Login

मानसिकता भाग ... २ अंतिम भाग

एक घटना बदल घडवते... बदललेल्या मानसिकतेची कथा
मागील भागात आपण पाहिले सासूच्या कंजुष, नको तिथे काटकसर करणाऱ्या स्वभावाला नेत्रा कंटाळली होती. आता पुढे …

दोन महिन्यांनी लीलाताईंची एकसष्टी होती. एकसष्टीनंतर लीलाताईंमध्ये आमूलाग्र बदल होईल हे मात्र कोणालाही ठाऊक नव्हतं.

आईची एकसष्टी थाटामाटात करायचे खूप दिवसांपासून नितीनच्या मनात होते. त्यासाठीची तजवीज त्याने सुरू केली. छोटेखानी हॉल घेतला. मेनू ठरला, नेत्राने सगळ्या आप्तस्वकीयांना निमंत्रण केली. सासूबाईंना छानशी पैठणी घेतली. अवांतर खर्च करताना नेहमी कटकट करणाऱ्या लीलाताईंनी ह्यावेळी स्वतःचा वाढदिवस लेक सून थाटात करतायत म्हंटल्यावर विरोध केला नाही त्यामुळे सगळा कार्यक्रम झोकात पार पडला.

पाहुणेमंडळी घरी गेल्यावर लीलाताईंनी भेटवस्तू उघडून बघत आपल्या कोऱ्याकरकरीत डायरीत नेहमीप्रमाणे नोंदी करायला सुरुवात केली.

“पेंडसे काकूंनी किती सुंदर साडी दिली आहे तुम्हाला! हजार दीड हजाराची तरी असेल.” गुलाबी रंगाची साडी हातात घेत नेत्रा म्हणाली.

“आली गेलेली चिकटवली असेल. ती कुठली नवीन घेऊन देणार.” लीलाताईंनी तोंड वाकडं केलं. त्यांना कधी कुणाला चांगलं म्हणणं ठाऊकच नव्हतं.

“आली गेलेली कशाला देतील? चांगली विकत घेतली आहे. नाही आवडली तर बील घेऊन जा, बदलून आण. लीलाताईला काय निमित्ताने देणार?.…घडी मोडायला सांग, त्यांनी मला चार चारदा बजावलं आहे. स्वरानेसुद्धा तुम्हाला सुंदर कशिदा केलेली शाल दिली शिवाय पाकिटात पैसे पण घातले आणि तुम्ही तिच्या लग्नात नितीनला दिवाळीत गिफ्ट मिळालेली क्रोकरी द्यायला सांगत होतात. तिने तुमच्यासारखा विचार केला असता तर चाललं असतं का तुम्हाला? इतकं व्यवहारी राहून कसं चालेल. अशाने लोकं नावं ठेवतात, नितीन चांगल कमवत असूनही लीलाताई अशा का वागतात म्हणतात. आलं गेलेलं आयुष्याला पुरत नाही. मिळत नाही म्हणून कोणी कोणाला काही देत नाही त्यामागची भावना महत्वाची. सगळ्यांनी तुमचा व्यवस्थित मानपान केला आहे. तुम्ही मात्र अजून आमच्या लग्नात आलेल्या आहेरात अडकला आहात. जरा नीट डोळे उघडून जुन्या, नव्या डायऱ्या तपासा.” नेत्रा बऱ्याच दिवसांपासून मनात साठलेला त्रागा आवरू शकली नाही.

नेत्राचे कडवट बोलणे लीलाताईंच्या जीवाला लागले. त्यांनी परत डायरीत डोके घातले. दोन चार पान चाळल्यावर त्या जागीच थबकल्या. नेत्रा बरोबर बोलत आहे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी केलेल्या आहेरच्या मानाने त्यांना कैकपटीने चांगल्या भेटवस्तू आल्या होत्या. त्यांच्या जिवलगांनी बिलकूल हात आखडता घेतला नव्हता. त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंमधून आदर, प्रेम, जिव्हाळा ठिबकत होता. हे सगळं पाहून लीलाताई ओशाळल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

“पूर्वी परिस्थिती नव्हती, खर्चाचा ताळमेळ बसवताना काटकसर करावी लागायची. ह्याच त्याला आणि त्याच ह्याला करत वस्तू फिरवावी लागायची. हळूहळू तेच अंगवळणी पडलं, सवयीचं झालं.” लीलाताईंनी हळूच डोळ्याला पदर लावला.

“पण आता परिस्थिती बदलली आहे, वेळ काळानुसार बदलायला नको का?”

“स्वराला आणि जावयांना एक दिवस घरी बोलवूया त्यावेळी मानपान करू. मंगळागौर, वर्षभर सणावर आहेतच तेव्हा व्यवस्थित आहेर करू.”आपली चूक लक्षात आलेल्या लीलाताई म्हणल्या.

“त्यावेळी करुच. पण आम्ही तुम्हाला न सांगता स्वराला हॉटेलात केळवण केलं होतं. तुम्ही रागवालं म्हणून सांगितलं नव्हतं.” नेत्राने स्वराला केलेलं केळवण, आहेराबद्दल सासूबाईंना सविस्तर सांगितलं.

“बरं केलंस बाई, लाज राखलीस. व्यवहार नाही नाती जपणं महत्वाच.” लीलाताईं नेत्राच कौतुक करत म्हणल्या.

ह्यापुढे आहेर, देणंघेणं याकडे केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून न बघता जे काही करायचं ते मनापासून करायचं लीलाताईंनी ठरवलं. उशीरा का होईना सासूबाईंची मानसिकता बदलली. खऱ्या अर्थाने मिळालेलं एकसष्टीचे फळ पाहून नेत्राच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं.