Login

मंतरलेले अंतर

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर
भाग 1
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा...........

गुणगुणावे गीत वाटे
शब्द मिळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना......


मयुरी आज तिचे आवडते गीत गुणगुणत,व्हरांडातील झोपाळ्यावर वाफाळलेला अद्रक चा चहा घेत बसली होती.

अंगणात बागेतील झाडांची हळूच येणारे झुळूक तिचा केसांच्या बटा हळुवारपणे उडवीत होती. पौष महिन्यातील बोचरी थंडी आणि अचानक पडणारा हा पाऊस वातावरणातील गारवा आणखीच वाढवत होता.

खरंतर हा पाऊस सर्वांसाठी नुकसानदायकच होता, पण मयुरी मात्र या पावसामुळे थंडगार वाऱ्यामुळे कमालीची सुखावली होती.


रोजच्या यांत्रिक झालेल्या आयुष्याला कंटाळली होती. आपला व्यवसाय सांभाळणे मुलांना वाढविणे आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे, आणि दूर साता समुद्रा पार गेलेल्या समीरची चातकासारखी वाट बघणे हाच तिचा नित्यक्रम होता.


आताही तिला स्पर्शून जाणार हा वारा , पावसाचे थेंब तिला अस्वस्थ करत होते. देवाने समीरलाच पंख लावावे आणि क्षणात त्याला इथे आणावे असे तिला मनोमन वाटत होते. यात थंडीमध्ये त्याच्या उबदार मिठीत शिरावे आणि काहीच न बोलताही त्याचा हात हातात घेऊन, डोळे मिटून, हृदयाने हृदयाशी संवाद साधावा हाच विचार मयुरीच्या मनात येत होता. सुप्त मनाने तर ती केव्हाच समीरच्या म्हणजे तिच्या सॅम च्या मिठीत पोहचली देखील होती.

त्याचा उबदार स्पर्श अनुभवत होती. त्याला तिच्या लांब सडक केसांबद्दल खूप आकर्षण होते. अतिव प्रेमाने समीरने केसांतून बोटे फिरवली की तिला अगदी स्वर्ग दोन बोटेच उरल्यासारखा वाटत असे.

" मयुरी' अग मयुरी कुठे हरवली आहेस? किती आवाज देऊ तुला?बऱ्याच वेळा पासून मोबाईल वाजतो आहे. "


आईचा आवाज आला तशी मयुरी भानावर आली मनातल्या मनात तिने दोन चार क्षण तिच्यासोबत घालवले होते.


घाईघाईने तिने मोबाईल बघितला तर चार-पाच मिस्ड कॉल दिसले. तिच्या मुलाचे म्हणजे आरवचे आणि समीरचे ही कॉल येऊन गेले होते.


तिने आरवचा मेसेज पाहिला. त्याला घरी येण्यासाठी आज उशीर होणार होता. आरव शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होता. तर रेवाने नुकतेच अकरावी वर्गात प्रवेश घेतला होता. तिला शास्त्रज्ञ व्हायचे होते. त्या दृष्टीने तिने आतापासूनच तयारी सुरू केली होती. दोन्ही मुले हुशार आणि गुणी होती. फुटबॉल प्लेअर होता. आज मयुरी कडे सर्व काही होते. आरोग्य, ऐश्वर्य, आनंद ,समाधान कशाचीही ददात नव्हती. फक्त समीर सोबत नाही याची सल कायम तिच्या मनात असायची.


समीर उच्चशिक्षित, चार्टर्ड अकाउंट, दिलेल्या जमाखर्चाचा ताळेबंद करणारा. त्याच्याकडील हुशारीमुळे नेहमीच त्याला काम करण्याच्या चांगल्या संधी मिळत असत.


इकडे समीर ने काही वर्षे एका नामांकित कंपनीत नोकरी केली. नंतर त्याने स्वतःची एक फर्म सुरू केली. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. भरपूर पैसा, मानमरातब, सगळं काही भरभरून मिळत होतं. पण कधी कधी दैव आपल्याला आपली जागा दाखवते, जमिनीवर आणते. समीरच्या बाबतीतही हेच झाले. फर्ममधील त्याच्या अत्यंत जवळच्या विश्वासू माणसाने त्याचा विश्वासघात केला, आणि फर्म बंद करावी लागली. आर्थिक अडचण अशी काही आली नाही. मयुरी चा व्यवसाय जोमाने सुरू होता. आई-बाबांची पेन्शन देखील होती. आर्थिक दृष्ट्या तो परिवार समृद्धच होता. समीरने परत नोकरी करावी असे सर्वांचेच मत होते.


पण आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या समीरला परत फिनिक्स पक्षासारखे राखेतून उडायचे होते, स्वतःला सिद्ध करायचे होते.

त्याच काळात दुबई स्थित मित्राचा गिरीशचा त्याला कॉल आला., आणि त्याने सांगितले की

'दुबईमध्ये तू स्वतःची पण सुरू करतो आहे, त्याला एक पार्टनर हवा आहे.'


समीर साठी ही स्वतःला सिद्ध करण्याची आयती संधी चालून आली होती. गिरीश सोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय त्यांनी बायको मुलांना आणि आई-बाबांना सांगितला.


आपल्या कर्तबगार नवऱ्याला चांगली संधी मिळते आहे हे पाहून मयुरीला आनंद झाला खरा, पण त्याने मुलांना आपल्याला सोडून दुसऱ्या देशात राहावे ही गोष्ट तिला पचनी पडत नव्हती.

मुलांचे शिक्षण तिचा व्यवसाय आणि आई-बाबांची जबाबदारी यामुळे मनात असून देखील ती समीर सोबत जाऊ शकत नव्हती.

आणि म्हणूनच तिचे एक मन समीरला दुबईत जाण्यास विरोध करत होते.

ज्या दिवसापासून दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकमेकांना पाहिल्याशिवाय ,भेटल्याशिवाय एवढा जास्त काळ कधीच गेला नव्हता...

म्हणतात ना " लव्ह ऍट फर्स्ट साईट " अशा अखंड प्रेमात बुडालेले ते जोडपे होते. एकमेकांसाठी अनुरूप! मेड फॉर इच अदर, सगळी विशेषणे यांच्यासाठीच बनलेली असावे असे हे जोडपे......


त्यामुळेच समीरला सोडून राहण्यास मयुरीचे मन तयार होत नव्हते. समीरची अवस्था देखील फार वेगळी नव्हती. आयुष्यात खूप खाचखळगे पाहिल्यानंतर आता कुठे सुखाचे दिवस त्याच्या भाग्यात आले होते. आणि आता परत कुटुंबापासून दूर, त्याच्या प्राणप्रिय मयुरी पासून दूर, नशीबाने मिळालेल्या आई-वडिलांपासून दूर त्याला जावे लागत होते.


भूतकाळातील एकटेपणा परत त्याच्या वाट्याला येणार होता. वर्ष वर्ष तो त्याच्या लाडक्या लेकरांचा चेहरा पाहू शकणार नव्हता. पण त्याला त्याचा उज्वल भविष्यकाळ खुणावत होता.


असं म्हणतात की संधी ही डोक्याला समोरून केस आणि मागे टक्कल असणारी असते.


जर तुम्ही समोरून तिचे केस पकडले नाही तर ती वळली की तुमच्या हातून निसटून जाते.....


समीरने संधीचे केस पकडून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने यशदायी उद्यासाठी काही काळ भूतकाळातील एकटेपणासोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.


आणि तो गिरीश सोबत काम करण्यासाठी दुबईला निघून गेला....


काय असेल त्याचा भूतकाळ? आणि मयुरी ची भेट कशी झाली? पाहूया पुढच्या भागात..