मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२७

आपल्या सासरच्या लोकांचे सत्य,आणि नवऱ्याच्या वागणुकीचे कारण कळल्यावर मनीषा काय करेल? आता तरी ती स्वतः साठी उभी राहील की, पुन्हा एकदा सासरी जाऊन त्यांच्या सोबत राहण्याचा अट्टाहास कायम ठेवेल?
"अंजू ताय. आवं या की, बसा."
"अग येतच होते. तुम्हाला दोघांना बोलवायला आलेय मी. चला स्वयंपाक तयार आहे. जेवण करून घेवूया."
"मनीषा' तू जेवणा आधीच्या टॅबलेट खाल्ल्यास ना?"
"त्ये आणि काय असत?"
मनीषा गोंधळून विचारते. तसे सुबोध आणि अंजू एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसतात. आणि अंजू बोलते. "अग औषध, गोळ्या खाल्लेस ना जेवणा आधीचे?"
"व्हय. त्ये म्हंजी, त्ये टाबलेट व्हय? हा खाल्ले की. ह्ये काय भावजींनी आत्ताच खायला दिल्या हुत्या.."
अग टाबलेट नाही ग, टॅबलेट म्हणायचं. म्हणजे गोळ्या.'
आणि मनीषा' हे आत्ताच तुला म्हंटलेत ना! तू आज पासून यांना दादा म्हणायचं ते! मग म्हण ना."

"व्हय ताय पणं, मग तुमाला ताय कस म्हणणार म्या?"
"मग वहिनी म्हण. नाहीतर अंजू म्हंटलेस तरी चालेल. मला ही तुझ्यासारखी नणंद आवडेल."

"आवं पणं, तूमी माझ्या नणंदबाय हाय."
"मग काय झाले? नात्यातल्या नात्यात लग्न होतात तेव्हा, असेच नाते असते ना?" कोण कोणाची नणंद, भावजय आहे? हे पाहण्यापेक्षा आपण एक दृढ,समृध्द नात निर्माण करतोय. हे महत्वाचे नाही का मनीषा?
तुला कल्पना नाहीये पणं, एकेकाळी तू वहिनी म्हणून मला अजिबात पसंद नव्हतीस."
"आ' काय म्हणालासा?"

"सोड ग. एवढी चकित होवू नकोस. वेळ आली की, सगळ सांगेन तुला. तू का पसंद नव्हतीस ते. बर का!"
"हम्म."

"पणं, आज तूच नणंद म्हणून मला हवी आहेस.
कारण, तुझ्यातला साधेपणा समजायला मला तेव्हा जरी उशीर झाला होता ना, तो आता नाही करायचा. आता मात्र मी' आपल्या ह्या नवीन नात्याला कोणाची नजर लागू देणार नाही बघ."

"व्हय ताय. पणं. आत्त्याबाय?"
"तिचे काय मध्येच?"
"नाय म्हंजी, त्यांना आवडलं का आपल बदलेल नातं?"
"हे बघ मनीषा.
तुला स्पष्टच सांगते."
इतक्यात, सुबोधची आई जेवायला बोलवायला येते. आणि विषय तिथेच थांबतो.

अंजूचे बाळ झोपलेले असते. तेवढ्या वेळात सगळ्यांचे जेवण होते. मनीषा तिथे ही जरा दबकत वावरते.
जेवण झाल्यानंतर, सगळेच हॉल मध्ये येवून बसतात. आणि गप्पा सुरू होतात.

"मनीषा बाळा, कसे वाटले तुला आमचे घर?" बाबा विचारतात.
"अहो' आमचे काय? आता ते तिचे पणं घर आहे." आई बोलतात.
"अग हो' मीच बोलताना चुकलो. सॉरी बर का राणी सरकार."
"अहो' मुलांपुढे फा... पणां नको." म्हणत, आई उठून किचनमध्ये जातात. सगळे हसतात.
"बर मग मनू' आता मी' तुला मनूच म्हणणार. बर का!" बाबा बोलतात.
मनीषा फक्त मान हलवते.
"अग' तू ही काही बोल की. अशी शांत का बसली आहेस?"
"म्या. म्या काय बुलू? तुमचं चालू द्या. काका."
ये मनू, काका नाही. मला बाबा म्हणायचे तू."
"आवं पणं,"
"बरोबर बोलत आहेत बाबा. मनीषा तू बाबांना' बाबाच म्हणायचं." अंजू ही दुजोरा देते.
"आवं ताय.

"अं काय म्हणालीस?"
"आवं ईसरलीच ( विसरली) म्या. वहिनी म्हणायचं हाय त्ये.
पणं, ता... आपली जीभ चावत वहिनी."
"हम्म बोल."

मनीषा जरा अस्वस्थ होत, हातांची चुळबुळ करते. सुबोध' अंजूला खुणावतो.
"मनीषा काय झाले तुला? काही बोलायचे होते ना? बोल ना मग आता!" अंजू बोलते.
"नाय त्ये..."
"हे बघ, ही सगळी तुझीच माणसे आहेत. त्यांना घाबरु नकोस. बिनधास्त बोल."
"नाय व, घाबरत नाय मी. पणं,"
"मनू बाळा, मी जाऊ का माझ्या रूम मध्ये? तुला कंफरटेबल वाटत नसेल तर, मी जातो."
"नाय वो बा. बाबा.
तसं काय नाय."

"मग बोल की."
"त्ये आपल, ईचारायच हुतं की, मला घरी कधी सोडणार? आता म्या बरी झाली हाय. तर, माझ्या घरी गेलेली बर ना! तुम्हासनी बी तरास नाय हुयाचा माझ्या मेलीचा."

"अग त्रास काय त्यात? आपल्या मुलीचा कोणा बापाला त्रास होतो का?"
"नाय. तस नाय. पणं, आता लय दिस झालेत. म्या इकडं हाय. घरची सगळी वाट बघत असत्याल माझी. त्यांना बी आठवण येत असल नवं?"

मनीषा' अंजूकडे पाहून बोलते. अंजू' सुबोधकडे पाहते. सुबोध पुन्हा डोळ्यांनीच तिच्याशी काहीतरी बोलतो. तसे, अंजू एक दीर्घ श्वास घेवून बोलू लागते.

"मनीषा. बर झाले तू विषय काढलाच आहेस तर, आता तुझ्याशी बोलायला हरकत नाही."
"क.. काय ताय? (तोंडावर हात ठेवून) सारी (सॉरी) बर का! ते वहिनी म्हणायचं, अंगवळणी पडायला जरासा येळ लागलं."

"असुदे. मी समजू शकते. पणं, हळू हळू का होईना आता वहिनी म्हणायची सवय करून घे. कारण आता आपले नाते बदलले आहे. मी तुझी नणंद राहिली नाहीये."
"आवं काय बोलताय ता.. वहिनी?"
"हम्म, बरोबर बोलतेय ती मनू."
"सॉरी. मी ही आजपासून तुला मनूच म्हणेन. हे सोपे आणि छान वाटते बोलायला." म्हणत, सुबोध हसतो.
"बोला व.. भा.. भाव. पणं, अंजू ताय' असं का बोलत्यात? ते बी जरा कळू द्या मला मेलीला!

"श्री राम.." म्हणत, बाबा आळस देत उठतात. आणि ह्या तिघांकडे बघून बोलतात.
"तुम्ही तिघे बोला. मी जातो आता माझ्या रूम मध्ये. अंजू' तुमचे बोलणे होईपर्यंत, बाळाला आमच्याच रूममध्ये राहू देत. चालेल ना..?"
"हो चालेल बाबा. मला ही तो उठला तरी टेन्शन नाही राहणार. फक्त आईंना तेव्हढे किचनमध्ये ठेवलेली दुधाची बोटल सोबत ठेवायला सांगा. म्हणजे, बाळ उठले तरी तुम्हाला ही टेन्शन नाही राहणार."
"बर बर. चला गुड नाइट. म्हणत, बाबा निघून जातात.
मनीषाला ही झोप आलेली असते. पणं, अंजू नेमके काय बोलणार? याची उत्सुकता ही लागलेली असते. म्हणून ती डोळ्यांवर ताण आणून, सुबोध आणि अंजूकडे पहात असते.
"अंजू' तुम्ही दोघी बोलायला सुरवात करा. तो पर्यंत, मी आपल्या तिघांसाठी मस्त पैकी कॉफी करून आणतो."
"बर चालेल."

"या बया! भाव काफी पणं बनवत्यात व्हय?"
"हो कॉफीच काय? तो आणि बाबा जेवण ही उत्तम बनवतात."
"बाय माझे. म्हणजे इथल्या पुरुषांना, तुम्हा बायकांची गरजच नाय म्हणायची." म्हणत, मनीषा खुदकन हसते.
तिला हसताना पाहून, अंजूच्या डोळ्यात मात्र एक वेदना चमकते. आणि मनात विचार येतात.

"मनीषा' किती साधी आहेस तू. छोट्या छोट्या गोष्टींचे नवल वाटणारी. थोडी घाबरट. थोडी मस्तीखोर. तितकीच समजूतदार ही असावीस म्हणजे झाले. कारण, आता मी तुला जे सत्य सांगणार आहे. त्याने तुझ्या आयुष्याला नवी कलाटणी मिळणार आहे. देवा! प्लीज मनीषाला सावरण्यासाठी बळ दे. या पोरीला तिचे स्वतःचे आयुष्य आनंदाने जगण्यास सामर्थ्य दे." म्हणत, अंजू पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेते. आणि मनीषाशी बोलू लागते.

"मनीषा..."

"अग ये मनीषा.. अग काही तरी बोल. इतकावेळ मी एकटीच बोलत आहे. सुबोध' बघ ना ही कशी पुतळा होवून बसली आहे. मनीषा..."

मनीषा मात्र शून्यात हरवलेली असते.
"अंजू' तिला जरा सावरायला वेळ दे. तू इतक्या सहज जरी सगळ मांडले असले तरी, ते तिच्यासाठी पचवण खूप कठीण आहे.
ज्या कुटुंबाला, ज्या नवऱ्याला ती गेली पाच वर्ष स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त जपत होती. त्यांनीच तिला, चहात पडलेल्या माशी प्रमाणे उचलून बाजूला फेकली आहे. हे आपल्या तरी पचणी पडत होते का तेव्हा?"
"अरे' पणं?"
"शू...ऽऽऽ
थोडा वेळ, कोणच बोलत नाही. सगळे शांत बसून राहतात.
वेळ पुढे पुढे जात असतो. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. आणि अंजू' सुबोधला सांगून, पटकन आई' बाबांच्या रूममध्ये जाते.
इकडे, मनीषा अजुन ही स्तब्ध असते.
तिच्या डोक्यात मुंग्या येत असतात. आणि मनात चालू असलेले वादळ शांत होत नसते.

"आत्ता जे अंजू ताय बोलल्या. ते समदं खर असल का? ह्यांच्या मनात कुणी दुसरीच हाय म्हणं. पणं मग, माझ्याशी लगीन का केलं ह्यांनी?
आणि इतक्या वर्साचा संसार? संसार नव्हता तो. पणं, आमी सोबत तर हूतोच की. हा... यांनी मला कधीच ज...'
नाय, जवळ करायला त्यांना येळ (वेळ) तरी भेटतू का? सारखं काम, काम अन् कामच असत त्यांचं. मग कधी???
नाय पणं, किमान माझ्या संग दोन शबुद बी बोलत नायत हे. त्ये कश्या पायी? तेवढा तर येळ असतूच की माणसाला..."
अन् आत्त्याबाय त्यांना समदं माहिती असून बी, माझ्या आविष्याची (आयुष्याची) वाट का लावली असलं त्यांनी? म्या तर त्यांची नातलग हुती ना? माझा बा त्यांचा दूरचा भाव हुता की. कोण बहीण आपल्या भावासंग अस वागती? का एकाच आयच्या पोटातून भाहीर (बाहेर) आली नायत म्हणून, त्यांनी अस केलं?

मनीषाच्या हातातला कॉफीचा रिकामा मग, अचानक तिच्या हातून निसटतो. आणि ती दचकून भानावर येते.
स्वतः समोर सुबोधला पाहून, ती क्षणभर गोंधळात पडते. आणि खाली पडलेला कॉफी मग उचलण्यासाठी पटकन उठण्याचा प्रयत्न करते. पणं, तिला एक क्षण चक्कर आल्यासारखे होते. आणि ती पुन्हा खुर्चीत बसते.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

ता.क.
"सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास, ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी"


🎭 Series Post

View all