सगळे सोबतच एन्जॉय करत असायचे. पणं, सुबोधच्या कंपनीचे काम वाढले तसे, त्यांचे भेटणे ही जरा कमी होत गेले. ते आज अंजूच्या ओटीभरण कार्यक्रमामुळे पुन्हा भेटीगाठीचा योग जुळून आला होता. विवेक आज एकटाच येवू शकला होता. लतिकाला तिच्या माहेरी जावे लागले होते. कारण, तिच्या वडलांची तब्बेत जरा खराब होती.

मयंक तावडे. जन्मताच पुणेकर. एका जागी कधी ही, मन न रमवलेला अवलिया म्हणजे मयंक. त्याला सतत काही तरी वेगळे करावे वाटत असते.
आज इथे तर, उद्या तो कुठे असेल? याचा नियम नसायचा. कायम उत्साही आणि ट्रॅव्हलिंगची आवड असलेला मयंक' एका ट्रॅव्हल एजंसीचा मालक असतो. पणं कंपनीत कमी. आणि फिरतीवर जास्त असा उत्साहमूर्ती मयंक अजुन ही एका जागी स्थिर मात्र झालेला नसतो.
सतत मोबाईल नंबर बदलत असलेल्या, मयंकला सुबोधने' विवेकच्या सांगण्यावरून स्पेशली ई मेल करून बोलावून घेतलेले असते. त्याचे आई' वडील या जगात नसतात. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मयंकने स्वतःच्या मेहनतीने, स्वतःचे शिक्षण आणि कंपनी निर्माण केलेली असते. कामाबद्दल कधीच सिरियस नसलेला मयंक' स्वतःचे जीवन मनसोक्त जगण्याबाबत मात्र अतिशय सिरियस असतो.

असे हे खासम खास दोस्त मिळालेल्या सुबोधला मात्र आपली कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी पार पाडताना, या मित्रांसाठी वेळात वेळ काढणे खूप कठीण जात असते. पणं, आज दिवस ही होता. आणि हे तीन मित्र बऱ्याच काळानंतर सोबत ही आले होते. ते ही दोन चार दिवसांची एक्सट्रा सुट्टी घेवूनच. त्यामुळे या चार दिवसातला येणारा प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी खास होता.

ओटी भरणाची सगळी तयारी झालेली असते. अंजूचे घर प्रशस्त असल्याने, त्यांनी वेगळा हॉल बुक केलेला नसतो. घरात सुबोधचे इतरही, मित्र मंडळी, आणि पाहुणे मंडळी आलेले असतात. मनीषा' अंजूला तयार करण्यात मग्न झाल्यामुळे, थोड्या वेळापूर्वी घडलेली घटना विसरून गेलेली असते.

मयंक मात्र, आपले चित्त हरवून बसलेला असतो.
त्याला सुबोधशी' मनीषाबद्दल बोलायचे असते. पणं घरातल्या गोंधळात ते शक्य नाहीये. हे जाणून तो अस्वस्थ मनाने छोटी छोटी कामे हातावेगळी करत असतो.
सुबोध ही घडलेली घटना विसरून आपल्या बायकोच्या कार्यक्रमात कसली कमी भासू नये म्हणून, धडपत असतो.

अंजूचा फायनल मेकअप टचअप करून, मनीषा तिला एकदा आरश्यात पाहायला सांगते.
प्रेगनन्सीमुळे आधीच तिच्या चेहऱ्यावर भरपूर तेज आलेले असते.
त्यात, मनीषाने तिचा, साधा पणं उठावदार मेकअप केल्याने, त्याला चार चाँद लागलेले असतात.
अंजू स्वतःला पाहून, मनीषाकडे पाहत तिला डोळ्यांनीच थँक्यू म्हणते.
आणि स्वतःला आरश्यात पाहून बोलते. "मनु खरच तू तर, मेकअप करण्यात एक्स्पर्ट झाली आहेस ग. किती सुंदर मेकअप करतेस तू."
"अग वहिनी' ही तुझीच देन आहे ग. नाहीतर मला मेकअप मधला "म" तरी माहीत होता का?
तू आणि दादाने तेव्हा माझ्यासाठी, माझ्या भविष्यासाठी इतका खटाटोप केला नसता तर...
आज मी..."
मनीषाचे डोळे नकळत पाणवतात.

"ये वेडी यात आम्ही काहीच केले नाही. तुझ्या हातात कला होती. म्हणूनच, तू आज इथपर्यंत पोहचली आहेस. आम्ही फक्त तुला मार्गदर्शन केले. बाकी लढाई तर तुझीच होती."

"हो ग पणं, ते लाख मोलाचे मार्गदर्शनच मला आज इथपर्यंत घेवून आले आहे. हे मी विसरू शकत नाही.
केवळ तुम्हा दोघांमुळे ही मनीषा आज मेकअप आर्टिस्ट म्हणून उदयाला आली आहे."

"बर बाई! तुला आम्हालाच क्रेडिट द्यायचं आहे तर दे. क्रेडिट कोणाला नाही आवडत? ते घेण्यात मग मी कसे मागे राहू? म्हणत, अंजू आणि मनीषा दोघी ही हसू लागतात."

तोच, सुबोध बेडरूम मध्ये येत विचारतो. "आमच्या मॅमची सगळी तयारी झाली का ओ मनू ताई?" त्याचा आवाज ऐकताच, मनीषा आणि अंजू दोघी ही एकदम वळून त्याच्याकडे पाहतात. सुबोधचे लक्ष अंजूकडे जाते. आणि तो तिला पाहतच राहतो.

मनीषा गालातल्या गालात हसत त्याच्याजवळ येते. आणि हाताच्या कोपराने त्याला धक्का देत, अंजूकडे ढकलते. आणि स्वतः पटकन बाहेर जाते. व दार ओढून घेते.

सुबोध आणि अंजू तिच्या या क्रियेने हसतात. सुबोध अंजू जवळ येत बोलतो. "मॅम आज तर, तुम्ही आमचा जीवच घेणार दिसत आहे."
"अहो काही ही काय बोलताय."
तिचा हात घट्ट धरून तो बोलतो. "अग चेष्टेने बोलतोय. समजून घे राणी. पणं, खरच आज तू खूपच सुंदर दिसत आहेस."
"म्हणजे, मी इतर वेळी सुंदर दिसत नाही असच ना." अंजू' सुबोधकडे रागात बघत बोलते.
"ये बाई! मी अस कुठे म्हंटले? पणं, तुझे आजचे सौंदर्य काही औरच आहे." म्हणत सुबोध तिला मिठीत घेतो.
अंजूही त्याच्या मिठीत सुखावते. सुबोध तिला घट्ट मिठी मारत विचारतो.

"अंजू."
" हम्म!"
"तू खुश आहेस ना?"
सुबोधची मिठी सोडवत,अंजू त्याच्याकडे भाऊक होवून पाहत बोलते.
"सुबोध' मी खुश तर आहेच हो. पणं, आज आई आणि आबा आले असते तर, मला आणखीन आनंद झाला असता."

सुबोध तिला पुन्हा आपल्या मिठीत घेत बोलतो.
"कळतंय मला ग. म्हणून तर त्यांना तिथे जाऊन निमंत्रण देण्याचे धाडस करून आलो मी. पणं आबा आणि शंकर ज्या पद्धतीने माझ्याशी वागले त्यावरून तरी, मला नाही वाटत ते येतील अस."

अंजूच्या डोळ्यात टचकन पाणी येते.
ती स्वतःला सावरत बोलते. "मला कळेना आबांचा राग कधी शांत होणार? त्यांना का कळतं नाहीये की, ते जे करू इच्छित होते ते चुकीचे होते.
त्यांची इच्छा मनीषाने स्वतःच्या संसारात रमून घ्यावे. हे चुकीचे नाही का? जिथे तिचा नवराच आपले कर्तव्य विसरला आहे. तिथे तिने.."

"सोड ना तो विषय अंजू. हे बघ, आता तो विषय काढून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आजचा दिवस हा तुझा आहे. तू उत्सव मूर्ती आहेस या दिवसाची. सो आज अजिबात रडायचं नाही. आणि त्या आठवणी काढून दुःखी ही व्हायचं नाही. कळले."
अंजू आपले डोळे पुसत पुन्हा सुबोधच्या मिठीत येत नुसता हुंकार देते. "हुं"

बाहेर मनीषा दाराला हलकेच कडी लावून, थोडा वेळ दारातच थांबते. पणं, सुबोध किंवा अंजू कोणीच आवाज देत नाहीत. हे लक्षात आल्यावर, ती किचनकडे जाऊ लागते. तोच, समोरून मयंक
अर्धवट पाणी भरलेला मोठा ड्रम घेवून येताना, तिला दिसतो. त्याला पाहताच ती दुसरीकडे वळते. मयंकला ती, ड्रम घेवून बाहेर येतानाच दिसली होती. त्यामुळे तिची ती क्रिया पाहून तिच्या समोर येत मयंक बोलतो. "ओ मॅम! असे भूत बघितल्या सारखे काय तोंड फिरवताय?"

मनीषा त्याला इग्नोर करत, हॉलकडे जाऊ लागते. मयंक ड्रम बाजूला ठेवून, तिच्या समोर येत बोलतो.
"ओ हॅलो, मी तुमच्याशी बोलतोय. इतका कसला ऍटीट्यूड आहे तुम्हाला?"

"हे बघा मिस्टर, मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये."
मघाशी जे झाले; ते अगदी अनपेक्षित चुकून झाले. ना तुम्हाला मी दिसले होते. ना मला तुम्ही. राहिला प्रश्न ऍटीट्यूडचा तर, मी आहे ही अशीच आहे. तुम्हाला जे समजायचे ते समजू शकता." म्हणत,
मनीषा पुन्हा एकदा रागात तिथून निघून जाते..

तिला जाताना पाहून, मयंक मनातच बोलतो. "कमाल आहे या मुलीची. हिला काय कोणी व्यवस्थित बोलायला शिकवल नाहीये का? आली मोठी, मी आहे ही अशीच आहे' म्हणणारी." म्हणत, मयंक पुन्हा ड्रम उचलणार तोच, अंजू आणि सुबोध बेडरूमचे दार वाजवतात.

मयंक पटकन दाराजवळ येवून, दार उघडतो.
आणि अंजू' सुबोधला पाहून बोलतो. "अरे देवा. तुम्हाला काळ वेळेचे भान आहे की नाही? कधी ही कुठे ही सुरू होता ते."
"भावजी' काही तरीच काय बोलता." अंजू त्याचे बोलणे ऐकून लाजते.
"वा वहिनी! बाकी तुम्ही लाजता खूप मस्त.. हो ना सूब्या."
मयंक' सुबोधला हाताचा कोपरा मारतो.
सुबोध हसत नुसता हुंकारतो. "हुं."
अंजू' सुबोधकडे पाहून बोलते. "सुबोध तुम्ही पणं ना.. जाऊद्या बाई! मी जातेच अशी." म्हणत,ती तिथून पटकन किचनकडे जाते.

मयंक' सुबोधच्या पाठीवर रपटा मारून बोलतो. "बाकी काय पणं, म्हण. वहिनी आज खूपच सुंदर दिसत आहे रे. नक्की काय जादू केलीस रे तू वहिनीवर?"
सुबोधही, त्याच्या पाठीत मारत बोलतो. "साल्या तुझा नंबर आला की, मग सांगतो बर का मी."
"अरे मी काय केले? मी तर वहिनी छान दिसतेय बोललो ना! बर, चल लवकर. मला ड्रम बाहेर नेवू लाग." म्हणत, मयंक सुबोधला ड्रमकडे घेवून् येतो. आणि दोघे मिळून तो, अर्धवट भरलेला पाण्याचा ड्रम उचललून बाहेर जाऊ लागतात.

"काय रे सुब्या' तुझ्या घरात हे गुलाबी फुल कुठून उमलले?"
मयंक' हॉलमध्ये संदेशसोबत खेळत असलेल्या मनीषाकडे पाहून बोलतो.
सुबोध त्या दिशेला पाहून बोलतो. ये मया माझी बहिण आहे ती. उगाच काही मस्ती नाही ह करायची.
"अरे काय सांगतोस काय? काका' काकूंनी इतके दिवस लपवून ठेवले होते की काय हिला? बापरे. कमाल आहे. इथे, सूनबाईंचे ओटीभरण आहे. आणि काका' काकूंनी सरप्राइज गिफ्ट म्हणून, चक्क चक्क एवढी मोठी मुलगीच सगळ्यांसमोर आणली की." म्हणत, मयंक हसू लागतो.

"हाऽ हाऽ हाऽ
वेरी फनी! मया ती माझी मानलेली बहिण आहे. मग ठीक आहे.
नाहीतर, मला वाटलं की काका' काकू.."
"ये गप रे!
वेळ काय आहे? आणि तुझी काय मस्ती सुरू आहे? अजुन ही तुझा बालिशपणा गेलेला नाही म्हणायचे."

"मग काय?
अरे माणूस म्हातारा झाला तरी, त्याने आपला बालिशपणा सोडू नये. या विचाराचा मी आहे.'
सुब्या मेरी जान. सतत ते मोठ्या माणसांसारखे चोवीस तास विचारात हरवून, जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा सोडून, नुसते बेचव आयुष्य जगण्यात, कसला आला आहे आनंद?"

" बरोबर आहे तुझे म्हणणे. पणं प्रत्येक जण तुझ्या सारखा लकी नसतो ना मया. प्रत्येक माणसाचे जीवन वेगळे, त्यातील संकटे, दुःख, प्रश्न वेगळे. जे, ते आपल्या हिशोबाने आपले प्रश्न सोडवत असतात. म्हणून इतरांना, इतकं ही बेफिकीर होवून नाही जगता येत रे, जितका तू राहतोस."
बरोबर बोलतोय तू सुब्या. मी माझा दृष्टिकोन मांडला. तू तुझा. आता बाकीचे प्रश्न आपण निवांत बसल्यावर सोडवू." म्हणत, मयंक आणि सुबोध हसत, ड्रम बाहेर आणून दाराच्या बाजूला, मोकळ्या जागेत ठेवतात.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.


🎭 Series Post

View all