Login

मानसिक घटस्फोट भाग पाच अंतिम

शरीरापेक्षा मनाने घेतलेल्या घटस्फोटाची कहाणी
विभाने मंद स्मित करत आनंदरावांकडे बघितलं आणि म्हणाली,
"तुम्हाला विचारायला खूप उशीर झालाय.मी तर कधीच घटस्फोट घेतलाय."
"घटस्फोट??" अंगदरावांनी थरथरत विचारलं.
"हो, मानसिक घटस्फोट."
अंगदरावांनी प्रश्नार्थक नजरेने विभा कडे बघितले ती काय बोलते त्यांना काही समजत नव्हतं.
"ज्या दिवशी तुम्हाला माझ्या भावनांची किंमत समजली नाही.तुम्हाला माझं मन जाणून घेता आलं नाही.लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही तुम्ही मानसिक रित्या माझ्याशी अटॅच झाला नाहीत.हे ज्या दिवशी मला कळलं.त्याच दिवशी मी तुमच्याशी घटस्फोट घेतला.मनाचा घटस्फोट.शरीराने मी तुमच्याजवळ राहत असले तरी मनाने मात्र माझं तुमच्याशी कुठलंच नातं उरलेलं नाही."
"अगं काय बोलतेस तू हे? नवरा आहे मी तुझा."
"शरीराने अजूनही तुम्ही माझा नवराच आहात?पण मनाने मात्र तुम्ही माझे कुणीच लागत नाहीत.घाबरू नका.तुमचं जेवण खाणं पथ्य पाणी सगळं करेल.पण मनाने मात्र मला तुमच्याबद्दल कुठलीच अस्था वाटणार नाही."
"विभा अगं काय बोलतेस हे?या वयामध्ये मला तुझ्या मानसिक आधाराची गरज आहे."
"एका वयात मलाही तुमच्या मानसिक आधाराची गरज होती.तेव्हा मात्र तुम्हाला माझी गरज ओळखता आली नाही.असो,मी थोडीशी खिचडी करते.थोड्यावेळाने जेवायला या."
असं बोलून विभा किचनमध्ये निघून गेली.
अंगदराव ती गेलेल्या दिशेने बघतच राहिले.
आयुष्यभर त्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं या गोष्टीचा विचार करत.
खरंच,प्रत्येक वेळेस विभाची चूक नव्हती परंतु आईच्या प्रेमापोटी आपण नेहमीच तिच्यावर अन्याय करत गेलो.ती मात्र प्रत्येक वेळेस शांतपणे सहन करत संसार करत राहिली.
जर त्याच वेळेस मी विभाची साथ दिली असती तर..
जर त्याच वेळेस माझी आई चुकीची आहे हे मी ठामपणे सांगू शकलो असतो तर..
जर मुलं केवळ माझी नाही तर ती विभाची ही आहेत हे मला समजलं असतं तर..
विभाने मुलांवर संस्कार केले असते तर..
आज रिटायरमेंट नंतरचा प्रत्येक क्षण किती सुंदर झाला असता.
पण आज या जर तर च्या प्रश्नाला काहीही अर्थ नव्हता कारण
त्यांनी एक सच्चा जीवनसाथी गमावला होता..


नवरा आणि बायको एका रथाची दोन चाके असतात एक जर चाक डळमळलं तर रथ चालू शकत नाही त्याचप्रमाणे दोघांपैकी एक जोडीदार जर खचला तरी त्यांचा संसार चालू शकत नाही.बऱ्याच वेळेस मुलांना लग्नानंतर स्वतःच्या आई-वडील आणि भावंडांबद्दल इतकं प्रेम वाटायला लागतं की,नकळत ते बायकोवर अन्याय करायला लागतात.आपण जर बायकोची साथ दिली तर लोक आपल्याला बायकोचा बैल म्हणतील ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते की,ते बायकोला अगदी एकट पडतात.आणि मग उतार वयामध्ये जेव्हा त्यांना जोडीदाराची गरज लागते तेव्हा त्यांना बायको आपलीशी वाटायला लागते.पण आयुष्यभर अन्याय सहन केल्यावर उतार वयामध्ये बायका 100% नवऱ्याला माफ करू शकतात का?शारीरिक घटस्फोट न घेता ही केवळ मानसिक घटस्फोट घेऊन जगासाठी संसार करणाऱ्या कितीतरी महिला या समाजामध्ये असतीलच ना?