“स्वराला लग्नात काय गिफ्ट द्यायचे? वस्तू घ्यायची की पाकिटात पैसे घालायचे?” नेत्राने आपल्या सासूबाईंना विचारले.
“ते आहेर घेणार नाहीत, पत्रिकेत स्पष्ट लिहिलंय. मग कशाला हवे आहेत हे असले सोपस्कार. तू पत्रिका नीट बघितली नाहीस का?” लीलाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या.
“हे नियम बाकीच्यांसाठी. घरच्यांकडून आहेर घेतीलच ना. घरचा आहेर सगळी करतील त्यावेळी आपल्याला करावा लागेलच ना. नाही केला तर चांगलं दिसणार नाही. ऐनवेळी गोंधळ होईल. स्वराला केळवण करू तेव्हाच देऊ म्हणजे त्यांना नाही म्हणता येणार नाही.”
“त्यांनी कुठे केलं होतं केळवण नितीनला मग आपण कशाला करायचं? अजून वेळ आहे लग्नाला. मी बघते काय द्यायचे ते. तू चिंता करू नको.” लीलाताई त्रासिक स्वरात म्हणाल्या.
“केळवण केलं नसलं तरी लग्नानंतर आम्हाला दोघांना जेवायला बोलावलं होतं, मला साडी दिली होती.” नेत्रा चिडून म्हंटली.
स्वरा नेत्राची चुलत नणंद होती. सासऱ्यांच्या चुलत चुलत भावाची मुलगी. नातं तसं लांबच असलं तरी नेहमी एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. नेत्रा आणि स्वराच अगदी छान पटायचं त्यामुळे स्वराला केळवण करावं, व्यवस्थित आहेर करावा असं नेत्राच्या मनात होतं पण सासूबाईंच्या पुढे काहीच चालत नसल्याने नाईलाजाने गप्प बसावं लागत होतं.
“तुमच्या लग्नात मला साडी, ह्यांना कपडे आणि नितीनला पाकिटात दोनशे एकावन्न रुपये घातले होते. आपण पण तेवढेच घालूया. माझ्याकडे बऱ्याच आल्यागेलेल्या, मला न आवडलेल्या साड्या आहेत. शर्टपॅन्टपीस पण असतील त्यातलच देऊया. त्यांनी नाही घेतलं तर सगळंच अंगावर पडेल.” जरावेळने आपल्या डायरीतील आहेरच्या नोंदी बघत लीलाताई बोलल्या.
लीलाताईंच्या डायरीत त्यांनी दिलेल्या, त्यांना मिळालेल्या सगळ्या आहेरच्या व्यवस्थित नोंदी असायच्या. कोणी काय दिलं, किती दिलं, लग्नात दिलं की बारशाच्या वेळी दिलं. इतकंच काय दरवर्षी नातवंडांच्या वाढदिवसाला काय काय मिळालं हे सुद्धा लिहिलेलं असायचं. देण्याघेण्याची वेळ आली की त्याप्रमाणेच आपणही द्यायचं त्याचं म्हणणं असायचं. आलेल्या बऱ्याच वस्तू न वापरता कोणाला तरी देता येतील म्हणून वर्षांवर्ष तश्याच ठेऊन द्यायच्या. अतिशय व्यवहारी, जेवढ्यास तेवढं द्यायचा स्वभाव होता त्यांचा. वीस तीस वर्षापूर्वी मिळालेल्या पन्नास शंभर रुपयांच्या आहेराला त्यावेळी किंमत होती आता पन्नास रुपयात अर्धा किलो भाजीसुद्धा येत नाही एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नव्हती. कळतंय पण वळत नाही अशी काहीशी अवस्था लीलाताईंची होती. द्यायची वेळ आली की कंजुषपणा करायचा आणि आपल्याला लग्नाकार्यात मिळालेल्या साड्यांना, भेटवस्तूनां नावं ठेवायची, तोंड वेंगाडायच सासूच्या ह्या सवयीला नेत्रा पुरती कंटाळून गेली होती. आपल्या माहितीसाठी लिहून ठेवायला तिची काहीच हरकत नव्हती पण त्यानुसारच आहेर करायचा ह्या वृत्तीचा मात्र तिला राग यायचा.
“आमच्या लग्नाला चौदा वर्ष झाली त्यावेळी दोनशे रुपयांना किंमत होती आता पाचशेतसुद्धा काही येत नाही.” सासूची मुक्ताफळं ऐकून कपाळावर हात मारून घेत नेत्रा म्हणाली पण लीलाताईंनी नेहमीप्रमाणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
नितीन घरी आल्यावर तिने सगळी हकीकत त्याला सांगितली. “तू आईकडे लक्ष देऊ नकोस. तुला स्वराला जे द्यायचं ते गिफ्ट दे. आपण तिला केळवणही हॉटेलात करू. आईला काही सांगायच नाही म्हणजे प्रश्नच नाही. आईचा स्वभाव माहित आहे ना तुला.” वाद घालून काही निष्पन्न होणार नाही आपल्या आईचा चांगला ओळखत असलेला नितीनने नेत्राला समजावले.
“मला स्वराला घरी बोलवायचे आहे.”
“तू घरी केळवणाला बोलवशील आणि पुढचे पंधरा दिवस आई कटकट करत राहील त्यापेक्षा नकोच.” कात्रीत सापडलेला नितीन म्हणाला.
अखेर पुढच्या आठवड्यात नेत्रा आणि नितीन स्वराला शॉपिंगला घेऊन गेले. लग्नात ती नऊवारी साडी नेसणार असल्याने त्यावर उठून दिसेल अशी चिंचपेटी, तनमणी, झुमके, तोडे, बाजूबंद, नथ तिला हवी असलेली सगळी ज्वेलरी घेऊन दिली. स्वराच्या पसंतीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी शर्ट घेतला. स्वराला आणि तिच्या नवऱ्याला अंगतपंगत मध्ये केळवण केले.
“आईंना यातलं काहीच सांगू नकोस.” नेत्राने स्वराला हळूच खुणावले.
लीलाकाकूचा स्वभाव माहित असल्याने “नाही सांगणार, निश्चिंत रहा” स्वराने नेत्राला आश्वासन दिले.
ह्यावेळी परस्पर सगळं निभावून नेलं पण किती दिवस हे असं चालणार? लपूनछपून व्यवहार करावा लागणार? लोक नाव ठेवतात, नातेवाईकात हसू होते. वाढत्या महागाईचा विचार नको का करायला? हल्ली बरेचदा आहेर घेतला जात नाही पण कधीतरी द्यायची वेळ येते तेव्हा व्यवस्थित करायला नको का? सासूबाईंना सांगून पटत नाही. काय केले म्हणजे आपल्या सासूची मानसिकता बदलेल नेत्रा विचारात गढून गेली.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
