मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२६

मनीषा ला जेव्हा सत्य कळेल,तेव्हा ती स्वतःला सांभाळून घेवून नव्या आव्हानांना तोंड देण्यास तयार होईल काय?
"सटवी मिली. (मेली) माझ्याशी मोठ्या आवाजात बुलती. (बोलते) समजती कोण सवताला? (स्वतःला) चार दिस काय इथ या शेरात (शहरात) राहिली की, चांगलीच जीभ फुटली की हिला."
आत्त्याबाय रूममध्ये आल्या नंतरही धुमसत असतात.
"आई' अग कश्याला तिच्याशी वाद घालत बसली होतीस?"
" ये बाबा' आता हित कुणी बी नाय. तू तरी नीट आपल्या गावकी भासत (भाषेत) बुल." (बोल)
"व्हय बुलतो. पणं, तू शांत बस आता."

"आर, कशी शांत बसू? ती मनी बघितलीस का? मला शिकीवती. (शिकवते) म्या कस वागायचं चार माणसात त्ये...
हिला आधी चार लोकात तरी वावरता येत हुतं का?
माझ्या परीनं सगळ शिकीवलं म्या हिला. अन् ही आता मला शिकीवती व्हय?"

"आय' पणं, तुला कुणी सांगितलं हुतं, तिच्याशी बोलत बस म्हणून? तुझी तू यायचं ना डायरेक्ट इथ. आपण आपल्या गावात नाय. अंजूच्या घरात हाय. हे तरी लक्षात ठेवायचं तू."

"आता तू बी मलाच शिकीवणार का?
आर, ज्या पुरीला (पोरीला) माग सर म्हणायची अक्कल नव्हती. ती आता कायच्या बाय भासत (भाषेत) मला बुलती. अन् तू म्हणतूयास मी गप बसायचं. आला मोठा मला शिकीवणारा."
आनंदला कळून चुकले, आईला समजवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून, तो काही तरी कारण सांगून, अंजूच्या रूम मधून बाहेर येतो. आणि हॉल मध्ये येऊन मनीषाला शोधू लागतो."

इकडे, मनीषा घरी येवून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते.
बराच वेळ रडून झाल्यानंतर, ती उठून गॅलरीत येते.
पावसाचा जोर अजुन ही कायम असतो.
पावसाचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडतात. त्या थंड थेंबांच्या स्पर्शाने, तिचे अंग शहारते. ती मनातच विचार करते.
"पावसाळा नसताना, हा पाऊस असा कोसळतोय. त्याचे ही हृदय माझ्यासारखेच तुटले असेल काय? कधी कधी अश्रू ही पावसासारखेच नकळत वाहू लागतात ना? त्यांनाही, या पावसाप्रमाने मोकळे व्हावे वाटत असेल ना?
सगळ कस शांत निवांत चालू असताना अचानक, ढगांची गर्दी होते काय! सोसाट्याच्या वाऱ्याला अचानक स्फुरण चढते काय! आणि बघता बघता विजेच्या कडकडाटासह हा पाऊस जोरदार बरसू लागतो काय!'

जीवनात तरी काय वेगळे आहे? आपल्या शांत जीवनातही, अश्याच ढगांची गर्दी होते. मनातले वादळ अचानक आपले बंध तोडतात. आणि आपण खंबीर असल्याचा आव आणत असतो. पणं, अचानक आपला संयम गळून जातो. आणि अश्रू रुपात पाऊस बरसतो. वेगळे असे काहीच नाही. हा पाऊस कधी आल्हाददायक वाटतो. तेव्हा, त्याच्या सोबत आपण चहाचा गरमागरम कप घेवून, आपला आनंद व्यक्त करतो. काही आल्हाद दायक आठवणींना उजाळा देतो. आणि हा असा मेघ गर्जनेसह धुंवाधार कोसळतो. तेव्हा, आपण आपल्याही नकळत, आपले दुःख त्याच्या सोबत वाटत असतो.'

आत्ता, काही क्षणापुर्वी, हा पाऊस मला हवा हवासा वाटत होता. तेव्हा मी दादा' वहिनीच्या कार्यक्रमाच्या तयारीत, आनंदउत्सव साजरा करत होते. आणि आत्ता, हाच पाऊस, मला माझ्या भूतकाळातील काही नको असलेल्या क्षणांना आठवण्यास भाग पाडतोय. मला नकोसा वाटतोय.'
कारण, मी आत्ताच तर, रडून मोकळे झाले होते ना?
थोड्या वेळापूर्वी हवाहवासा वाटणाऱ्या या पावसाच्या अतोनात बरसण्याने, मला आता मात्र, प्रचंड दुःख होत आहे.'

'याला कारण, माझ्या भूतकाळातील माणसे आहेत. खरे दोषी तर ते आहेत. यात ह्या पावसाचा काही दोष नाहीये. त्याने माझ्यावर, हळुवार उडवलेल्या या तुषारांचा काही दोष नाहीये. तो तर, मी' पुन्हा उत्साही, आनंदी व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. पणं, मी..."
म्हणत, मनीषा पुन्हा रडू लागते. आणि पुन्हा आकाशाकडे पाहत, गॅलरीत पडणाऱ्या त्या मुक्त तूषारांचा स्वीकार करत, मनात स्वतःशीच बोलत, आपल्या भूतकाळात डोकावते.

"काय चूक होती माझी? जीव ओतून मी वाघमारे कुटुंबाला जपत होते. ते सांगतील, तसेच वागत होते. ते म्हणतील तेच करत होते. कधी कोणाचा शब्द खाली पडू दिला नव्हता मी.
पणं, तरी ही, मीच कमी पडले.
पाच वर्षाचा माझा संसार. खरच तो संसार होता का?
ज्याला सात जन्माचा जोडीदार माणून पाच वर्ष वडाला पुजले. त्याच्या मनात तर, मला कधीच जागा नव्हती.
तरी ही, एक भाभडी आशा होती. माझा नवरा आणि संपूर्ण कुटुंब मला आपल करेल. पणं त्या दिवशी ती आशा ही मावळली.'
पणं, मावळली ती बरीच झाली नाहीतर आज मी मलाच गवसले नसते. आज जो माझ्या राहणीमानात, बोलण्यात इतकेच काय' मनातल्या विचारातही मी जे हे स्पष्ट' शुद्ध बोलतेय ते फक्त आणि फक्त, मी त्या भूतकाळात अडकून न राहता पुढे निघून आले म्हणून तर.

'पणं, मी हे विसरले होते. माझा भूतकाळ इतका सहज माझी पाठ सोडणार नाहीये. मला त्या आठवणी राहून राहून त्रास देणारच. आज त्यांना समोर पाहिले आणि..."

चार वर्षा पूर्वी.
मनीषा आता बऱ्यापैकी स्वस्थ झाली होती.
डॉक्टरांनी तिला घरी नेण्याची परवानगी दिली होती.
आठ दिवसात मनीषाने अनेक वेळा अंजू आणि सुबोधला घारच्यांबद्दल विचारले होते. पणं, त्यांच्याकडून एकदाही मनासारखे उत्तर मात्र तिला मिळाले नव्हते.

मनीषा' सुबोध' अंजू आणि आई' बाबांना भेटल्या पासून, जास्तच बुझली होती. कारण, तिच्या आणि यांच्या भाषेत, राहणीमानात असलेला फरक मनीषाच्या मनावर परिणाम करत होता.
शेवटी डिस्चार्ज मिळालेल्या दिवशीच. मनीषाने धाडस करून अंजूशी बोलायचे ठरवले.

मनीषाला हॉस्पिटल मधून अंजू' सुबोधच्या घरी आणण्यात आले. सुबोधच्या आई' बाबांनी तिचे सुहास्य वदनाने स्वागत केले.
सगळ्यांचे इतके प्रेम आणि आपुलकी पाहून मनीषा भारावून गेली होती.
आपण काय आणि कसे बोलावे? तिला कळत नव्हते.

घरी आल्यानंतर अंजूने' मनीषाला तिच्या रूम मध्ये नेले आणि तिथेच थोडावेळ आराम करायला सांगितले. तीच संधी पाहून मनीषा बोलली.
"अंजू ताय.
आवं, जरा बसा की हित. मला थोड बुलायच हाय तुमच्या संगट."
"मनीषा' आपण थोड्या वेळाने बोलूया का?
नाही म्हणजे, मी जरा आईंना कामात मदत करून येते. मग आपण निवांत गप्पा मारू."

"अग बया! आय' एकट्या काम करत्यात व्हय? नाय म्हंजी तुमच्यात, ती कामवाली बाय असल नवं?"
अग कामवाली बाई काय स्वयंपाक करायला नाही ठेवली. ती फक्त धूनभांडी करायला आहे."
"असं व्हय. बर बर. म्या काय मदत करू का मग?
"ये बाई! आत्ता कुठे तू आजारातून उठली आहेस. निवांत आराम कर तू. मी बघते कामाचे."
"आवं, म्या भाजी तरी निवडून देते की!"
"नको.
तू आरामच करायचा. आलेच मी." म्हणत, अंजू निघून जाते.

मनीषा' अंजूची रूम बघत शांत पडून राहते. मनातच तिचा विचार सुरू असतो. किती चांगल्या हायत अंजू ताय अन् सुबोध भावजी. त्यांच आय' बा पणं कसल भारी हायत. म्या उगचच अंजू तायंना लय गरविष्ट (गर्विष्ठ) समजत हुते.
भावजींचे, आय' बां बघितलं की, मला माझ्या आय' बा ची लय आठवण येतीया. त्ये कसं असतील? काय करत असतील? कितीच्या काय वरीस (वर्ष) झालीत. म्या भेटले नाय त्यांना. त्ये बी एकदा पणं भेटायला आली नायत मला. आत्त्याबायंच्या धाकान माझं माहेरच तुटल. त्यांना कधीच वाटलं नाय की, आपल्याला जशी आपली लेक घरी यावी वाटती. आपल्याला बी कधीमधी तिला भेटायला जावं वाटत. तसं, मनीला बी वाटत असलं. विजू वहिनी शेजारच्याच गावातली हाय. म्हणून, तिला कधी थांबवलं नाय आत्त्याबायंनी. पणं, माझ्याच बाबतीत सगळं नियम असत्यात त्यांचे.

इतक्यात, सुबोध दार ठोठावतो.
"मी जरा आत येवू का मनीषा?"
मनीषा आपल्या विचारातून बाहेर येत बोलते.
"व्हय. या की भावजी."

सुबोध' मनीषाकडे येत, तिच्याकडे एक प्लॅस्टिकचा बॉक्स देतो. आणि तिला त्यात तिचे औषध असल्याचे सांगून, कसे घ्यायचे? हेही समजावतो.

"बर मी येतो." म्हणत, सुबोध बाहेर जायला निघतोच की मनीषा बोलते.
"भावजी."
"हा??"
"वायच बोलायचं हुतं."
"बोल ना." सुबोध दारात उभा राहत बोलतो.
"आवं त्ये..
त्ये..."

"मनीषा. निसंकोच बोल.
काही त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलावू का?"
"नाय नाय.. तसल काय त्ये, तरास बिरास नाय हुत मला."
"मग?"
"आवं, त्ये तुमी मला.. म्हंजी मला.."
सुबोध' आत येत, बेड जवळच असलेली खुर्ची ओढून घेत, त्यावर बसतो. आणि बोलतो.
"मनीषा. हे बघ, पाहिले तर तू मला भाऊजी म्हणायचं सोडून दे."
"या बया! आवं आपल नातच हाय त्ये. भावजी म्हंजी भावा समान असते त्ये."

"हो ना! मग, आज पासून तू मला आपला मोठा भाऊ समजून, दादा म्हण.
मला ते जास्त आवडेल."
"आणि मला ही." जेवणासाठी बोलवायला आलेली अंजू ही, रूम मध्ये येत बोलते.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all