मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२९

मनीषा आपला हेका सोडून परत माघारी फिरेल की,आहे त्या परिस्थितीत राहण्याची तडजोड करेल?
"कोण सून?
माझी सून तर कवाच गेली.
आता तिचा अन् आमचा काय बी सबंध नाय."

"आत्त्याबाय अस नका म्हणू व." मनीषा भरल्या डोळ्यांनी, बाळाला घेवून पुढे येत बोलली.

"ये बाय. थांब तिथं. आजिबात इथ यायचं नाय. सांगून ठीवती."

"आवं पणं.."
"त्ये पणं बिन राहू दे. मागं व्हायचं म्हटल ना.."

"अंजे.
तुमी लोक आमच्या सूनला नेत हुतां, तवाच सांगितलं हुतं ना म्या. लय दिस तिला तुमच्याकड ठेवून घिवू नका. पणं नाय ऐकल तुमी लोकांनी माझ.

आता आख्खा गाव तोंड फेंगाडून आम्हांसनी ईचार्तय की तुमची बारकी सून कुठं गेली? अन् आमी बी मेली म्हणूनच सांगतो."

"आत्त्याबाय. आवं अस नका व बोलू. म्या काय हौशेने गेलते का? तुम्हांसनी तर समद माहीत हाय तरी बी..." मनीषा रडतच बोलते.

"ये बया, तू कशी बी जा. नायतर रहा. पणं, आता तुला आमच्या घरात काय! अंगणात बी जागा नाय. ह्ये ध्यानात ठीव."

"व्हय तर काय,
मने तू गेलती तवा पासून आमी कस जगतूया त्ये आमचं आम्हासणी माहीत.
तू गेली ग आरामात. पणं लोक आमच्या तोंडात श्यान घालत्यात.
काय बाय बोलत असत्यात. त्ये तुला नाय ठाव.'
आवं आत्त्याबाय' कालच म्या शोभाच्या शाळतणं येत हुती तवा, ती पाटलाची सुमी अन् खालच्या आळीतली अलका चार माणसांत उभं राहून अगदी त्या लोकासणी ऐकायला जाईल अस मला इचारत हुती."
"काय ईचारल तीनं?"

"हयेचं की, आता तुमची मनी दिसत नाय कधी? पळून बिळून गेली की काय कुनासंग? म्हणत हुती. मलाच मेल्या सारखं झालं बघा. लोकांच्या जिभला हाड नाय. पणं, आपलं नाणं बी खोटं हाय तर करणार काय?"
विजू' अगदी उत्साहाने आत्त्याबायंचे कान भरत होती.

"ओ वहिनी साहेब' अहो बोलताना जरा विचार तरी करा. तुमचे नाणे खोटं म्हणजे काय?
मनीषाने असा काय गुन्हा केला आहे? की तिला नको त्या भाषेत बोलत आहात तुम्ही?"
"जावं द्या व, भाव."
"मनू' अग हे काहीही बरळत आहेत. आणि तू गप्प बसून ऐकतेस? वर मला ही शांत राहायला लावतेस?

एक मिनिट थांब.'
सासूबाई तुमची सून प्रचंड आजारी होती. तिला जर वेळेत उपचार दिले नसते ना, तर मेली असती ती.
खर तर, तुम्ही त्या वेळी स्टँड घेवून मनीषाला पटकन हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं होत. पणं, तुम्ही ती नाटक करतेय म्हणत निवांत बसला होतात. वर तिच्या बेशुद्ध अवस्थेत ही तिच्यावर हात उचलत होतात. आठवतय ना? की, अजुन काही आठवण करून देवू."

"आत्ता ग बया! आत्त्याबाय म्या काय चुकीचं बुलली काय? लोकं काय म्हणत्यात? त्येच तर म्या सांगितलं. आणि बघताय ना, आता भावजींची भाषा मनीषा वरुन, सरळ मनूवर घसरली हाय ते. आठ दहा दीसात नात बदललं वाटत ह्यांचं!"
विजू आत्त्याबायंच्या कानात बोलली.

"ओ वहिनी तिथे कानात कुजबुज करण्यापेक्षा, सरळ आमच्याशीच बोला की." सुबोध चिडून बोलतो.
मनीषा' सुबोध जवळ येत, त्याला बोलते. "भाव जावं द्या वं. त्यांची सवय हाय ती. नका लक्ष देवू."

मनीषाच्या हातात असलेले बाळ उन्हामुळे चुळबुळ करत होते. आणि या सासुसूनेचे एकमेकींशी बोलणे संपत नव्हते.

मनीषा पटकन अंजू जवळ येत, तिच्याकडे बाळाला देते‌. आणि आत्त्याबाय समोर येवून बोलते. "आत्त्याबाय' आवं तुमी नंतर बुला. पणं, या माय लेकराला जरा सावलीत तरी थांबू द्या. त्ये बगा, बाळ कसं चुळबुळ करायला लागला हाय."

विजू पुढे येत बोलते. "ते तू सांगायची गरज नाय. या व ताय. बसा इथ. म्या पाणी घिवून येते."

"विजू' कुणाला काय बी द्यायची गरज नाय. गप गुमानं इथ थांब.
अन् तुमी समदी. एकदा सांगितलं नवं मी. इथं तुमचं कुणी बी नाय म्हणून. मग निघायचं बघा की आता. का आता ह्यांनाच बुलवाव लागतंय?"

"हो बोलवा तुमच्या ह्यांना. काय आहे ना? आम्हाला ही एकदाच कळेल की, तुम्ही किती पाण्यात आहात ते." सुबोध ही रागात बोलतो.

"अंजू' बाळाला घेवून, त्या झाडाखाली बस. आज काय तो सोक्ष मोक्ष लाऊनच जाऊ.'

मनू' तुला सांगितले होते आम्ही. पणं, ऐकले नाहीस ना? बघ आता तुझ्या डोळ्यांनी! बघून घे सगळे."

मनीषा रडवेल्या स्थितीत फक्त बघत असते. अंजू बाळाला घेवून झाडाखाली बसते. ऊन मी म्हणत असते. त्यामुळे थोड्याच वेळात, बाळ रडू लागते. सगळ्या शेजाऱ्यांमध्ये, शेजारची वनिता ही बाहेर थांबून, चालू असलेल्या घडामोडींचा आढावा घेत असते. अंजूची घालमेल आणि बाळाचे रडणे तिला सहन होत नाही. आणि ती जागेवरून अंजूला आवाज देते.

"ओ अंजू ताय. आवं इकड इकडं बघा." अंजू आवाजाच्या दिशेने बघते. "हा. म्याच आवाज दिला." सुबोध आणि मनीषा ही पाहू लागतात.

"आवं ऊन लय हाय. पोराला घिवून इकड या. कोवळ्या जीवाला सोसणार नाय ह्ये. या तुमी इकडं."

अंजू' सुबोधकडे बघते. तो तिला डोळ्यांनीच जा सांगतो. तसे, अंजू पटकन वनिताच्या घरी जाते.
इकडे आत्त्याबायंनी विजूला सांगून, तिच्या फोन वरून, महादेवला फोन करून आबा आणि त्याला लवकर यायला लावले. आणि दोघी अंगणात बसून सुबोध आणि मनीषाकडे रागात बघू लागल्या.

सुबोध त्यांच्या चालू क्रिया पाहून, मनीषा जवळ येत बोलतो. "मनू' अग अजुन काय हवय तुला? तू बघत आहेस ना, हे लोक स्वतःच्या मुलीशी, नातवाशी कसे वागत आहेत ते. तुला तर ते साधे दारात उभे करेनात. तुला एवढ बास झाले नाही का परत फिरण्यासाठी?"

मनीषा आपले डोळे पुसून बोलते.
"भाव' आवं आपली माणसच अशी रुस्त्यात. थोडा येळ जावं द्या मग बघा तुम्हालाच काय? मला बी घरात घेतील त्ये. आता तर आबा बी येतील नवं. मग या सासू' सूनच काय बी ऐकणार नायत ते. त्यांना माहीत हाय. म्या काय मुद्दामहुन गेली नव्हती.
त्येना थोडी तरी माझी काळजी नक्की असल बघा."

"तू कोणत्या मातीची बनली आहेस मनू? अग ती लोक तुझ्या इज्जतीचा पंचनामा करत आहेत. त्यांच्या घरची सून असून सुद्धा, ते तुला किती खालच्या भाषेत बोलत आहेत. भाव मला सवय हाय आत्त्याबायंकडून' असल काय बाय ऐकायची. त्यांची भाषाच तशी हाय. तुमी नका मनाला लाऊन घेवू. आता आबा आलत की बगा. कशी सुतागत सरळ हुत्यात त्या."
म्हणत, मनीषा डोळ्यावर हात घेत, सुबोधला बोलते भाव आपण बसू तो पर्यंत त्या झाडं खाली. अंजू ताय अन् बाळ वनिताच्या घरात सुखरूप हायत. त्या मूळ आता काळजी नाय.
"बर चल." म्हणत, मनीषा आणि सुबोध झाडाखाली जाऊन बसतात.
त्यांना आधी बोलताना, आणि पुन्हा एकत्र जाऊन बसलेले पाहून, विजू पुन्हा आत्त्याबायंच्या कानात बोलते. "बघितल का आत्त्याबाय. आता लयच जवळीक वाढलेली दिसती की ह्यांची. दात काढून बोलत्यात काय? एकत्र झाडाखाली बस्त्यात काय? लाज शरम तर कोळून पिलीय बघा ह्यांनी.
ह्ये बर अंजू ताय ना सोसत."

"कळलं तिला बी. एक दिशी. ह्या बाबान, घरातून बाहीर काढली म्हंजी, सगळ कळलं.
जाऊदे, आपल्याला काय त्याच सोयर सुतक नाय. आता लेकच आपली नाय म्हंटल्यावर."

"आवं आत्त्याबाय' असं म्हणूनच्यान चालतंय व्हय? आपल्या शेजारची लोकं बघा. कशी आनंद घेत्यात त्ये. या मनीमूळं आपल्या घराचा पंचनामा हुतोय. वर, अंजू तायंना त्या वनीन आपल्या घरी नीली. म्हंजी, आपण किती वाईट हाय. हेच त्या लोकास्नी पढवतील अंजू ताय. त्या परीस त्यांना इथच बुलवा."

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

ता. क.
"सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास, ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी."

🎭 Series Post

View all