मनमानी 1

मनमानी


"ठीक आहे, लग्नाचा अर्धा खर्च तुम्ही करा, म्हणजे तुमच्या मनासारखं सगळं करता येईल"


 साक्षी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला बजावून सांगत होती.


 गोपाळरावांनी पोटाला चिमटा काढून मुलीला डॉक्टर
बनवले होते. गोपाळरावांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. साक्षी हुशार असल्याने तिला मोठेपणी डॉक्टर व्हायचं असं स्वप्न ती उराशी बाळगून होती. आपल्या मुलीच्या
पंखांना बळ देण्यासाठी गोपाळरावांनी काबाडकष्ट केले. मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी कर्ज काढून त्यांनी तिला चांगलं शिक्षण दिलं. साक्षीनेसुद्धा आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन खूप मेहनत घेतली. खूप अभ्यास केला आणि अव्वल मार्काने परीक्षा
पास झाली.


 डॉक्टरकीच्या अभ्यासात बरीच वर्ष लागत असल्याने साक्षीच्या लग्नाला उशीर होत होता. ती लग्नाच्या वयाची झाली होती. तिची प्रॅक्टिस सुरू होती. तिचं म्हणणं होतं की. मी प्रॅक्टिस करून स्वतःचे हॉस्पिटल सुरू करेन. काही पैसा जमवेल आणि त्यानंतर लग्नाचा विचार करेन.

 पण
नातेवाईक आणि समाज. मुलगी वयात आली की तिच्या लग्नाची काळजी यांना जास्त असते.
सर्व नातेवाईक, शेजारी पाजारी त्यांना सारखे विचारत असायचे. साक्षीचे लग्न कधी करणार? मुलगी वयाची झाली. उलटून गेलं की चांगला मुलगाही मिळत नाही.

 एकीकडे
आई वडिलांना वाटायचं की मुलीला पुढे अजून काम करू द्यावं. तिला पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभा राहू द्यावं, लग्नानंतर या सर्व गोष्टी करणं कितपत शक्य होईल? आणि दुसरीकडे नातेवाईकांचे खरे वाटायचे. जसं शिक्षण आणि करियर महत्त्वाचं
होतं, तसं साक्षीचं लग्नही त्यांना महत्त्वाचं होतं.


 त्याचवेळी एका नातेवाईकाने त्यांच्याच ओळखीतलं
एक स्थळ सुचवलं. मुलगा डॉक्टर होता. नावाजलेला डॉक्टर. हाताशी भरपूर पैसा, स्वतःचे हॉस्पिटल. मुलगा डॉक्टर असल्यामुळे त्याला डॉक्टर मुलगीच हवी होती. साक्षी आणि
त्या मुलाचा जोडा अगदी शोभून दिसणारा होता.


 नातेवाईकांनी जसं डॉक्टरचं नाव सुचवलं तसं आई
वडिलांना आनंद झाला. साक्षीही त्या डॉक्टरचं नाव ऐकून होती. शहरात नावाजलेले नाव होते. साक्षीने त्याचा फोटो पाहिला. आणि तिलाही तो मनापासून आवडला.


 गोष्टी पुढे सरकल्या. लग्नाची तारीख ठरली. सगळे काही जमून आले..

🎭 Series Post

View all