मनीषा - लढा अस्तित्वाचा. भाग.२८

अंजू सुबोध च्या निर्णयाचा मनीषा स्वीकार करेल की? सोनगाव ला गेल्यावर काहीही करून तिथेच राहण्याचा हट्ट करेल? आता तरी, मनीषाला नवी दिशा सापडेल का?
"अग राहू दे मनू, तू शांत बस. मी घेतो तो मग." म्हणत, सुबोध तो मग उचलून टेबलवर ठेवतो. आणि मनीषाकडे पाहत विचारतो.
"तू ठीक आहेस ना मनू?"

मनीषाला अचानक रडू येते. पणं, समोर सुबोध एकटाच आहे. हा विचार येताच, ती डोळ्यातले पाणी अलगद पुसत बोलते.
"व्हय भाव. म्या... म्या."
पणं, मनीषाला कंट्रोल होत नाही. आणि ती रडू लागते.
सुबोध' उठून तिच्या शेजारच्या खुर्चीत येवून बसतो. आणि तिला बोलतो.
"मनू' सावर स्वतःला. हे बघ, अंजूने तुला जे सांगितले. ते सत्य आहे. मला कळत आहे. तुला त्या गोष्टीचा त्रास होतोय. पण, आता त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये."

"आवं भाव' तुम्ही अस कस म्हणताय? गेली पाच वरीस म्या' त्या घरात राहते. त्यातल्या प्रत्येक माणसाबरोबर माझ एक नात हाय. आणि आता, ताय म्हणत्यात, त्या घरातल्या माणसांना माझ्या आसण्या नसण्याचा फरकच पडणा? वर, ह्यांच्या अविष्यात (आयुष्यात) पाहिलीच कुणी तरी हुती. मग... म्या!
म्या कोण हाय ह्यांची?
आत्त्याबायंना समद माहीत हुतं. तरी बी त्यांनी आमचं लगीन लाऊन दीलं. कश्या पायी? या सगळ्यात माझा काय दोष हाय?"
म्हणत, मनीषा धाय मोकलून रडू लागते.

सुबोध बावरतो. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून, अंजू आणि बाबा पळतच बाहेर येतात. आई आणि बाळ मात्र रूम मध्येच असतात.
अंजू बाहेर येताच, मनीषा जवळ येत तिला मिठीत घेते. आणि तिला थोपटत बोलते. "शांत हो मनू.
( तिला आपल्या मिठीतुन बाजूला करत) शांत हो...
असे मी तुला म्हणणार नाहीये."
मनीषा' सुबोध आणि बाबा एकाचवेळी अंजूकडे आच्चर्याने पाहू लागतात.

"काय झाले? असे का बघत आहात सगळे माझ्याकडे?
मनू सॉरी. मी ही, तुला आज पासून मनूच म्हणणार आहे. कारण तू आता सौ. मनीषा वाघमारे. नसून आमची मनू आहेस. फक्त मनू."

"त...'
"अह, ताई नाही. वहिनी किंवा अंजू म्हणायचे तू. असे आपले ठरले आहे ना..."
"आवं पणं..."
"काय पणं..?
मनू' जे घडून गेले आहे. त्या बद्दल रडत बसण्यात आता काहीच अर्थ राहिला नाहीये.
अग तू त्या माणसांना किती जीव लावला होतास हे मला ही माहीत आहे. पणं, त्यांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेवून स्वतःचा स्वार्थ साधला. या पलीकडे तुला स्वतःला कोणाकडून कधी प्रेमाची, काळजीची एक थाप तरी मिळाली का ग?
मग त्या लोकांनी तुझ्याच बरोबर असे का केले? हा विचार करत बसण्यापेक्षा, आता त्या लोकांना तू काय होतीस? आणि आहेस? ह्याची किंमत तरी कळू दे."

"ये बात..
अगदी माझ्या मनातले बोललीस अंजू."
सुबोध उत्साहाच्या भरात बोलतो.
मनीषा मात्र अजुन ही प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांना पाहत असते.

"काय झाले? तुला मी काय बोलले हे कळले नाही ना?
ना कळू देत. वेळ आल्यावर सगळे काही कळेल तुला."
"ता..."
"आं..."
"व...वहिनी..
या येळेनच माझ्या अविष्याची वाट लावली हाय. मग अजुन बी त्याचीच वाट बघू व्हय म्या?
आवं ज्या घराला आपल म्हणून तिथं दिस नाय, रात नाय नुसतं राब राब राबून जगले म्या. तिथल्या लोकांनी माझा अन् त्यांचा संबंधच नाय म्हणत, सोडून दिलय मला वाऱ्यावर. अन् म्या... म्या..."
मनीषा पुन्हा रडू लागते.
आणि आवंढा गिळत बोलते.
"त्ये काय नाय. मला घरी जायचं हाय. मला त्यासणी इचारायच हाय. काय चुकी हाय माझी?"

"अग पणं..."
"अंजू थांब. मी बोलतो."
म्हणत, सुबोध बोलू लागतो.
"मनू ठीक आहे. आम्ही उद्याच तुला घरी घेवून जातो.
पणं जर, त्यांनी तुझा अपमान केला. आणि तुला घरात घेण्यास मनाई केली. तर, गेल्या पावली तू माघारी वळून, आमच्या सोबत परत यायचं. आणि पुन्हा कधीच त्या लोकांना आणि तिथल्या पाच वर्षाच्या आठवणींना आपल्या मनात ही येवू द्यायचं नाही मंजूर ?"
"मंजूर हाय भाव.
त्या घरात तसं बी मला कधीच मान नव्हता. एका नोकरात अन् माझ्यात कायच फरक नव्हता. पणं त्ये माझच घर हाय. या भर्मात (भ्रमात) म्या जगत हुते.
ज्या नवऱ्यावर इशवास ठीवून म्या त्या घरात परवेश (प्रवेश) केला! त्यानं बी मला..."
मनीषा पुन्हा रडू लागते. अंजू आणि सुबोध तिला रडू देतात.

बाबा उठून आळस देत बोलतात. "चला तर मग आता तुमचे ठरलेले आहे तर, जाऊन झोपा आता. रात्र ही फार झाली आहे. अंजू बेटा बाळाला तुझ्या रूम मध्ये घेवून जा. आणि सुबोध तू आज इथेच झोप. मनू आणि अंजू तुमच्या बेडरूम मध्ये झोपतील."

" हो बाबा."
"बर चला. मी झोपतो आता. आणि मनू आता अजुन रडत बसू नकोस बाळा. जा. आता आराम कर."

मनीषा फक्त हुंकार भरते. आणि सगळे झोपण्याची तयारी करू लागतात.
सकाळी लवकरच मनीषाला जाग येते. ती उठून आपले आवरून घेते. आणि चहा, नाश्ता बनवण्यासाठी आईंची मदत करायला किचनमध्ये जाते. हळू हळू बाकी सगळे ही उठतात. आणि आपापले आवरून सगळे मिळून एकत्र नाश्ता करतात. घरातल्या वातावरणात जरासा ताण जाणवत असतो. पणं त्याकडे दुर्लक्ष करून सगळे रोजचे नित्यक्रम करत असतात. थोड्याच वेळात, सुबोध गाडीत पेट्रोल भरून येतो. आणि मनीषा, अंजू बाळा सोबत, आणि सुबोध सोनगावला रवाना होतात.

दुपारी सगळे सोनगावला पोहचतात.
नेहमी प्रमाणे आत्त्याबाय अंगणातच वामकुक्षी घेत असतात. आणि विजू' तिच्या खोलीत आराम करत असते. गाडीचा आवाज ऐकून आत्त्याबायं उठून बसतात.
सुबोध आणि अंजू गाडीतून बाहेर येतात. त्यांना पाहून आत्त्याबाय बसल्या जागूनच बोलतात.
"आता कश्यापायी आलाय म्हणायचं? इथ आता तुमचं कुणी बी नाय. आल्या पावली माघारी फिरा."

अंजू' आईचे बोलणे इग्नोर करत पुढे येत बोलते. "आम्हाला ही हौस नव्हती येण्याची. पणं, यावं लागलं."

इतक्यात मनीषा गाडीचा पाठीमागचा दरवाजा खोलून, बाळाला सोबत घेवून बाहेर येते.
आत्त्याबाय तिला बघतात तसे, त्यांची डोक्याची शिर तडतडते.
त्या स्वतःला सावरत उठत बोलतात.
"या बया! मनी का काय ही?
ही अन् कश्यापायी आली आता?
अन्, तू ग अंजे! लय मोठ्या तोऱ्यात म्हंटली हुतीस की हिला येवू देणार नाय ते. मग कश्याला आणली आता?"

"माझी इच्छा नव्हतीच तिला आणण्याची. पणं तिला..."

इतक्यात सुबोध अंजूला आडवत बोलतो.
"सासूबाई अहो इथेच बोलणार आहात का? आम्हाला किमान अंगणात तरी बसू देणार आहात की नाही? नाही म्हणजे, आमच्या बाळाला उन्हाचा त्रास होईल म्हणून विचारतोय."

"आवं मग जा की आल्या पावली माघारी. तुम्हासनी आमी थोडच बोलवलं हुतं."

"आई' अग आमचे राहू दे. किमान त्या निष्पाप जीवाला तरी दया दाखव. तो तुझा ही कोणी तरी आहे ना?"

"आता ग बया! आठवलं व्हय तुला.
नाय म्हंजी, तू तर आमच्याशी नात तोडून गीली म्हणायची. मग, जिथं लेक माझी नाय राहिली. तिथं तीच लेकरू माझं कसं म्हणू म्या..'

म्या अजुन बी सांगतेय. हये यायच्या आत निघून जावा. उगाच तमाशा नको आमच्या घरात."

"आत्त्याबाय आवं असं काय बुलता तुमी?
तुमची लेक अन् जावयं हायत ती."

" ह्ये सांगणारी तू ग कोण भटक...?
तुला कुणी इचारल हाय का?"

या संगळ्यांच्या आवाजाने, विजुची झोपमोड होते. आणि ती चिडून बाहेर येते. दाराआड उभी राहून ती पहिला अंदाज घेते. आणि बाहेर उभ्या असलेल्या मनीषा' अंजू' सुबोधला पाहून, पटकन आत्त्याबायंकडे जात बोलते.

"आवं आत्त्याबाय! ही लोकं कधी आलीत? म्या तुमची खोली आवरत हुती तर, आवाज आला. म्हणून बाहिर आले. अन् हे काय मनी बी आलीय व्हय?"

"व्हय. आली की तोंडाला फासून..."
आत्त्याबाय मोठ्या आवाजात बोलतात तसे शेजारी पाजारी आपापल्या अंगणात येवू लागतात.
अंजू आसपास नजर फिरवत पुढे येत बोलते.
आई शब्द जरा जपून वापर. ती तुझी सून आहे एव्हढे लक्षात असुदेत.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

"सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास, ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी."

ता. क.
नमस्कार वाचक मंडळी. काही अपरिहार्य कारणाने मला वेळेत भाग पोस्ट करण्यास उशीर होत आहे. त्या बद्दल मी मनस्वी माफी मागते. अजुन काही दिवस तरी मला असाच वेळ लागणार आहे. पणं, "मनीषा" कथानक हळू हळू का होईना, पुढे सरकत आहे. याबद्दल आपण विश्वास ठेवावा. अजुन काही काळ, आपण मला असेच सांभाळून घ्यावे. ही नम्र विनंती. आणि आपल्या सुंदर समीक्षांनी, माझ्या लेखनातील त्रुटी आणि चांगल्या गोष्टी मला सांगत रहाव्या. जेणे करून, पुढील लिखाणात मला आणखी सुधारणा करता येतील.
धन्यवाद.
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all